चैतन्य प्रेम

ज्ञानाचा वारसा लाभलेला, ज्ञानाची शाब्दिक ओळख असलेला, ज्ञानाचा अनुभव असलेला आणि आत्मज्ञानाच्या वाटेवर भक्तीप्रेमानं प्रत्यक्ष चालत असलेला भक्त.. अशा क्रमवारीनं साधक सत्संग प्राप्त करीत असतो. या सर्वाना तो पूज्य मानत असतो. आपण जेव्हा हा जिना पूर्ण चढून जातो ना, तेव्हा प्रत्येक पायरीचं आपल्या वाटचालीत महत्त्व असतं. पण कोणत्याही पायरीपाशी अडकून न पडता आपण वाटचाल करीत राहतो तेव्हा सर्वात जो पूजनीय आहे, अशा सद्गुरूपर्यंत आपण पोहोचतो. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘अतिमहत्त्वें पूज्य गहन। ज्याचे सुर नर वेद वंदीजन। तो सद्गुरू श्रेष्ठ पूज्य स्थान। शिष्यासी जाण सर्वस्वें॥ ५७६॥’’ वेद, देव आणि संतजन ज्याला वंदन करतात, जो सर्वापेक्षा थोर आहे, तो सर्वाधिक पूजनीय आहे. शिष्यानं त्याची सर्व भावानिशी पूजा केली पाहिजे. आता, आधी खरा सद्गुरू लाभायला हवा, मग त्याला ओळखता यायला हवं आणि मग त्याच्या बोधानुसार आचरण घडायला हवं; तर ही पूजा साधणार! जोवर ‘मी’ आणि ‘माझे’चा संकुचित परीघ टिकून आहे, तोवर सर्व भाव एकवटून ही पूजा घडणारच नाही. जो सर्वार्थानं पूज्य आहे, त्याच्याशी समरस होत ‘मी’चा ‘मी’पणादेखील ‘पूज्य’ झाला पाहिजे, शून्य झाला पाहिजे! आता ही प्रक्रिया सोपी नाहीच आणि या वाटचालीचा आरंभबिंदू स्वतपासूनच आहे. त्यामुळे ‘साधक’ असलेले आपण आणि आपली साधना- म्हणजेच ‘मी’पासून ‘तू’पर्यंतच्या वाटचालीसाठीच्या अभ्यासाकडे आपण ‘एकनाथी भागवता’चं बोट पकडून वळणार आहोत! आपल्या भवतालचं जग आपल्या जन्माआधीही असतं आणि आपल्या मृत्यूनंतरदेखील असतंच. पण आपल्यापुरतं बोलायचं, तर आपण जन्मतो तेव्हा हे जगही आपल्याबरोबर जन्मतं आणि आपल्या मृत्यूनंतर मावळतं! पण जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळात हे जग आपल्यावर प्रभाव गाजवतं. आपल्या मानसिकतेवर कब्जा मिळवतं. देह हे या जगात वावरण्याचं, जगातलं सुख मिळवण्याचं आणि दुख टाळण्याचं एकमात्र साधन असते. त्यामुळे आपण देहभावात रुतून या जगात आपल्या आयुष्याच्या मुदतीत सुखासाठी धडपडत असतो. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘उपजलेनि दिवस-दिवसें। देहातें काळु ग्रासीतसे। हें नित्य नवें मरण कैसें। देहलोभवशें विसरले॥ २५३॥ (अध्याय पाचवा)’’ श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर म्हणत की, ‘‘जन्मल्यापासून या देहाच्या पाठीशी मरण लागले आहे!’’ आणि ती म्हण आहे ना- ‘रोज मरे, त्याला कोण रडे’! तशी गत आहे. रोजचंच मरण आहे आणि म्हणून त्याची जाणीव नाही की शोक नाही! आत्मजागृत भक्ताचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, ‘‘पैं निद्रिताचेनि आंगेंशीं। सापु तशी उर्वशी। तेवीं स्वरूपस्था सरिसीं। देहीं द्वंद्वें॥ (अध्याय १४/ ओवी ३५६)’’ म्हणजे ज्याप्रमाणे गाढ झोपी गेलेल्या माणसासाठी शेजारी उर्वशी आली काय किंवा साप आला काय, दोन्हीची जाणीवच नाही; त्याप्रमाणे जो स्वरूपस्थ झाला आहे, आत्मजागृत झाला आहे, ज्याची देहबुद्धी मेली आहे, त्याला देहभावामुळेच जिची जाणीव होऊ शकते अशा द्वंद्वमय स्थितीची कल्पनाही येत नाही. आपल्यासारख्या आत्मविस्मृत जीवांची स्थिती यापेक्षा उलटच असते. आपण दिवास्वप्नात रमत असतो आणि कल्पनेत ‘उर्वशी’ला- म्हणजे कामनापूर्तीच्या सुखभ्रमाला कवेत घेताना वास्तवात काळरूपी सापानंच वेढले जात असतो!