आपल्या दृष्टीनं सर्वात मोलाची गोष्ट कोणती? अर्थातच आपलं अस्तित्व! आणि म्हणूनच आपलं अस्तित्व ज्या ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्या त्या गोष्टी आपल्याला अत्यंत मोलाच्या वाटतात. मग तो निसर्ग असेल, अन्नधान्य-औषधं असतील, माणसं असतील आणि पैसाही असेल! आपलं अस्तित्व सदैव टिकावं, हीच आपली सहज आणि सततची इच्छा आणि धडपड असते. त्यामुळे क्रूर आणि अविचारी-निर्बुद्ध असा दहशतवाद, त्याचंच व्यापक स्वरूप असलेलं युद्ध, देशांतर्गत धुमसणारी यादवी; या सगळ्याची माणसाला भीती वाटते. प्रत्यक्षात स्वत:च्या परिघात माणूसही अनेकदा आपली वैचारिक ‘दहशत’ निर्माण करू इच्छितो, त्यासाठी इतरांच्या मनावर ‘आक्रमण’ करून ते ‘युद्ध’ जिंकू इच्छितो, त्यासाठी आपापसात यादवी माजली, तरी त्याला तो ‘तात्त्विक लढय़ा’चा मुलामा देतो. त्याची वैचारिकता इतर कोणत्याही विचार प्रवाहांना अस्तित्वाचा अधिकारच नाही, या मनोरोगाच्या कह्य़ात जाते. थोडक्यात बाहेरच्या जगातल्या ज्या गोष्टी माणसाला तिरस्करणीय वाटतात, भीतीदायक वाटतात, नकोशा वाटतात त्यांचं बीज त्याच्या अंतर्मनातही असतं, त्या गोष्टी त्यानं आपल्या हृदयात जोपासल्या असतात; पण त्याची त्याला जाणीवही नसते. अस्तित्वाला धोकादायक ठरणारं आणखी एक संकट म्हणजे वेगानं पसरू शकणारा साथीचा भीषण रोग! दहशतवादी हल्ला जसा कोणाचंही जीवन संपवून टाकू शकतो, कोणतंही तारतम्य न बाळगता त्याच्या व्याप्तीत जो कुणी येईल त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो, तसंच साथीच्या रोगाचं आहे. कुणीही त्याच्या तावडीत सापडू शकतो आणि या अनिश्चिततेचीच आपल्याला भीती वाटते. तेव्हा जगणं आनंदी असावं, हे मानव जातीचं आदिम ध्येय असलं तरी मुळात अस्तित्व असेल तर जगणं आहे, म्हणून अस्तित्वासाठी आपण जन्मापासून अखंड आणि सहज धडपडत असतो. पण जितकी आपण आपल्या अस्तित्वाची काळजी करतो, तितकी दुसऱ्याच्या अस्तित्वाची करतो का? आपणं जितकं आपलं अस्तित्व जपू पाहतो तितकं दुसऱ्यालाही त्याचं अस्तित्व जपायचा हक्क आहे, हे मानतो का? तेव्हा जीवन अनंत आहे, जीवनाचा प्रवाह अखंड आहे. त्यात माझं जगणं काळाच्या चौकटीत आणि म्हणूनच मर्यादित आहे. पण तत्त्वज्ञान असंही सांगतं की, माझं हे या देहातलं अस्तित्व मर्यादित काळासाठी असलं, तरी माझ्यातलं  चैतन्य अखंड राहणार आहे. समुद्रात एक लाट उसळते आणि विरूनही जाते. पण ती लाट ज्या पाण्यातून निर्माण झाली ते पाणी आधीही होतं आणि ती लाट निमाल्यावरही उरतंच! तेव्हा आपलं अस्तित्व असंच अखंड आहे. आपल्या जगण्यातही त्या अखंडत्वाचे ठसे शोधता येतात. आपल्या अस्तित्वाच्या कारणपरंपरेतही ते गवसतात. पण त्यासाठी आधी आपल्या अस्तित्वाचं मोल, अस्तित्वाचा खरा हेतू आणि उगम जाणण्याची साधना करीत गेलं पाहिजे. आपल्या अस्तित्वातलं नेमकं काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, याचा आंतरिक शोध घेता आला पाहिजे. आपल्यासकट चराचरांतील सर्वच जीवमात्रांचं जे अस्तित्व आहे आणि त्याच्या गाभ्यात सहअस्तित्वाचा जो सूक्ष्म धागा आहे, तोही जाणता आला पाहिजे. मग विराट चराचरात एखाद्या धूलिकणाहून लहान असलेल्या आणि तरीही लक्षणीय स्थान असलेल्या ‘माझ्या अस्तित्वा’चं मोल आणि महत्त्व मला जाणवू लागेल.

– चैतन्य प्रेम