चैतन्य प्रेम

जीवन अशाश्वत आहे. जो ‘मी’ या जगात वावरतो आहे तोच कालमर्यादेनं बद्ध आहे. म्हणजेच तो किती काळ जगेल याची शाश्वती नाही. तो परिस्थितीच्या पकडीत आहे. परिस्थिती ही काळानुरूपच अनुकूल वा प्रतिकूल होत असते. याचाच अर्थ कधी कोणती परिस्थिती वाटय़ाला येईल, कधी कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल याची काही शाश्वती नाही. अर्थात ‘मी’चं जीवन आणि त्या जीवनातली परिस्थिती या दोन्ही गोष्टी अशाश्वत आहेत. या ‘मी’ला काही आप्त जन्मानंच रक्ताच्या नात्यांनुसार लाभले आहेत. अनेक आप्त मित्र म्हणून लाभले आहेत. त्यानं निर्माण केलेल्या नात्यांनीही अनेक आप्त लाभले आहेत. या सजीव आप्तांइतक्याच या ‘मी’ला सुखदायी वाटत असलेल्या अनंत वस्तू आणि घरदार, शेतीवाडी, सोनंनाणं अशा निर्जीव वस्तूंशीही ममत्व भावानं तो बद्ध आहे. या व्यक्ती आणि वस्तूंना तो ‘माझे’ मानत आहे. पण जसा हा ‘मी’, पूर्णत: अशाश्वत अशा काळाच्या आणि परिस्थितीच्या मुठीत बद्ध आहे तसेच हे व्यक्ती व वस्तुरूपी ‘माझे’ही अशाश्वत अशा काळ आणि परिस्थितीत जखडले असल्याने अशाश्वतच आहे. तरीही या अशाश्वताच्या परिघात माझ्यासकट जो तो पूर्ण शाश्वत सुखी होण्यासाठी धडपडतो आहे. याच अशाश्वत प्रवासात आपले-परके, जवळचे-दूरचे, मित्र-शत्रू अशा अनंत गटांत माणसांची विभागणी करीत, मनात सदैव द्वंद्व पोसत अखंड निर्द्वद्व जगण्याची लालसा बाळगत आहे! या जीवनात जगण्याचा मुख्य आधार देहच आहे. त्यामुळे या देहाला सर्वतोपरी ‘सुखा’त ठेवणं आणि या देह-मनाच्या ‘दुखां’चं सदैव निवारण करीत राहणं, हेच आपलं जीवनध्येय बनलं आहे. जगण्यामागचा तोच एकमात्र हेतू ठरला आहे. त्यामुळे जगण्याचा केंद्रिबदू ‘मी’ आहे आणि जगण्याचा परीघ फक्त ‘माझे’पुरता विस्तारला आहे. अशा देहबुद्धीपलीकडे पाहण्याची दृष्टी नसलेल्या, देहबुद्धीपलीकडे एकही पाऊल टाकणारे पाय नसलेल्या, त्यापलीकडे काही ऐकता येईल असे कान नसलेल्या, त्यापलीकडे काही उच्चारता येईल असे तोंड नसलेल्या, त्यापलीकडे काही कर्म करता यावं अशी शक्ती असलेले हात नसलेल्या अर्थात पूर्णपणे देहबुद्धीच्या गाळात रुतलेल्या माणसाला संत देवबुद्धीकडे वळवत आहेत! देहबुद्धीपलीकडे एक पाऊलही ज्याला टाकता येत नव्हतं त्याला साधनेच्या उच्च शिखराकडे नेत आहेत! देहभावाशिवाय ज्याच्या मुखातून एक शब्द उमटला नव्हता, त्याच्या मुखातून मंगल नामोच्चार करवीत आहेत.. ‘मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिम्’ हेच तर आहे! पण ही साधना माणसाला स्वबळावर शक्यच नाही. का? तर थोडा विचार करू. माणसाची देहबुद्धी ही त्याला बाहेरच्या जगात भटकवत असते, बाह्य दृश्य जगाचा अर्थात दृश्याचा जो पसारा आहे त्यात भरकटवत भ्रमित करीत असते. तर देवबुद्धी ही आत वळवीत असते. पण जसा दृश्य जगात पसारा आहे तसाच या सूक्ष्म जगातही प्रथम पसाराच ‘दिसतो’ आणि ‘जाणवतो’! हा पसारा असतो या दृश्य जगाशी निगडित कल्पना, भावना आणि वासनांचा! त्यामुळे बाह्य जगाचा ‘त्याग’ करूनही मन जगाच्या ओढीतच अडकून राहतं. अंतर्मनातील हा जगप्रभाव ओसरला नसताना, मायेची सावली हवीशी वाटत असताना माणूस नित्य काय आणि अनित्य काय याची पारख स्वबळावर करूच शकत नाही. एकनाथ महाराज स्पष्ट सांगतात, ‘‘तोही ‘नित्यानित्यविवेक’। जाण पां निश्चित मायिक। एवं मायामय हा लोक। करी संकल्प सृष्टीतें॥५४॥’’