चैतन्य प्रेम

भौतिक सुखाची इच्छा होणं, हे मनुष्य स्वभावाला अनुसरूनच आहे. पण परमात्म्याची भक्ती वा साधना ही भौतिक परिस्थिती सुधारण्याचा उपाय वा मार्ग नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं दोन प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ  शकतात. पहिला प्रश्न असा की, जर भक्तीमार्गानं वा साधनेनं संकटं दूर करू नये, असं म्हटलं तर प्रत्येक स्तोत्राच्या फलश्रुतीत ते स्तोत्र वाचल्यानं भौतिकातलं कोणतं संकट दूर होतं आणि कोणता लाभ होतो, हे का सांगितलं जातं? कित्येक पोथ्यांमध्ये तर कोणता अध्याय वाचल्यानं कोणती अडचण दूर होते, असंही मग का सांगितलं जातं? दुसरा प्रश्न असा की, कोणतं स्तोत्र कोणत्या संकटासाठी म्हणावं, याची काही माहिती नसलेल्या, पण निरपेक्षपणे साधनारत असलेल्या साधकाच्या साधनेनं वा भक्तीनं भौतिकातील संकटांचं निवारण होणार नाही का? या प्रश्नांचा विचार करू. अनेक स्तोत्रं, मंत्र यांचा उपयोग भौतिकातील अडचणी दूर करण्यासाठी हजारो वर्षांपासून केला जात आहे. त्यामागे एक फार वेगळा सकारात्मक विचारही आहे. संकटानं माणूस गांगरून गेलेला असतो. भौतिकातले प्रयत्न तो करत असतोच; पण परमात्म शक्तीची जोड मिळाली तर आपलं हे संकट वेगानं नष्ट होईल, असं त्याला वाटत असतं. संकटातही खरं तर महत्त्वाची असते ती मनाची स्थिती. अमकं स्तोत्र वाचल्यानं वा अमुक मंत्राचा अमुक कालावधीसाठी जप केल्यानं हे संकट दूर होईल, असा विश्वास मनात निर्माण झाल्यानं दोन गोष्टी घडतात. पहिली म्हणजे, संकटाचा वा दु:खाचा स्वीकार केला जातो! दुसरी गोष्ट म्हणजे, दु:खाला सामोरं जातानाही मनाची उमेद, धैर्य, मनोबळ टिकून राहतं! त्यामुळे माणूस निराशेच्या पकडीत सापडत नाही. मुख्य म्हणजे संकटानं गांगरून जो काळ निव्वळ चिंतेत सरला असता, त्यात चिंतनाची बीजं पेरली जातात. माणसाच्या जीवनात कोणतीही एकच एक परिस्थिती कधी नसते. आज अनुकूलता आहे, तर उद्या प्रतिकूलता असते. आज परिस्थिती प्रतिकूल असेल, तर उद्या अनुकूल असते. तेव्हा संकटाची परिस्थितीही निवळल्याशिवाय राहत नाही, पण स्तोत्रपठणानं, मंत्रजपानं, पोथी पारायणानं, उपवासानं, व्रताचरणानं ते संकट दूर होण्यापर्यंतचा काळ कमी चिंतेत सरतो आणि सत्कारणीही लागतो. आता दुसरा प्रश्न असा की, एखाद्याला असा कोणताही उपाय माहीत नसेल वा असा कोणताही उपाय न करता तो त्याच्या मुळातच सुरू असलेल्या साधनेवरच विसंबून असेल, तर त्याच्या त्या साधनेनं वा भजनानं संकट दूर होत नाही का? तर याचं उत्तर ‘हो’ असं आहे. पण ते भजन, ती साधना निस्सीम मात्र पाहिजे. संकट निवारणाचा हेतू त्याला चिकटता कामा नये. ‘मी एवढा जप करतो, मग हे संकट माझ्या वाटय़ाला का,’ असा प्रश्न आला, की जपाचा हेतूच बदलतो, हे मनाला समजावलं पाहिजे. पण मग तरीही जो निरपेक्ष भजन, स्मरण करतो, त्याचा सांभाळ परमात्म शक्ती करते. तो कसा, हे जाणण्यासाठी भजनाचं रहस्य जाणलं पाहिजे. भगवंतानं गीतेत सांगितलं आहे की, जो अनन्य होऊन माझंच चिंतन करतो, त्याचा योगक्षेम मी सांभाळतो. योग म्हणजे मिळणं आणि क्षेम म्हणजे मिळालेलं सांभाळलं जाणं. तेव्हा ज्याचं प्रामाणिक भजन सुरू आहे, भक्ती सुरू आहे, साधना सुरू आहे, त्याच्या मार्गातील भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही अडचणींकडे सद्गुरूचं लक्ष असतं! त्या अडचणींतून वाट काढत साधकाला त्याची साधना नीट करता यावी यासाठी परिस्थितीत साधनाकूल पालट घडत जातो.