चैतन्य प्रेम

जो अपराध करतो त्याच्यावर अपकार न करता त्याचं हितच साधून द्यायचं, हा पृथ्वीचा गुण अवधूत सांगतो. इतकी शांती ही आपल्याला अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. पण त्यासाठी आधी आपल्या अशांत होण्याची थोडी छाननी केली पाहिजे. आपल्या अशांत होण्याचं मुख्य कारण आपल्या मनासारखं काही न घडणं, हेच असतं. आता काही अपवाद वगळता, हे जे मनासारखं घडावंसं वाटणं असतं ना, त्यात आसक्तीयुक्त मोहाचा भाग अधिक असतो. पती वा पत्नी नको त्या माणसांवर विश्वास टाकत आहे, काही चुका वारंवार करीत आहे, असं वाटून जीवनाच्या जोडीदाराच्या अशा वागण्यानं अशांत होणं, समजू शकतं. त्या वेळी अमुकच व्हावं, हा आग्रह समजू शकतो. मुलाच्या हितासाठी पालकांकडून होणारी अशी आग्रही वर्तणूक समजू शकते. पण हे अपवाद झाले. प्रत्येकच गोष्ट आपल्याच मनासारखी व्हावी, हाच आपला आग्रह असतो आणि तो प्रत्यक्षात येणं कठीण असतं. त्यामुळे माणूस अशांत आणि अस्वस्थ असतो. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे : ‘गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत हे दु:खाचं मूळ कारण नसून, त्या गोष्टी मनात आहेत, हेच दु:खाचं खरं कारण आहे!’ तेव्हा मनात जेव्हा अवास्तव कल्पना येतात आणि त्या प्रत्यक्षात याव्यात, असा दुराग्रह सुरू होतो, तेव्हाच त्या गोष्टी आपल्या मनाच्या स्वास्थ्यावर परिणाम करू लागतात. त्यातून आपली सुटका करण्याचा एकच उपाय म्हणजे अवास्तव अपेक्षांना प्रथम तिलांजली देणं. यासाठी आपल्याला अतिशय सावधपणे आपल्या मनातल्या हालचालींकडे लक्ष द्यावं लागेल. कारण अनेकदा अनवधानानं आपण चुकीच्या कल्पनांत, आवेगांत, ओढीत अडकतो. पण मनाचं जर निरीक्षण सुरू असेल, तर आपण चुकीच्या ओढींत स्वत:हून गुंतत नाही ना, याचं भान राहील. अवधान असलं, तर अनवधानानं होऊ शकतात अशा चुका टळतील. अशांतीची कारणंही तेवढीच टाळता येतील. एकनाथ महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे, ‘‘शांतीचेनी मंत्रें। मंत्रुनी विभूती। लाविली देहाप्रती। सर्व अंगा॥१॥’’ म्हणजे मी शांतीच्या मंत्राची विभूती देहाला आणि सर्व अंगांना लावली. विभूती म्हणजे राखच, पण तिच्यात ईश्वरी दिव्यत्व, पावित्र्याची भावना असते. आधीच ही विभूती दिव्य आणि त्यात ती शांतीच्या मंत्रानं युक्त आहे. ती स्थूल आणि सूक्ष्म अशा वासनात्मक देहाला फासली. त्यामुळे जीवनाचं बाह्य़ आणि आंतरिक अंगही उजळून निघालं. त्यानं काय झालं? तर, ‘‘तेणें तळमळ। हारपली व्यथा। गेली सर्व चिंता। पुढिलाची॥२॥’’ त्यामुळे सर्व तळमळ, व्यथा हरपली आणि सर्व चिंताही गेली. ही चिंता ‘पुढिलाची’ आहे. हा शब्द भूतकाळाचा तसंच भविष्यकाळाचाही संकेत करणारा आहे. अर्थात हे शांतीभस्म सर्वागाला लेपल्यानं मागची-पुढची चिंताही गेली. तेव्हा सर्वसामान्य साधकाला पहिल्याच टप्प्यात पृथ्वीसारखी अनाग्रही आणि अपराध्यावरही उपकार करणारी वृत्ती अंगी बाणवता येणार नाही. अपराध्यालाही तृप्त करण्याचा गुण कसा आहे? तर, ‘‘ऊंसु मोडी त्या गोड भारी। छेदितें शस्त्र गोड करी। पिळिलिया आळिलियावरी। स्वादाचिया थोरी अपकाऱ्यां देतु।।३७५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे, ऊस मोडला तरी त्याची गोडी कमी होत नाही. तो ज्या शस्त्रानं छेदला जातो, ते शस्त्रही तो गोड करून टाकतो. त्याला चरकात पिळलं वा कढवलं तरी तो अधिकच गोड चव देतो! तशी पृथ्वी अपराध्यावरही कृपाच करीत असते.