चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

सर्वत्र केवळ एकच व्यापक परमतत्त्व व्यापून आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात. त्या पूर्णस्वरूप सत्यस्वरूप परमात्म्याची सावली म्हणजे त्याची मायाशक्ती. संपूर्ण दृश्यमान, भासमान जग हा त्या मायेचाच पसारा. पण मुळात जी नाहीच, जी भ्रामक आहे तीच माया तरून जाता येते, हे म्हणणंही भ्रामकच नाही का? तर नाही! कारण मायेचा पाया मनाच्या भ्रमातून पक्का झाला आहे. तो भ्रम दूर करणं, हाच माया तरून जाण्याचा, मायेच्या प्रभावातून मुक्त होण्याचा उपाय आहे. एकनाथ महाराज एक फार सुंदर रूपक मांडतात. ते म्हणतात, ‘‘जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी। दिवसा म्हणती जाहली निशी। तेवींचि पूर्णस्वरूपापाशीं। देखती मायेसी त्रिविध कल्पना।। २०१।।’’ लहान मुलं दिवसा भातुकली खेळतात. त्यात खोटंच घर बांधतात. खोटाच स्वयंपाक रांधतात आणि त्या खेळातच ‘रात्र’सुद्धा होते! ती मुलं म्हणतात, ‘‘आता रात्र झाली.. घरातच झोपून जाऊ.’’ मग त्या खोटय़ा घरातच खोटं झोपतातही. तशी पूर्णस्वरूप भगवंताच्या पायाशीच मायेची भातुकली मांडली जाते! सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी सृष्टीचा डोलारा उभा असून मायाही या त्रिगुणांच्या जोरावर सात्त्विक, राजस आणि तामसी कर्माना चालना देत उत्तम, मध्यम आणि अधम या तीन प्रकारच्या मानवी प्रवृत्तींना बळ देत आपला जम बसवते. नाथ म्हणतात, ‘‘उत्तम मध्यम अधम जन। तिन्ही अवस्था त्रिभुवन। त्रिविध कर्मे तीन गुण। हें जाण विंदान मायेचें।।२०२।।’’ मायेच्या या त्रिपुटीत काय येत नाही? नाथ धक्का देतात आणि म्हणतात, ‘‘ध्येय ध्याता आणि ध्यान। पूज्य पूजक पूजन। ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान। हेही त्रिपुटी पूर्ण मायेची।।२०३।।’’ अहो, ध्येय, ध्याता आणि ध्यान; पूज्य, पूजक आणि पूजन; ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान- हीसुद्धा मायेचीच त्रिपुटी आहे! अवघा साधनापंथ यात सामावला आहे. पण थोडा खोलवर विचार केला, तर नाथांच्या सांगण्यातील मर्म लक्षात येईल. अहो, सर्वत्र एकच परमात्मा व्याप्त असेल, तर परमात्मप्राप्तीचं ध्येय ठरवणारा ‘मी’ कोण? ज्याचं ध्यान ‘मी’ करतो, त्या सगुण रूपाचं आणि ध्यान करणारा जो त्याचाच अंश आहे, त्याचं अभिन्नत्व मोडणारा ‘मी’ कोण? तो मायेच्याच पकडीत आहे ना? मायेमुळेच ‘मी’ ध्यान करतो, पूजा करतो, ज्ञान प्राप्त करतो; हे मानणारी जीवसत्ता टिकून आहे ना? ‘मी’ ज्ञानी, ‘मी’ तपस्वी, ‘मी’ भक्त ही सगळी ‘मी’ची मान्यता मायेमुळेच पुष्ट आहे ना? फार महत्त्वाचे मुद्दे नाथ उपस्थित करतात आणि साधनापथावरील आपल्याला जागं करतात! या मायेच्या पकडीतून स्वर्गातले देवही सुटले नाहीत. म्हणून तर इंद्राला इंद्रपद गमावण्याची धास्ती आहे! नाथ सांगतात, ‘‘जेवीं रूपासवें दिसे छाया। नाशितां नातुडे नाशावया। तेवीं स्वरूपीं मिथ्या माया। अतिदुर्जया देवांसी।।२१४।।’’