News Flash

३९३. ढिगारा

लाकूड पोखरण्याचं सामर्थ्य असलं तरी मिटलेल्या कमळपुष्पात अडकलेला भुंगा त्या पाकळ्या चिरून जीव वाचवत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

अवतीभोवती पसरलेल्या सृष्टीकडून आणि माणसांकडून साधक बरंच काही शिकू शकतो. त्या प्रत्येकात कोणता ना कोणता गुण असतोच. त्या गुणाकडे नीट लक्ष द्यावं आणि तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. एवढय़ानंही आध्यात्मिक वाटचालीचा वेग वाढतो. एखाद्या गोष्टीत अवगुण जरी दिसला, तरी तोसुद्धा खूप काही शिकवतो. सर्व बळ आणि भौतिक संपदा असली, तरी एक अहंकार ते सारं काही मातीमोल कसं करतो, हे रावणाकडून शिकता येतं. लाकूड पोखरण्याचं सामर्थ्य असलं तरी मिटलेल्या कमळपुष्पात अडकलेला भुंगा त्या पाकळ्या चिरून जीव वाचवत नाही. मोहापुढे सामर्थ्य कसं फिकं पडतं, हे जणू हा सृष्टीतला भुंगा शिकवतो. तेव्हा या समस्त चराचरांतील अनंत घटक साधकाला जागृत करीत असतात. त्यांच्यातील गुणच नव्हे, तर अवगुणही खूप काही शिकवत असतात. जणू त्याचे ‘गुरू’ ठरत असतात. योगी अवधूतानं यदुराजाला असे प्रमुख २४ गुरू सांगितले. हे सांगण्यामागेही मोठी भूमिका आहे, जी पटकन लक्षात येत नाही. सामान्य माणसाच्या अवतीभोवती जी सृष्टी असते तीच योग्याच्या भोवतीही असते. पण सामान्य माणूस किंवा साधक त्या जगात मोहानं, आसक्तीनं अडकतो; तर योगी त्या जगाकडून काही ना काही अलिप्तपणे शिकतो. तेव्हा साधकानं जगाकडे नेमकं कोणत्या दृष्टीनं पाहावं, हीच शिकवण अवधूत या गुरुवर्णनातून देत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेला माणूस स्वबळावर तो ढिगारा दूर करू शकत नाही. जो ढिगाऱ्याबाहेर आहे, तोच अशा माणसाला वाचवू शकतो. तसे आपण जगाच्या आसक्तीच्या ढिगाऱ्याखाली दबून आहोत. त्यातून बाहेर काढणारा गुरूच आवश्यक आहे. गंमत अशी की, आपण ढिगाऱ्याखाली दबलो आहोत, हेच आपल्याला जाणवत नाही की पटतही नाही. आपल्या सगळ्या प्रार्थना या तो ढिगारा वाढविण्यासाठीच असतात! गुरू आपल्याला त्या ढिगाऱ्याची जाणीव करून देत असतात. एकदा आसक्ती गेली की ढिगाराच संपला. मग त्याच जगात सुखानं राहायला काय हरकत आहे? तर या गुरुवर्णनातून अवधूत आपल्याला अवतीभोवती पसरलेल्या जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देत आहे. याच जगात त्याला गवसलेल्या २४ गुरूंपैकी नऊ गुरू आपण पाहिले. आता दहावा गुरू आहे समुद्र! पण या समुद्राशी योग्याचंच साधम्र्य अवधूताला जाणवलं. म्हणजे समुद्राचे अनेक गुण योग्याच्या ठायीही त्याला आढळले. इतकंच नव्हे, तर काही बाबतींत योगी अधिक सरस आहे, हेही जाणवलं. आता पृथ्वीचा विचार करता ७१ टक्के वसुंधरा ही पाण्यानं व्याप्त आहे. त्या पाण्यातील ८० टक्क्यांहून अधिक पाणी समुद्राचंच आहे. त्यामुळे स्थूलामध्ये जेव्हा अमर्याद, अथांगतेसाठी रूपक वापरावं लागतं तेव्हा ‘समुद्र’ हा एकमेव पर्याय ठरतो! इथंही गांभीर्य आणि निर्मळता हे योग्याचे गुण समुद्राकडून शिकण्यासारखे आहेत, असं अवधूत सांगतो. त्यामुळेच समुद्र हा दहावा गुरू आहे. अवधूत सांगतो की, ‘‘समुद्र जो गुरू करणें। त्याचीं परिस पा लक्षणें। गंभीरत्व पूर्णपणें। निर्मळ असणें इत्यादि।।४१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे गंभीरत्व आणि निर्मळपणा आदी या गुरूची लक्षणं आहेत! आता गंभीरपणा आणि निर्मळपणा हे दोन्ही मनाचे सूक्ष्म गुण आहेत. या दोन्ही गुणांचा अर्थ आपल्याला समजलाय, असं वाटतं; पण तो खरंच समजतो का हो?

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:38 am

Web Title: loksatta ekatmyog article 393 zws 70
Next Stories
1 ३९२. शब्द आणि अनुभव
2 ३९१. शिकवण
3 ३९०. ध्येयसमर्पित
Just Now!
X