चैतन्य प्रेम

वायूचा समभाव योग्यावरही समत्वाचे कसे संस्कार करतो, हे मांडताना अवधूत म्हणतो, ‘‘प्राणु असोनि देहाभीतरीं। बाह्य़ वायूसी भेद न धरी। तशी योगिया भावना करी। बाह्य़ांभ्यंतरी ऐक्यता॥४२१॥ ऐक्यता साधावी चतुरीं। ते वायूच्या ऐसी दोहींपरी। बा आणि अंतरीं। ऐक्यकरीं वर्तावें॥४२२॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). या ओव्यांतून एक गूढमधुर बोध नाथ साधकाला करीत आहेत, असं गेल्या भागात म्हटलं. काय आहे तो बोध? तर, माणूस प्राणवायू आत घेतो, पण म्हणून बाहेरच्या वायूबाबत त्याची भेदबुद्धी नसते. अगदी त्याचप्रमाणे ज्या जगात सर्वसामान्य माणूस वावरतो, त्याच जगात योगीही वावरतो; सामान्य माणूस जे अन्न खातो आणि जे पाणी पितो, तेच अन्न-पाणी योगीही ग्रहण करतो; ज्या हवेतून सामान्य माणूस जसा प्राणवायू शोषतो, त्याच हवेतून तोच प्राणवायू योगीही प्राप्त करतो. थोडक्यात, बाह्य़ दृष्टीनं पाहता योगी वृत्तीचा साधकही सामान्य माणसाप्रमाणेच जगात वावरतो, एकाच हवेत श्वास घेतो, एकाच तऱ्हेच्या अन्न-पाण्यावर देहाचं पोषण साधतो, जगात प्रचलित उपजीविकेच्या साधनांनी कष्ट करून जीवननिर्वाहाला आवश्यक धन कमावतो वा भिक्षेवर जगतो, सामान्य माणसाप्रमाणेच सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो; पण मग तरीही सामान्य माणसापेक्षा हा योगी वेगळा का भासतो? तो अधिक आनंदी, अधिक चिंतामुक्त का असतो? तर आनंद, समाधान, प्रसन्नता ही बा साधनांवर वा परिस्थितीवर अवलंबून नाही. ती आंतरिक जडणघडण आणि आंतरिक धारणेवर अवलंबून आहे, हे सत्य योगी जगत असतो. पण खरं माधुर्य पुढेच आहे. ते म्हणजे योग्याची आंतरिक घडण वेगळी आणि उन्नत असली, तरी बात: तो कोणताही भेद जोपासत नाही. अभेद दृष्टीनं तो जगात वावरतो. मग नाथ पुढे फार महत्त्वाची गोष्ट सांगतात; ती म्हणजे- ‘‘ऐक्यता साधावी चतुरीं। ते वायूच्या ऐसी दोहींपरी। बा आणि अंतरीं। ऐक्यकरीं वर्तावें॥’’ या ओवीत ‘ऐक्यता साधावी चतुरी’ हे शब्द फार फार अर्थप्रवाही आहेत. प्रत्यक्षात योगी आणि सामान्य माणसांत ऐक्यता असावी अशी दोघांच्या आंतरिक स्थितीत कोणतीही समानता नाही; पण तरी मोठय़ा चातुर्यानं योगीच ही ऐक्यता स्थापित करतो! बाहेरचा आणि आतला वायू सारखाच दिसला तरी सारखाच नसतो! नाही तर ज्याच्या श्वसनक्रियेत बिघाड झाला आहे, त्याला नुसत्या वाहत्या हवेत बसवताच प्राणवायूचा साठा मुबलक मिळाला असता आणि तो खणखणीत बरा झाला असता. कृत्रिम वैद्यकीय श्वसनयंत्रणेची गरजच उरली नसती. तेव्हा बाहेरचा आणि आतला वायू सारखाच असला, तरी त्यातला प्राणवायू शोषून घेण्याची शक्ती नेहमी सारखीच राहील असं नाही. अगदी त्याचप्रमाणे बाहेरच्या जगात वावरताना त्या जगाच्या मिथ्यत्वाचं जे ज्ञान योगी शोषतो, त्याच जगात रुतूनही त्या ज्ञानाचा कणदेखील सामान्य माणूस शोषत नाही!

म्हणजेच योगी आणि सर्वसामान्य माणसात बात: साम्य दिसत असलं, तरी आंतरिक धारणेत साम्य नसतं. तरीही योगी चातुर्यानं ऐक्य साधतो! आता हे ऐक्य तो कोणाशी साधतो, हे पटकन लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की, तो बा जगाशी ऐक्य साधतो असंच इथं अभिप्रेत आहे. बाह्य़ जगाशी तर तो ऐक्यभाव दाखवतोच, पण खरं आणि साधक जीवनातील महत्त्वाचं ऐक्य वेगळंच आहे!