चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

केवळ भजनानंच अज्ञानाची निवृत्ती होते आणि ज्ञान प्राप्त होतं, हे ऐकून ज्ञानाभिमान्याच्या मनातच नव्हे, तर सर्वसामान्य माणसाच्या मनातही विकल्प येणं स्वाभाविक आहे. याचं कारण ‘ज्ञान’ या शब्दातच आहे. इथं अभिप्रेत असलेलं ‘ज्ञान’ म्हणजे भौतिक ज्ञान नव्हे. ते ज्ञान भजनानं प्राप्त होईल, असं इथं दूरान्वयानंही सूचित नाही. तर ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञान. आता आत्मज्ञान हा शब्दही अत्यंत परिचित आहे, पण या शब्दाच्या अर्थाचा अनुभव मात्र शून्य आहे. या आत्मज्ञानाची सुरुवात आहे ती ‘मी’ कोण, हे कळू लागण्यात.

या घडीला ‘मी’ला आपल्या दृष्टीनं सर्वोच्च स्थान आहे. आपल्या सगळ्या वासना, भावना, कल्पना या ‘मी’भोवती केंद्रित आहेत. पण ‘मी’ म्हणून स्वत:ची जी ओळख अंत:करणात ठसली आहे ती अपुरी, संकुचित आणि या जन्माच्या परिघामध्ये कोंडलेली आहे. या जन्मी मी जो कोणी आहे, ज्या आर्थिक-सामाजिक पातळीवर आहे, त्यानुसार ही ओळख पक्की झाली आहे. त्या ओळखीनुसारची सुख-दु:खं, इच्छा-अपेक्षा, चिंता आणि भीती यांचं ओझं माझ्या मनावर सदोदित आहे. तेव्हा ही जी काही ‘मी’ची ओळख आहे ती खरी आहे का, याचा शोध घेणं ही या आत्मज्ञानाच्या वाटेवरची सुरुवात आहे.

‘मी’बद्दल मनात कधीच शंका येत नाही, पण भगवंताच्या भजनामुळे प्रथमच ‘मी’केंद्रित परिघातच ‘तू’चंही एक केंद्र हळूहळू जाणवू लागतं. भगवंताकडे लक्ष वळू लागतं. ‘मी’च्या मर्यादा जाणवू लागतात. ‘मी’च्या भ्रामक अपेक्षांमुळे आपण कसे अनेकदा अडचणीत येतो, कोंडीत सापडतो, स्वत:च्याच भ्रामक आसक्तीमुळे कसे भरडले जातो, हे उमगू लागतं. ‘मी’चा पाया ठिसूळ आहे, त्याचा आधार टिकाऊ नाही, ‘मी’चा सर्व पसारा अशाश्वत आहे, हे समजू लागतं आणि त्यामुळेच ‘तू’चा अर्थात भगवंताचा शाश्वत आधार घ्यावासा वाटतो. तो आधार भजनाच्या मार्गानं मानसिक पातळीवर लाभू लागतो. ‘मी’ देहाच्या आधारावर प्रत्यक्ष जगत असूनही तसंच ‘माझे’ जे कुणी आहेत तेदेखील देहाच्या आधारावर वावरत असूनही स्वत:च्या आणि त्या ‘माझें’च्या आधारापेक्षा जो दिसत नाही, अशा दृष्टीपलीकडील भगवंताचा आधार अधिक खरा वाटू लागतो.

प्रत्यक्षात हे आधार घेणं म्हणजे तरी काय हो? हा आधार मानसिक पातळीवरचाच असतो ना? भले कुणाला वाटेल, ऐनवेळी पैशाची मदत एखादा आपल्याला करतो. त्यावेळी त्याचा जो आधार वाटतो तो काय मानसिक पातळीपुरता असतो का? प्रत्यक्षातही आधार मिळाला असतोच ना? तर असं आहे, कुणी पैशाची, वस्तूची, प्रत्यक्ष कृतीची मदत करीलही, आपणही दुसऱ्याला त्याच्या अडचणीत अशी मदत शक्यता आणि शक्तीनुसार करावी, पण ही मदत देणं तरी माणसाच्या आवाक्यात नेहमीच असतं का? ते परिस्थितीच्या हातात असतं ना? तेव्हा जो मदत करीत आहे त्याची परिस्थिती अनुकूल आहे, हे एक कारण आहे. त्या अनुकूलतेमागे केवळ त्याचे प्रयत्न आणि कष्ट यापलीकडेही अज्ञाताच्या पाठबळाचा भाग आहे! तेव्हा खरं पाहता कुणाहीकडून मिळणारा आधार हा शाश्वत नसतो. मग निराधारांचा आधार घेण्यापेक्षा जो परमाधार आहे, शाश्वत आहे त्याचाच आधार का घेऊ नये?