चैतन्य प्रेम

अख्ख्या जगात शांतीचा शोध सुरू आहे. अख्खं जग आज अशांतीनं व्याप्त आहे. शांती प्रस्थापित करण्याच्या नावाखाली बाहेरच्या जगात जशी युद्धंही घडत आहेत, तसंच युद्ध अंत:करणातही सुरू आहे! सामान्य नागरिकापासून मोठमोठय़ा राज्यसत्तांपर्यंत सर्वानाच वाटतं की, आपल्या मताप्रमाणे आणि मनाप्रमाणे जग सुधारलं तर अखंड शांतीच लाभेल! आणि हे जे ‘मनाप्रमाणे’ आहे ना, त्यातच अशांतीचं अमर बीज दडलं आहे. मग परमशांती खरंच आहे का? एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जगीं शांति जाली परदेशी। कोठेंही ठावो न मिळे तिशीं। ते आली सद्गुरुपायांपाशीं। सुखवासासी वसावया ॥३१३॥’’ शांतीला जग पारखं झालं आहे. प्रत्येकाला शांती हवी असली, तरी प्रत्येकाचं वर्तन तिला हुसकावणारंच आहे! त्यामुळे या शांतीला कुठे थाराच लाभत नाही. अखेर सुखानं वास करण्यासाठी ती सद्गुरू चरणांपाशी आली. यातलं रहस्य आपण पाहू; पण त्याआधी पुढल्या ओवीतलं मनोहर रूपक पाहू या. नाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी सद्गुरुपाशीं शांती। स्वयें आली सुखवासवस्ती। जेवीं कां माहेराआंतौती। स्वानंदें क्रीडती कन्या जैशी॥३१४॥’’ एखाद्या माहेरवाशिणीनं ज्या निर्धास्तपणे खेळावं, नांदावं त्याप्रमाणे ही शांती सद्गुरूरूपी माहेरची माहेरवाशीण आहे! नाथांच्या काळी अगदी लहान वयात मुली लग्न होऊन सासरी जात. त्यामुळे, ‘जेवीं कां माहेराआंतौती। स्वानंदें क्रीडती कन्या जैशी।’चा जो अर्थ शेकडो वर्षांपूर्वी हृदयापर्यंत जसा भिडत होता, तसा आता भिडणार नाही. तरीही हे रूपक आजही अर्थप्रवाही आहे. आता जगात शांती नाही आणि ती केवळ सत्पुरुषापाशी आहे, यामागचं रहस्य ‘अवधभूषण रामायणा’च्या आधारे उकलतं. जिथं पूर्ण आनंद आहे, तिथंच पूर्ण शांती आहे. परमात्मा हा आनंदस्वरूप असल्यानं परमशांती त्याच्यापाशीच आहे. सत्पुरुष हा परमात्ममय असल्यानं तो या शांतीचा शोध घेऊ शकतो आणि मग ही शांती त्याच्याहीपाशी सहजतेनं विलसत असते. जग कसं आहे? ते अहंमय आहे. अहंभावानं ते शांती बळानंदेखील मिळवू पाहत आहे. रावण हा अहंकाराचं प्रतीक आहे. त्यानं शांतीरूपी सीतेचं बळानं अपहरण केलं, पण तरीही ती त्याला लाभली नाही. अहंभावानं जे साधनेचा आटापिटा करतात त्यांना आत्मशांती गवसत नाही. पण ज्याचा ‘मी’पणा अर्थात मान पूर्ण लयाला गेला आहे, अहंयुक्त मानाचं ज्यानं हनन केलं आहे, तो हनुमानच सीतेपर्यंत अर्थात निजशांतीपर्यंत पोहोचू शकतो! सत्पुरुषही हनुमंताप्रमाणे परमात्म्याचे अनन्य दास असतात, परमात्ममय असतात आणि अहंभावाचा त्यांच्या ठायी लवलेशही नसतो. त्यामुळे ज्याला खरी आत्मशांती हवी आहे, परम सुख हवं आहे, त्याला सत्पुरुषाच्याच, सद्गुरूच्याच आधारे ती प्राप्त होऊ शकते. नाथ महाराज सांगतात, ‘‘न करितां सद्गुरुभक्ती। कदा नव्हे परमार्थप्राप्ती। यालागीं सद्गुरुभक्ती। बोलिली ग्रंथीं शिष्यहितार्थ॥३२२॥ यालागीं पूर्ण सद्गुरुपाशीं। अनन्य शरण होतां त्यासी। तो सद्भावें निववी शिष्यासी। निजबोधेंसीं यथार्थ॥३२३॥’’ जोवर सद्गुरू-भक्ती साधत नाही, तोवर खरा परमार्थ लाभत नाही. त्यामुळे जो सद्गुरूशी अनन्य आहे, शरण आहे, त्यालाच तो सद्भावानं जो निजबोध करतो त्यायोगे आत्मशांती लाभते! आता ही सद्गुरू-भक्ती म्हणजे काय?