आशेचा निरास होऊन पिंगलेला प्राप्त झालेल्या आत्मस्थितीने अवधूताला एक बोधसूत्र गवसलं; ते असं की, ‘‘आशा तेथ लोलुप्यता। आशेपाशी असे दीनता। आशा तेथ ममता। असे सर्वदा नाचती।।३०७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). जेथे आशा असते तिथं दीनपणा व ममत्व सतत असतात. कारण आस लागली की लालसा, लाचारी, आसक्ती वाढत जाते. मग अवधूत म्हणतो, ‘‘आशेपाशीं महाशोक। आशा करवी महादोख। आशेपाशीं पाप अशेख। असे देख तिष्ठत।।३०८।। आशेपाशीं अधर्म सकळ। आशा मानीना विटाळ। आशा नेणे काळवेळ। कर्म सकळ उच्छेदी।।३०९।।’’ म्हणजे, आशा असेल तिथं महान शोक वसत असतो. आशा फार मोठी पापकृत्यं घडवून आणते. पाप आणि आशा जोडीनंच तिष्ठत असतात. आशेजवळ अधर्मच सहजतेनं असतात, तिला काहीच वर्ज्य नसतं, ती काळवेळ पाहात नाही. सर्व सत्कर्माचा उच्छेद करून टाकते. एका अभंगात संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘आशेपाशीं नाहीं सुख। आशेपाशीं परम दु:ख।। आशा उपजली देवासी। तेणें नीचत्व आले त्यासी।।’’ अहो, या आशेपाशी सुख नाही, तर परम दु:ख आहे. देवलोकातील देवांच्या मनातही जेव्हा आशा उपजली ना तेव्हा त्यांना नीचत्व आलं, कमीपणा आला. मग सामान्य माणसाची काय कथा? तेव्हा आशेचं बोट धरून भक्ती केली, तरी ती फळत नाही. एका अभंगात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘आशाबद्ध करिती देवांचे पूजन। तेणें नारायण तुष्ट नोहे।।’’ मनात भौतिकाची आशा ठेवून देवांची पूजा केली, तर नारायणाला म्हणजे सद्गुरूंना खरा आनंद होत नाही. मनात आशा बाळगून वेदपठण केलं, उपासना केली, जपतप हवन केलं तरी नारायण संतुष्ट होत नाही. पण, ‘‘निराशी करिती देवाचें कीर्तन। एका जनार्दनीं तुष्ट होय।।’’ आशेचा निरास करून देवाचं गुणगान केलं, तरी सद्गुरूला मोठा आनंद होतो. कारण आशा आहे तिथं काम, क्रोध, भेद, विपरीत कर्म-धर्म आहे, अहंकाराची वस्ती आहे! बघा बरं, नुसता अहंकार एकटा नाही, तर त्याची वस्ती आहे! म्हणजे हात-पाय पसरून तो विस्तारला आहे. पण जो निराश आहे, ज्याच्या अंत:करणातली दुराशा म्हणजे भौतिकाची अवास्तव लालसा नष्ट झाली आहे, त्याला नारायण म्हणजे सद्गुरूच सांभाळत असतो! त्यासाठी मोहासक्तीशी एकरूप होणं थांबवून सद्गुरुऐक्याचा योग आचरणात आणला पाहिजे. हाच ‘एकात्मयोग’ गेले २३ महिने बऱ्याच अंशी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. सद्वाचकहो, ‘एकनाथी भागवता’चा आवाका फार मोठा आहे. त्याचं संपूर्ण तत्त्वदर्शन घडलेलं नाही हे खरं. पण, आकाशात भले पूर्ण सूर्य उगवला नसला आणि तो पूर्ण दिसत नसला, तरी प्रकाश पसरू लागला की सूर्योदयाची जाणीव होते. त्याचप्रमाणे ‘एकनाथी भागवता’चं विवेचन संपलं नसलं तरी जे गवसलं आहे तोही अंत:करणात पसरू लागलेला नाथांच्या विचारसूर्याचा प्रकाशच आहे, अशी भावना आहे. आता अखेरच्या १९ भागांत एकनाथ महाराजांचा साधकांसाठीचा निरोप आपण जाणून घेऊ.

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ