चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

माणसाला जर नित्य, शाश्वत आनंद हवा असेल, तर तो नित्य आणि शाश्वतापासूनच मिळू शकतो. यासाठी जीवनात जे जे अनित्य आहे, त्याची ओढ मनातून सुटली पाहिजे. जे जे नित्य आहे त्याच्या प्राप्तीची साधना मनापासून केली पाहिजे, हे खरं. पण ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या अध्यायात श्रीकृष्ण-उद्धव यांच्यातील संवादाच्या निमित्तानं एकनाथ महाराज एक मार्मिक गोष्टच सांगतात. ते म्हणतात, ‘‘जें जें ‘इंद्रियां’ गोचरें। तें तें जाण पां नश्वरें। हें नित्यानित्यविचारें। केलें खरें निश्चित।।५३।। तोही ‘नित्यानित्यविवेक’। जाण पां निश्चित मायिक। एवं मायामय हा लोक। करी संकल्प सृष्टीतें।।५४।।’’ नाथ सांगत आहेत की, ‘‘बाबा रे, जे जे इंद्रियांना जाणवतं ते ते नश्वर आहे.’’ म्हणजेच डोळ्यांना जे जे दिसतं, कानांना जे जे ऐकू येतं, याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांद्वारे बाह्य़ जगातलं जे जे अनुभूत होतं ते ते सारं नश्वर आहे. अनुभव, ज्या वस्तूचा वा दृश्याचा अनुभव घ्यायचा ती वस्तू व दृश्य आणि ज्यायोगे अनुभव घ्यायचा ती इंद्रियं हे सारंच नश्वरतेच्या कक्षेत आहे. या नश्वरात स्वबुद्धीच्या जोरावर मी जो जो निर्णय करीन, तो मायेच्याच प्रभावानुसार असेल. याचं कारण माझ्या बुद्धीवरही मायिक भ्रम-मोहाचाच पगडा आहे. त्यामुळे या बुद्धीनं मी अनित्यालाच नित्य मानू शकतो आणि नित्यालाच अनित्य मानू शकतो! जे सुखदायक आहे त्याला दु:खदायक मानून टाळू शकतो आणि जे प्रत्यक्षात दु:खदायक आहे त्याला सुखदायक मानून कवटाळू शकतो! जे हिताचं आहे त्याला अहितकर मानू शकतो आणि जे अहिताचं आहे त्याला हितकर मानू शकतो! तेव्हा या मायामय दृश्य जगात मन, बुद्धी आणि चित्तावर मायेचाच प्रभाव आहे. बुद्धीला मायामयतेचा बोध, मनात मायेचंच मनन आणि चित्तात मायेचंच अविरत चिंतन सुरू राहतं. त्यामुळे जे जे अशाश्वत आहे, त्याच्या प्राप्तीसाठीच माणूस जन्मभर धडपडत राहतो. खरं पाहता, माणसाची बुद्धी ही त्याच्या मनाच्याच पकडीत असते. मनाच्या ओढींची पूर्ती करण्यासाठी बुद्धी राबत असते. त्यामुळे मायामय जगात मायाप्रभावात जगत असलेल्या माणसाच्या मनातला प्रत्येक संकल्पदेखील मायेचंच बीजारोपण करतो. मग काय उपयोग? तेव्हा अंतर्बाह्य़ अखंड सुख हवं असेल, तर अंतर्बाह्य़ पालटही आवश्यक आहे. देहभावाच्या ठिकाणी आत्मभाव जागा झाला पाहिजे. पण हा पालट घडणार कसा आणि कुठे? हा पालट वरवरचा असून उपयोग नाही, दिखाऊ  असून उपयोग नाही. शरीरानं भगवी वस्त्रं घातली, टिळे-माळा धारण केल्या, पण मनाची धारणा बदललीच नसेल, तर काय उपयोग? अगदी त्याचप्रमाणे आत्मभावच नसेल, तर देहाला भगव्या वस्त्रांनी सजवलं तरी त्याचं जाणत्याला कौतुक उरत नाही! तेव्हा धारणेत सुधारणा करण्यासाठी मनावरच लक्ष दिलं पाहिजे. कारण देह तर कठपुतळी आहे आणि मन सूत्रधार आहे!