चैतन्य प्रेम

मलिन पाण्यात पडल्यानं सूर्य मलिन होत नाही आणि डबक्यात पडल्यानं तो चिखलानं माखत नाही. तसा योगी सर्वसामान्य माणसाप्रमाणे देहात असूनही देहभावाच्या चिखलात मात्र कधीच माखत नाही, असं अवधूत सांगतो. सत्पुरुष देहात असतात, द्वैतमय प्रपंचात असतात; पण ते लोकांना शिकवण देण्यासाठी, जागृत करण्यासाठी. देहबुद्धीचा प्रपंच देवबुद्धीचा करण्याची कला ते शिकवत असतात. त्यासाठी त्यांचा सहवासदेखील पुरेसा असतो. अंधार मावळावा यासाठी सूर्याचं अस्तित्वच पुरेसं असतं. तसा सत्पुरुषाचा खरा सहवास लाभला, तर जीवनातला अंधार मावळतो. पण हा सहवास खरा मात्र पाहिजे. खरा म्हणजे कसा? खरा सहवास म्हणजे देहानं देहाजवळ राहणं का? तर नाही! खरा सहवास हा आंतरिक असतो. आपण सत्पुरुषाला मनुष्यभावानंच जोखत असू आणि मनानं त्यांच्यापासून दूर असताना देहभावानं त्यांच्यापाशी  बसलो असू, तर देह देहापाशी बसल्यासारखं ते आहे. पण जर सत्पुरुषाच्या बोधाचा सत्कृतीला चालना देणारा सहवास घडत असेल, तर तो खरा सहवास. त्या सत्पुरुषाचा विचार, धारणा, उद्देश आपला होणं, हाच खरा सहवास आहे. श्रीखंडाच्या पातेल्यात कित्येक तास पडून असलेल्या चमच्याला श्रीखंडाची चव कळूच शकत नाही. नुसता देहाचा सहवास असा असतो! तर सूर्याच्या नुसत्या अस्तित्वानं जसा अंधार लयास जातो, तसा सत्पुरुषाच्या खऱ्या सहवासानं सगळा प्रपंचभ्रमाचा अंधार ओसरतो. पण जर एखाद्यानं सगळी दारं-खिडक्याच घट्ट मिटून घेतल्या, तर काय उपयोग? तसं सत्पुरुषाच्या सहवासात मन, चित्त, बुद्धीच्या डोळ्यांची कवाडं पूर्ण उघडी हवीत. जसा संग तसे संस्कार. कपटी माणसाच्या सहवासात राहू, तर आपलीही बुद्धी कलुषित झाल्याशिवाय राहणार नाही. सत्संगात राहू, तर मन स्थिर, प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तत्त्वज्ञान पुस्तकं वाचूनही मिळतं हो; पण आत्मज्ञान सत्पुरुषाचा जीवनबोध अंत:करणात मुरल्याशिवाय आणि आचरणात उतरल्याशिवाय होत नाही. ही सगळी प्रक्रिया तोच पार पाडतो बरं; पण आपण त्यासाठी तयार आणि तत्पर असलं पाहिजे.

‘एकनाथी भागवता’च्या पंधराव्या अध्यायात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘बाळकाहातीं दिधल्या फळा। खावें हें न कळे त्या अबळा। त्याचे मुखीं घालूनि गळाळा। गोडीचा जिव्हाळा जनक दावी।।२०।।’’ तत्त्वज्ञानरूपी फळ हातात पडलं, पण ते कसं खावं, म्हणजे शब्दांची साल टाकून अर्थाचा गर कसा ग्रहण करावा, हे देहबुद्धीमय मनाला उमगत नाही. पण सत्पुरुष त्याचा प्रेमरस काढून मुखी घालतात. मग त्या फळाची अशी गोडी लागते! नाथ सांगतात, ‘‘ऐसी लाविली गोडी चढोवडी। तेणें झाली नवलपरवडी। सांडिताही ते गोडी। गोडी न सोडी मजलागीं।।२२।।’’ ती गोडी इतकी वाढली की, आता आम्ही सोडलं तरी ती गोडी काही आम्हाला सोडत नाही! इतकंच नाही, तर- ‘‘ते गोडीनें गिळीलें मातें। मीपण गेले गोडीआंतौते। ते गोडीचें उथळलें भरितें। सबा रितें उरों नेदी।।२३।।’’ त्या गोडीने माझा ‘मी’पणाच गिळून टाकला, सारं जीवनच तिनं इतकं व्यापून टाकलं, की आत-बाहेर त्या गोडीशिवाय काही उरलंच नाही! सूक्ष्म अंतर्मन आणि बा स्थूल जगत हे दोन्ही त्या आत्मगोडीनं भरून जातं. अंतर्बा रसमयता त्यानं प्राप्त होते. ‘आनंदे भरीन तिन्हीं लोक,’ असा सत्संकल्प त्यातून घडतो!