09 April 2020

News Flash

३०३. समदृष्टी, समभाव

प्राणशक्तीमुळे इंद्रियांना बळ मिळतं, त्यांचं चलनवलन होतं. या प्राणशक्तीचा आधार असतो तो प्राणवायू.

चैतन्य प्रेम

प्राणशक्तीमुळे इंद्रियांना बळ मिळतं, त्यांचं चलनवलन होतं. या प्राणशक्तीचा आधार असतो तो प्राणवायू. या प्राणवायूचा संचार देहात होत असतो म्हणून देहाचं चलनवलन सुरू असतं. त्या देहकर्मापासून मात्र हा प्राणवायू अलिप्त असतो. पण हा प्राणवायू अभेद भावानं चराचरात व्याप्त असतो. अवधूत राजा यदुला म्हणतो की, ‘‘ब्रह्मादिकांचा देह पाळूं। का सूकरादिकांचा देह टाळूं। ऐसा न मानीच विटाळू। प्राण कृपाळू समभावें।।४१६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा) काय सुंदर वर्णन आहे! हा प्राणवायू त्रलोक्यात पसरला आहे. ब्रह्मादी देवांपासून लहानशा किडय़ापर्यंत सर्वच जण या प्राणवायूच्या बळानं कार्यरत आहेत. पण ब्रह्मादिकांच्या, राजा-महाराजांच्या देहांचा प्रतिपाळ तेवढा करीन, त्यांना जगवीन, पण डुक्कर आदी प्राण्यांच्या देहात प्रवेश करणार नाही, असा भेदभावमूलक विचारही हा प्राणवायू करीत नाही. अवधूत म्हणतो, ‘‘आवडीं प्रतिपाळावा रावो। रंकाचा टाळावा देहो। ऐसा प्राणासीं नाहीं भावो। शुद्ध समभावो सर्वत्र।।४१८।।’’ श्रीमंताच्या देहात सुखानं प्रवेश करावा, त्याचा देह जगवावा आणि गरिबाला टाळावं, त्याचा देह जगवू नये, असा भावही प्राणास शिवत नाही. शुद्ध समभावानं तो सर्वत्र वावरत असतो. हा जो समभाव आहे, तो प्राणवायूकडून- म्हणजेच वायूकडून योगी शिकतो, असं अवधूत म्हणतो. खरं पाहिलं तर यापुढेही योगी एक पाऊल टाकतो. कसं आहे पाहा, प्राणवायू काही गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अडाणी, सबळ-दुर्बळ, असा भेद करीत नाही. पण माणूस मात्र हा भेद पाळतो! एकच प्राणवायू हरणालाही जगवतो आणि वाघालाही जगवतो, पण हरिण आणि वाघ एकत्र काही नांदू शकत नाहीत. आता ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या न्यायानं त्यात गैरही नाही. पण योगी एक पाऊल पुढे असं टाकतो की, तो सगळ्यांना समत्वभावानं पाहतोच, पण त्यांच्यातही समत्वभाव नांदवू शकतो! याबाबतचा बाळकृष्ण महाराज सुरतकर यांच्या चरित्रातला एक हृदयंगम प्रसंग स्मरतो. हा प्रसंग त्यांच्या साधनाकाळातला आहे. तात महाराज हे त्यांचे सद्गुरू होते. त्यांना ते अधेमधे काही धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथ वाचून दाखवीत. ते वाचताना त्यांच्या मनात संशय आणि विकल्पही उसळी मारत. एकदा ऋषी आश्रमात वाघ, सिंह आणि गाय निर्भयपणे नांदत असल्याचा उल्लेख वाचून त्याच्या सत्यतेबद्दल त्यांच्या मनात विकल्प आला. वाघासमोर गाय आल्यावर तिला खाल्ल्याशिवाय तो कसा राहील, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. पण ते काही बोलले नाहीत. एक-दोन दिवसांत तात महाराजांनी त्यांना भोजनासाठी बोलावलं. तीन पानं मांडलेली. एका पानावर महाराज आणि दुसऱ्या पानावर बाळकृष्णबुवा बसले. तिसरं पान कुणासाठी, असा प्रश्न बुवांच्या मनात आला. थोडय़ा वेळात तात महाराजांनी पिंजऱ्यातील पोपट काढून त्याला पानावर बसवलं. मग घरातल्या मांजरीला आणि दारातल्या कुत्र्यालाही बोलावलं. हे तिघं एकाच ताटातलं अन्न एकोप्यानं खाऊ  लागले! जे सदैव एकाच परम भावात निमग्न आहेत, ते दुसऱ्यातील समत्वभावही जागा करू शकतात, हेच यातून दाखवलं! तेव्हा चराचरांतून योगी जे गुण शिकतो त्याची अनुभूती तो इतरांनाही देववितो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 12:12 am

Web Title: loksatta ekatmyog article 303 abn 97
Next Stories
1 ३०२. दुसरा गुरू : वायू
2 ३०१. अदृष्टाची फळं
3 ३००. पराधीनतेचा स्वीकार
Just Now!
X