चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

काळ या देहाला ग्रासत आहे, हे प्रत्येकाला उमजत असतं. समजा, पन्नाशी पार केलेल्या आप्ताला आपण दहा-पंधरा वर्षांच्या खंडानंतर भेटलो. तर आपल्याला वाटतं, किती म्हातारा झालाय हा! पण त्याच्याबरोबर नेहमी राहणाऱ्यांना आपल्याएवढं ते वृद्धत्व तीव्रतेनं टोचत नसतं. कारण दर दिवशी अगदी संथपणे का होईना, त्याच्या देहरूपात होत गेलेला बदल अंगवळणीप्रमाणे त्यांच्या दृष्टीवळणी पडलेला असतो. जन्मापासून देहाला काळ असा अलगद ग्रासत आहे, की त्याचं भान लोपलेलं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘ज्याचे त्या देखतां कैसा। काळु गिळी बाळवयसा। मग तारुण्याची दशा। मुरडूनि घसा ग्रासी काळ।।२५४।। गिळोनियां तारुण्यपण। आणी वार्धक्य कंपायमान। ऐसें काळाचें विंदान। दुर्धर पूर्ण ब्रह्मादिकां।।२५५।। (अध्याय ५)’’ म्हणजे, ज्याच्या-त्याच्या डोळ्यांदेखत काळ हा बालपण गिळंकृत करतो आणि मग तारुण्यदशेची मान मुरगळून त्या युवावस्थेचाही घास घेतो. तारुण्य संपवून तो कंपायमान असं वार्धक्य देतो! काळाचा हा खेळ ब्रह्मादिकांनाही संभ्रमात टाकणारा आहे! अहो, स्वर्गात जाऊनही अमरत्व लाभतं का? तर, नाही! पुण्यभोग संपताच स्वर्गातून मृत्युलोकात परतावं लागतं, असं भगवद्गीताही सांगते. (ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। अध्याय ९). एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जयाचेनि चपेटघातें। मरण आणी अमरांतें। मा मूर्ख तेथें जीवितातें। अक्षय चित्तें दृढ मानिती।।२५६।। (अ. ५)’’ म्हणजे, काळाच्या आघातानं अमरलोकांतील पुण्यात्म्यांनाही पुण्यभोग संपताच पुन्हा मर्त्यलोकात परतावं लागतं; मग मर्त्यलोकातील माणसांची दशा काय वर्णावी? तरीही मर्त्यलोकांतील मूढ जीव हा जणू त्याला मृत्यू कधी शिवणारही नसल्यासारखा भ्रमात वावरत असतो! अहो, हा देहच जिथं अनित्य आहे, अशाश्वत आहे, तिथं त्या देहाचे भोग शाश्वत कसे असतील? ‘‘मूळीं देहचि तंव अनित्य। मा तेथींचे भोग काय शाश्वत।। (२५७ व्या ओवीचा पूर्वार्ध/ अ. ५)’’ असा प्रश्नच एकनाथ महाराज करतात. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांच्या बोधाचं इथं स्मरण होतं. ते म्हणतात, ‘‘आपल्या शरीरातील परमाणू सारखे बदलत आहेत आणि शरीरात असंख्य कृमी जन्मून मरत आहेत. कालचे आम्ही मेलो व आता नवे झालो, तसंच क्षणानं आणखी नवे होऊ  व क्षणांत जगही बदलेल. ‘अनित्यानि शरीराणि’ अशा मृतप्राय, प्रेतवत आणि घाणेरडय़ा शरीराचा आपलेपणा, अभिमान, ममता व्यर्थ का वहावी? (श्रीदत्तप्रेमलहरी, पराग १९)’’ संत आणि ग्रंथ जरी कळकळीनं हे सांगत असले, तरी काळाच्या पकडीत घुसमटतानाही देहसुखाची लालसा काही मनातून सुटता सुटत नाही.