चैतन्य प्रेम

भौतिकाची समस्त आशा तुटली तरच मन स्थिर आणि आनंदी राहू शकतं, आशा हेच बंधन आहे; या आशयाचा आध्यात्मिक बोध ऐकून आपल्या मनात अनेक प्रश्न घोंघावतात. त्यांचा रोख असा असतो की, भौतिकातील दु:खांना इतकं नाकारता येईल का? ते व्यवहार्य आहे का? भक्ती करताना दु:खाची जाणीवही न उरणं शक्य आहे का? आणि इतकं टोकाचं ध्येयच मुळात सामान्य माणसाला अवास्तव वाटणारं नाही का? त्यामुळे भौतिकातील वास्तवाला नाकारणारी अध्यात्माची शिकवणच अवास्तव नाही का? या प्रश्नांच्या अनुषंगानं थोडा विचार करू. मुळात अध्यात्माच्या हेतूबाबतच आपल्या मनात गोंधळ आहे, हे या मनोदशेमागचं कारण आहे. भौतिक ओढीचा निरास, हीच ज्या अध्यात्मसाधनेची पहिली पायरी आहे. त्या साधनेनं माझी भौतिक स्थिती चांगली व्हावी, हे वाटणं हीच पहिली विसंगती आहे.  अभ्यास केला नाही, पण अनेक मंदिरांत दर्शन घेत परीक्षेतील यशासाठी प्रार्थना केली, तर काय उपयोग? तेव्हा भौतिकात यश हवं आहे ना? मग प्रयत्नही भौतिकातलेच केले पाहिजेत. ते प्रयत्न करूनही जर यश मिळालं नाही, तर प्रयत्नांत कुठे काही त्रुटी राहिली का, याचा शोध घेऊन प्रयत्नांत आवश्यक ती सुधारणा केली पाहिजे. मग भौतिकातील प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असलेल्या माणसाला साधनेचा काहीच आधार नाही का? उपयोग नाही का? तर आहे! साधना ही मनाची शक्ती वाढवते. परिस्थितीच्या स्वीकारासाठीचं धैर्य आणि प्रतिकूलतेचे चटके सोसण्याची सहनशीलता साधनेनं लाभते. साधनेनं दृश्य जगाचा प्रभाव क्षीणपणे का होईना, पण ओसरू लागतो. त्यामुळे हवं-नकोपणातली तीव्रता स्वत:लाच बोचू लागते. भौतिकातले प्रयत्न करताना पूर्वी जी काळजी वाटायची, चिंता वाटायची, त्यानं मनाचा अस्थिरपणा जसा वाढायचा; तसं साधनापथावर प्रामाणिक वाटचाल सुरू झाल्यावर वाटत नाही. पण जे केवळ आणि केवळ भौतिक स्थिती सावरावी या हेतूनंच भजन/भक्ती करतात, त्यांना एकनाथ महाराजांनी फटकारलं आहे. ‘एकनाथी भागवता’च्या ११ व्या अध्यायात अशा ‘भक्तां’वर टीका करताना भगवंत म्हणतो की, ‘‘ज्यांचें धनावरी चित्त। ते केवळ जाण अभक्त। ते जें जें कांहीं भजन करीत। तें द्रव्यार्थ नटनाटय़।।७५१।।’’ भौतिकाच्या ओढीनं भगवंताचं जे भजन होतं, ते प्रत्यक्षात भौतिकाचंच भजन होतं, भगवंताचं नव्हे! भगवंत पुढे म्हणतो, ‘‘मनसा वाचा कर्मे जाण। जेथ नाहीं मदर्पण। तें तें दांभिक भजन। केवळ जाण उदरार्थ।।७५२।।’’ मनानं भगवंताचं मनन नाही, वाचेला भगवंताविषयी बोलण्याचा छंद नाही आणि सगळी र्कमही विपरीत असतील; त्यात भगवंतकेंद्रित भाव नसेल, तर ते केवळ दांभिक भजन ठरतं.

chaitanyprem@gmail.com