चैतन्य प्रेम

माणूस पैसा, मालमत्ता, नावलौकिक आणि आपली माणसं याच गोष्टींना सर्वस्व मानत असतो. ते सर्वस्व टिकवण्यासाठी तो धडपडत असतो. पण त्याच्या हे मात्र लक्षात येत नाही, की हे सगळं या जन्मापुरतं आहे! या जन्मातदेखील त्यांच्या शाश्वतीची कोणतीही हमी देता येत नाही. म्हणजेच पैसा आज आहे, उद्या वाढेल, घटेल किंवा नसेलही! इतरही गोष्टींची तीच गत आहे. मालमत्ता आज आहे, उद्याचा भरवसा नाही. नावलौकिक आज आहे, उद्याची हमी नाही. आपली माणसं आज आपल्यापाशी आहेत, उद्याही त्यांचा-माझा तसाच संयोग राहील, याची निश्चिती नाही. नोकरी, शिक्षण, लग्न यामुळे माणसं देहानं दुरावली तरी मनानं जवळ असू शकतात; पण गैरसमजानं वा वितुष्ट आल्यानंही वियोग होऊ शकतो. काळानं तर कायमचाच वियोग स्वीकारावा लागतो. याचाच अर्थ ज्या ज्या गोष्टींना आपण सर्वस्व समजतो, त्यावर आपली निर्विवाद सत्ता नाही. त्यावर आपला ताबा नाही. पुनर्जन्माच्या सनातन तत्त्वज्ञानानुसार, या जन्मात आपल्या वाटय़ाला जी जी माणसं आली, त्यांचा आणि आपला गेल्या अनेक जन्मांचा संबंध आहे आणि पुढचे कित्येक जन्म तो राहू शकतो. कारण प्रारब्ध! आपण एकमेकांशी जे आणि जसं वर्तन करतो, त्याची एकमेकांत तशीच परतफेड करावी लागते. त्याशिवाय कर्माचे ठसे नष्ट होत नाहीत. पण ही प्रारब्धानुसारची अटळ देवाण-घेवाण करीत असतानाच, नव्या मोहासक्तीतून आपण नवी र्कम करतो आणि त्यातून नवी देवाण-घेवाण शिल्लक उरते. बरं, या माणसांना आपण सर्वस्व मानून त्यांच्यावर अपरंपार प्रेम जरी करीत असलो, तरी पुढल्या जन्मी त्यातल्या लेशमात्र गोष्टीचं स्मरणही उरत नाही. तर अशी ही क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध कर्माची साखळी तुटता तुटत नाही. ती तोडण्यासाठी कर्तव्यकर्म करताना मन त्यात न गोवता परमतत्त्वाच्या स्मरणात ओवण्याचा योग साधावाच लागतो. हा ‘योग: कर्मसु कौशलम्’- केवळ आणि केवळ सत्पुरुषाच्याच आधारावर साधता येतो. कारण माझं कर्तव्यकर्म नेमकं कोणतं, हे मलाच कळत नसतं. त्यामुळे कर्तव्यांची सीमा ओलांडून मी मोह-आसक्तीयुक्त कर्म यथेच्छ करीत असतो. सत्पुरुष ती माझी अधोगती थोपवतात! त्यासाठी खरं सर्वस्व त्यांच्या चरणीं स्वाहा करावं लागतं. हे सर्वस्व म्हणजे माझा अहंभाव! त्या अहंभावातूनच तर ‘मी’ आणि ‘माझे’चं जाळं तयार करून मी त्यात स्वत: फसत जातो! जो ‘मी’ जगामागे वाहवत जात होता, तो सत्पुरुषाच्या चरणीं वाहिला गेला, तर शाश्वत सुखाच्या वाटेवर पावलं पडू लागतात. म्हणूनच अवधूत सांगतो, ‘‘तें पडतांचि योगियांच्या मुखीं। संचित क्रियमाणें असकीं। जाळोनियां एकाएकी। करी सुखी निजपदीं।।५०२।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). पण हे त्यांच्या चरणीं सर्वस्व वाहणं सोपं आहे का हो? सोपं जाऊच द्या, पण शक्य तरी आहे का हो? तर स्वबळावर ते शक्य नाही! पण मनात तशी प्रामाणिक इच्छा जरी झाली, तरी ती समर्पणाची प्रक्रिया भगवंतच घडवू लागतो! जगामागे वाहवत जाऊन आपण किती फटके खाल्ले, किती ठेचकाळलो, किती वेळा खचलो; या अनुभवाचं स्मरण जरी झालं ना, तरी वाहवत जाणं थांबेल आणि सत्पुरुषाच्या चरणी जीवन वाहिलं जाईल. पण पुन्हा प्रश्न असा की, सर्वस्व वाहून टाकायचं म्हणजे नेमकं काय?