चैतन्य प्रेम

सद्गुरूशी मन एकाकार कसं करावं? ‘भगवद्गीते’त त्याचा संकेत आहे. ‘गीते’तला ‘‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।’’ हा उद्घोष प्रसिद्धच आहे. म्हणजे काय? तर माझ्या मनाशी मनानं तदाकार हो! त्यासाठी काय आवश्यक आहे? तर माझ्यापासून मन, चित्त, बुद्धीनं कधीच विभक्त न होणारा भक्त बन, माझीच पूजा करून स्वत: पूज्य म्हणजे शून्य अर्थात कर्तेपणाचा भाव पूर्ण ओसरलेला असा हो, केवळ माझ्या नमस्कारातच लय पाव! ‘नमस्कार’ शब्दाचा सूचकार्थ किती व्यापक आहे! ‘न-म: आकार:’ म्हणजे ‘मी’ असा काही आकारच उरलेला नाही, केवळ तूच तू आहेस, या भावनेनं डावा-उजवा हात जोडला जाणं; म्हणजे जे काही उरलंसुरलं भलंबुरं आहे, त्या सगळ्यांनिशी मी तुला समर्पित आहे, हा भाव असणं हाच खरा नमस्कार आहे! विशेष भाग असा की, हा जो उद्घोष आहे ना, ‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु’ हा गीतेत दोनदा आला आहे! गीतेत हा अपवाद वगळता कोणताही श्लोक दोनदा आलेला नाही. प्रथम हा श्लोक नवव्या अध्यायात आणि नंतर अखेरच्या १८ व्या अध्यायात आला आहे. म्हणजेच ‘गीते’च्या मध्यावर आणि अखेर असा दोनदा तो आहे. नववा अध्याय हा भगवंताशी एकरूपतेचं, ‘परम गुह्य़तम’- म्हणजे गोपनीय ज्ञानातीलसुद्धा परम गोपनीय ज्ञान प्रदान करणारा आहे. तर अठरावा अध्याय हा साररूपानं, भक्ताला जीवनसंघर्षांला सामोरं जाण्याआधी नेमकं काय करावं, हे निर्वाणीचं सांगणारा आहे. या दोन्ही जागी ‘मन्मना भव’चाच मंत्रोच्चार आहे. नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि युक्त्वैवम् आत्मानम् मत्परायण:।।’’ म्हणजे, ‘माझ्या मनाशी तुझं मन एकाकार कर, (त्यासाठी) माझा भक्त हो, माझं अर्चन-पूजन कर, मला नमस्कार कर. माझ्यात रममाण झालास की, मग तू मलाच पूर्णपणे येऊन मिळशील!’ या श्लोकांचा माउलींनी जो मधुर भावानुवाद केला आहे, त्यातील काही ओव्या अशा : ‘‘तू मन हें मीचि करीं। माझिया भजनीं प्रेम धरीं। सर्वत्र नमस्कारीं। मज एकातें।।५१७।। माझेनि अनुसंधानें देख। संकल्पु जाळणें नि:शेख। मद्याजी चोख। याचि नांव।।५१८।। ऐसा मियां आथिला होसी। तेथ माझियाचि स्वरूपा पावसी। हें अंत:करणींचे तुजपासीं। बोलिजत असें।।५१९।।’’ (अध्याय नऊ). १८ व्या अध्यायात यात किंचित भर घालत भगवंत पुन्हा सांगतात की, ‘‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।।’’ म्हणजे, ‘माझ्या मनाशी एकरूप हो, (त्यासाठी) माझा भक्त हो, माझं अर्चन-पूजन कर, मला नमस्कार कर. याप्रमाणे मत्परायण झालास, की तू मलाच पूर्णपणे येऊन मिळशील! हे अर्जुना, मी तुला हे प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे कारण तू माझा प्रिय सखा आहेस!’ या श्लोकांचा माउलींनी प्रकट केलेला भावानुवाद असा : ‘‘तरी बाह्य़ आणि अंतरा। आपुलिया सर्व व्यापारा। मज व्यापकातें वीरा। विषयो करी।। आघवां आंगीं जैसा। वायु मिळोनि आहे आकाशा। तूं सर्व कर्मी तैसा। मजसीचि अस।। किंबहुना आपुलें मन। करीं माझें एकायतन। माझेनि श्रवणें कान। भरूनि घालीं।।’’ (१३५३-५५). या ओव्यांमध्ये या एकरूपतेची प्रक्रियाच माउलींनी उलगडायला सुरुवात केली असून ‘एकायतन’ हा फार गूढमधुर शब्द योजला आहे. माउलींनी प्रकाशमान केलेली ही प्रक्रिया थोडी जाणून घेऊ.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

–