चैतन्य प्रेम

‘धर्म’ अर्थात यथायोग्य धर्माचरण; ‘अर्थ’ म्हणजेच योग्य मार्गानं संपत्ती मिळवणे, तिचा व्यय व विनियोग आणि ती वाचवणे; तसेच ‘काम’ म्हणजे देहसुखासकट सर्व कामनांच्या पूर्तीसाठी योग्य मार्गानं प्रयत्न करणे; या तीनही गोष्टींचा आधार गृहस्थाश्रम आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सनातन संस्कृतीनं चार पुरुषार्थ मानले आहेत. विशेष म्हणजे, अर्थ आणि काम याची माणसाला स्वाभाविक ओढ आहे. पण या दोहोंना धर्म आणि मोक्ष या तटबंदींमध्ये बंदिस्त केलं आहे! म्हणजेच ‘अर्थ’ अर्थात दैहिक, तसेच काम म्हणजे ‘मानसिक’ व ‘भावनिक’ सुखासाठी माणूस जगत असला तरी त्याचा पाया अधर्म नव्हे, तर धर्म असला पाहिजे आणि त्याचं ध्येय मोक्ष अर्थात बंधनरहित जीवन्मुक्तीच असलं पाहिजे, असा विलक्षण दंडक आहे. आपली प्रिया आणि पिल्लं गतप्राण झालेली पाहताच कपोत मनानं खचला. आता धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थाचा आधार असलेला गृहस्थाश्रम भंगला आहे, पण अतृप्त काम उरला आहे! म्हणजे अजून माझी प्रिया जगली असती, तर पिल्लं मोठी झाल्यावर त्यांचं वात्सल्यसुख आम्हाला उपभोगता आलं असतं, अशी कामना हृदयात कायम आहे. आता एवीतेवी गृहस्थाश्रम आटोपलाच आहे, तर चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो तरी साधून घ्यावा, असं कुणी म्हणत असेल, तर तेही शक्य नाही! का? तर कपोत म्हणतो की, ‘‘ऐसें म्हणसी जरी निगुतीं। ये अर्थी मानी दुर्मती। विषयवासना नोसंडिती। कैसेनि मुक्ति लाधेल।।६०९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). मती दुर्मती झाली आहे आणि विषयवासनेचं प्रेम चित्तात खोलवर कायम आहे; मग जीवन्मुक्ती कशी शक्य आहे, असा कपोताचा प्रश्न आहे. मृत्यू कुणालाही आवडत नाही. अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू तर हृदय विदीर्ण करणारा असतो. अनेक लोकांचे प्राण वाचवताना प्राणांची आहुती दिलेल्या पुत्राचा मृत्यू धीरोदात्तपणे एका मातेनं स्वीकारल्याची घटना अगदी ताजी आहे. तसा स्वीकार आपण करू शकतो का हो? नाही! आणखी एका ज्येष्ठ साधिकेच्या जीवनातला प्रसंग आठवतो. परगावी राहणारा एकुलता एक मुलगा गेला. तसं त्यांना कळवलं मात्र नाही. ‘‘मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे, लगेच या,’’ एवढा निरोप गेला होता. मुलाच्या घराजवळ त्या आल्या आणि बाहेरची ताटकळती गर्दी पाहिली. तोच हातातला भ्रमणध्वनी वाजला. त्यांचे सद्गुरू बोलत होते. म्हणाले, ‘‘परमेश्वरानं तुम्हाला सर्व जबाबदाऱ्यांतून आता मुक्त केलं आहे! उरलेलं आयुष्य त्याच्या चरणीं व्यतीत करायचं आहे!’’ त्यांनी मला सांगितलं की, ‘‘त्या एका वाक्यानं मी सावरले! खंबीरपणे सामोरी गेले!’’ आता त्या संन्यस्त जीवन जगत आहेत. ही उदाहरणं आपल्या मनाला भिडतात हो, पण ती आचरणात उतरतील का? ‘‘प्रपंचातल्या जबाबदाऱ्यांतून सद्गुरूंनी मला एकदाचं मोकळं करावं, म्हणजे मी साधना करायला मोकळा होईन,’’ असं अनेक जण म्हणतात. पण प्रपंचात कितीही चढउतार होवो, मी साधनेसाठी मोकळा आहेच, असं कुठे मानतात? किंवा कपोताप्रमाणे प्रपंचच संपणं, ही ‘मोकळं होण्या’ची व्याख्या मानतील का? तेव्हा, जी दशा कपोताची तीच आपली आहे. म्हणूनच कपोत म्हणतो की, विषयसुखाच्या कामना अपूर्त असतानाच विषयसुखाची साधनं नाहीशी झाल्यावर मोक्षसुखासाठी प्रयत्न करण्याची इच्छा मनाला शिवेल तरी का?