श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘‘जाणावें ते काय नेणावें ते काय। ध्यावे तुझे पाय हें चि सार।।१।। करावें तें काय न करावें तें काय। ध्यावे तुझे पाय हें चि सार।।ध्रु.।। बोलावें तें काय न बोलावें तें काय। ध्यावे तुझे पाय हें चि सार।।२।।’’ काय जाणावं आणि काय न जाणावं, या फंदात न पडता हे सद्गुरो, तुमचे पाय ध्यावे, हेच खरं. काय करावं, बोलावं आणि काय न करावं, न बोलावं, या विचारांत न फसता, तुझे पाय ध्यावे, हेच खरं. इथं ‘ध्यावे’ हा मोठा अर्थगर्भ शब्द प्रकटला आहे. ध्यावे म्हणजे संपूर्ण धारण करावेत, स्वीकारावेत, आत्मसात करावेत. ‘पाय’ म्हणजे त्या पायांचा मार्ग! ‘पुढे गेले त्यांचा शोधीत मार्ग’ असंही एका अभंगात म्हटलंय. म्हणजे संत ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं जाऊन त्यांना शोधावं. हा मार्ग म्हणजे बोधानुरूप आचरण! तसंच तुमचे पाय ध्यावेत म्हणजे तुमच्या बोधानुरूप आचरण करावं, एवढंच मी जाणतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा पिंगलेला प्रथम आपल्या तुच्छपणाचं ‘ज्ञान’ झालं. आपलं तुच्छत्व ज्याला उमगलं त्यालाच भगवंताचं दिव्यत्व उमगतं. मग तेच दिव्यत्व त्याच्यातही प्रकाशू लागतं! ‘हस्तामलक टीका’ या लघुग्रंथात श्रीएकनाथ महाराज म्हणतात, ‘‘मुंगी लहान जगामाझारीं। ते मुळींहूनि चढे वृक्षपर्णाग्रीं। तेवीं अकिंचन जन संसारीं। ब्रह्म साक्षात्कारीं परब्रह्म।।३३०।।’’ म्हणजे मुंगी अगदी लहान असते, पण ती झाडाच्या मुळापासून सर्वात वरच्या पानाच्या टोकापर्यंत सहज चढून जाऊ शकते, तसा जगातल्या सर्व मोठेपणाच्या दृष्टीनं जो कफल्लक आहे, त्यालाच परम दिव्य साक्षात्कार होऊ शकतो. पिंगलेचं मनही या धारणेनं असं व्यापलं की ती स्वत: दिव्यत्वानं भरून गेली. देह प्रारब्धभोगात राहेना का, माझं अंत:करण परमात्म चिंतनाच्या परम सुखभोगात राहील, असा तिचा दृढनिश्चय झाला. भगवंतानं कृपा करून मला वैराग्य दिलं आहे, दुराशेतून आणि विषय मोहातून सोडवलं आहे, या जाणिवेनं तिला भरून आलं. ती म्हणाली, ‘‘तो उपकार मानूनिया माथा। त्यासी मी शरण जाईन आतां। जो सर्वाधीश नियंता। त्या कृष्णनाथा मी शरण।।२६८।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). त्याच्या ऋणाचं स्मरण राखून मी त्याला शरणागत होईन. सनातन तत्त्वज्ञानानुसार देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण ही तीन ऋणं आहेत. मनुष्यानं यज्ञ, भक्ती आणि कर्म व वंश परंपरेनुसार ती फेडली पाहिजेत, असंही हे तत्त्वज्ञान सांगतं. पण या सर्वापेक्षाही मोठं आणि कधीही फेडलं न जाऊ शकणारं ऋण आहे ते सद्गुरूंचं! ज्यांनी मनुष्य जन्म दिला, माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली आणि तिला प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाला दिव्यत्वाचं कवच दिलं त्यांचे ऋण कसे फिटणार? त्यांना शरणागत होणं, हाच एकमेव उपाय आहे. शरणागत म्हणजे चरणागत होणंच! त्या चरणांची सेवा म्हणजे त्यांच्या बोधाचं सेवन करीत त्यांच्या मार्गदर्शनानुसार जगणं, हीच खरी शरणागती. त्यानं काय साधलं? पिंगला म्हणते, ‘‘शरण गेलियापाठीं। सहज संतुष्ट मी ये सृष्टीं। स्वभावें सत्श्रद्धा पोटीं। जीविका गांठी अदृष्ट।।२६९।।’’ त्याला शरण गेल्यानं परिस्थिती कशीही असो, मी सहज सुखीच होईन. माझ्यात सत्श्रद्धा उपजली तर जे आहे त्यात मला समाधान वाटू लागेल. माझ्या जीविकेचा भार दैवावर ठेवून मी अलिप्त होईन! काय अवस्था आहे पाहा! परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही याचना नाही. गंगेत उडी घेऊन कुणी कोरडं राहणार नाही तसंच परम सुखस्वरूपाला शरण गेल्यावर मी दु:खरूप राहणारच नाही, हा भाव आहे!

– चैतन्य प्रेम

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत