09 April 2020

News Flash

२८९. जीवन-बोध

अवघं जगच गुरूरूप भासणं, हे उत्तम शिष्याचं प्रमुख भावलक्षण आहे.

चैतन्य प्रेम

अवघं जगच गुरूरूप भासणं, हे उत्तम शिष्याचं प्रमुख भावलक्षण आहे. अर्थात, भोवतालच्या भौतिक जगातल्या प्रत्येक घडामोडीतून सद्गुरू आपल्याला काही शिकवत आहेत, अशी अखंड आणि अभंग धारणा झाली पाहिजे. त्या धारणेनं आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनातून, आपल्या वाटय़ाला येत असलेल्या प्रत्येक परिस्थितीतून केवळ सद्बोधाचा ठसा अंत:करणात उमटला पाहिजे. पण ही उत्तम शिष्याची गोष्ट झाली. तीच साधकाच्या साधनेची सुरुवात कशी असेल? जगाला गुरुत्व प्रथमच कसं देता येईल? जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे गुरू म्हणून कसं पाहता येईल? हे अशक्य आहे, असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. यदुराजालाही तसं वाटू शकतं, हे जाणून अवधूत म्हणतो, ‘‘ऐसें सांगतां अचाट। तूज वाटेल हें कचाट। तरी गुरु सांगो श्रेष्ठश्रेष्ठ। मानिले वरिष्ठ निजबुद्धीं।।३४५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). अवधूत सांगत आहे, ‘‘हे राजा, तुला हे ऐकून अचाट वाटेल, आश्चर्य वाटेल; पण मी जे अनेक गुरू याप्रमाणे केले, त्यातले मुख्य सांगतो ते ऐक!’’ आता अवधूतानं चोवीस गुरूंची नावं सांगितली; पण ही संख्या एवढीच नव्हती, हेच या ओवीवरून स्पष्ट होतं. आता हे चोवीस गुरू कोणते? अवधूत सांगतो की, ‘‘पृथ्वी वायु आकाश। अग्नि आप सीतांश। सातवा तो चंडांश। कपोता परिस आठवा॥३४७॥’’ म्हणजे पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि पाणी ही पंचमहाभूतं पहिले पाच गुरू आहेत. मग सीतांश म्हणजे चंद्र आणि चंडांश म्हणजे सूर्य हे आणखी दोन गुरू आहेत. कपोत पक्षी म्हणजेच पारवा वा कबुतर हा आठवा गुरू आहे. पुढे अवधूत सांगतो की, ‘‘अजगर सिंधु पतंग। मधुभक्षिका गज भृंग। हरिण मीन वेश्या सांग। नांवें सुभग ‘पिंगला’॥३४८॥’’ अजगर हा नववा, समुद्र हा दहावा, पतंग हा अकरावा, मधमाशी बारावी, हत्ती तेरावा, भ्रमर वा भुंगा हा चौदावा, हरीण पंधरावा, तर मासा हा सोळावा गुरू आहे. पिंगला नावाची देहविक्रय करणारी स्त्री सतरावी गुरू आहे. मग म्हणतो, ‘‘टिटवी आणि लेंकरूं। कुमारी आणि शरकारू। सर्प कातणी पेशस्करू। इतुकेन गुरू चोवीस॥३४९॥’’ म्हणजे टिटवी ही अठरावी, मूल हे एकोणीसावा, कुमारी ही विसावी, बाण तयार करणारा लोहार हा एकविसावा, सर्प हा बावीसावा, कांतणी तेविसावा, तर कुंभारीण माशी चोवीसावी गुरू आहे! मग यदुराजाला अवधूत सांगतो, ‘‘पावावया तत्त्व पंचविसावें। चोविसां गुरूंसी उपासावें। विवेकयुक्ति स्वभावें। गुरु भजावे निजबुद्धीं॥३५०॥’’ पंचविसावं तत्त्व म्हणजे परमात्मा; त्याच्या प्राप्तीसाठी या चोवीस गुरूंची उपासना अवधूतानं केली होती. तीसुद्धा कशी? तर विवेकयुक्तीनं, म्हणजेच या सगळ्यांमध्ये शाश्वत तत्त्व कोणतं आहे, हे विचारानं शोधून काढण्याच्या आणि त्या तत्त्वातून बोध ग्रहण करण्याच्या युक्तीला आत्मबुद्धीची जोड देऊन ही उपासना अवधूतानं केली आहे. अवधूताच्या शुद्ध, स्वच्छ, निर्मळ चित्तावर या चोवीस गुरूंच्या रूपकांतून जीवनबोधच ठसला. त्या बोधाचा प्रत्यक्ष आचरणात, जीवन व्यवहारात जसजसा सहज स्वीकार घडत गेला, तसतशी जीवन-साधनाच परिपूर्ण होत गेली. अवधूत सांगतो, ‘‘ठाकावया निजबोधासी। निजविवेकें अहर्निशीं। गुरुत्व देऊनि अनेकांसी। निजहितासी गुरु केले॥३५१॥’’ म्हणजे, आत्मज्ञान हृदयात नीटपणे ठसावे म्हणून अवधूतानं आत्मविचारानं अनेकांना अहोरात्र गुरुत्व दिलं, आत्महिताकरता हे गुरू केले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:10 am

Web Title: loksatta ekatmyog article 289 abn 97
Next Stories
1 २८८. गुण आणि दोष
2 २८६. आज आणि आत्ताच!
3 २८६. जगत्-गुरू!
Just Now!
X