चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

एकनाथ महाराज सांगतात, ‘‘न करितां सद्गुरुभक्ती। कदा नव्हे परमार्थप्राप्ती।’’ सद्गुरुभक्तीशिवाय परमार्थाची प्राप्ती नाही. आता ‘सद्गुरू’ म्हणजे काय? तर जो अखंड ‘सद्’ म्हणजे सत्याशीच एकरूप आहे आणि सत्यस्वरूपाशी एकरूप होण्याचा योग जो शिकवतो तो! म्हणजे त्याच्या प्रत्येक कृतीचा, वागण्या-बोलण्याचा सत्याशीच संयोग असतो. परमात्माच केवळ सत्य आहे, शाश्वत आहे. त्याच्याशी हा सद्गुरू सदैव जोडलेला असतो. आता त्याची भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे त्याच्या देहाची वा समाधीची पूजाअर्चा नव्हे! तर भक्ती म्हणजे त्यांचा जो बोध आहे, जी जीवनदृष्टी आहे, तिच्यापासून कधीही विभक्त न होणं! जेव्हा याप्रमाणे सद्गुरूंचा विचार आणि माझा विचार, सद्गुरूंची इच्छा आणि माझी इच्छा यांत अंतर उरणार नाही, एकरूपता येईल, तेव्हाच सद्गुरुचरणी अनन्यता येईल. मग, ‘‘तो सद्भावें निववी शिष्यासी। निजबोधेंसीं यथार्थ॥’’ जो अनन्य आहे, आपल्यावाचून ज्याला अन्य कसलीच ओढ नाही, त्या शिष्याला हा सद्गुरू यथार्थ निजबोधानं, आत्मबोधानं निववतो. त्याचा अंतर्बाह्य़ ताप नष्ट करतो. हा ताप का निर्माण झालेला असतो? तर आपण का जन्मलो, मनुष्यदेहात का आलो, जीवनाचा खरा अर्थ काय आणि या जीवनात खरं साधायचं काय, हे उमगत नाही; त्यामुळे मनाच्या ओढींमागे देहाला फरपटवत आपण भ्रामक ‘मी’भावात आसक्तीनं जगत राहतो. आसक्ती आहे तिथं मोह आणि भ्रम आहेच. जिथं हे सारं आहे, तिथं दु:ख असणारच. आणि जिथं दु:खं आहे, तिथं अशांती अर्थात ताप असणारच! हा ताप आत्मबोधानं म्हणजेच ‘मी’ खरा कोण आहे, याबाबतच्या बोधानं मावळतो. एकदा का ‘मी’ची निरगाठ सुटली, की आसक्तीच्या सगळ्या गाठी सुटतात! अशा सद्गुरूपाशी जो तन, मन आणि धन अर्थात देहाची, मनाची आणि भौतिकाची तळमळ सोडतो, तो जणू सर्वस्वच अर्पण करतो. कारण या तीन तळमळींपलीकडे माणसाकडे आहेच काय? आणि जेव्हा तो हे सर्वस्व अर्पण करतो, तेव्हा तो सद्गुरूही भक्ताच्या प्रेमाला भुलतो आणि त्याच्या अधीन होत आपलं सर्वस्व अर्थात अखंड स्वरूपज्ञान त्याला बहाल करतो! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘सद्गुरुचरणीं आपण। चित्त-वित्त-जीवितेंसीं पूर्ण। करुनि घाली आत्मार्पण। सर्वस्वें संपूर्ण सर्वभावें॥३४५॥ तेथें संतुष्टला स्वामी पूर्ण। तोही सर्वस्वें भुलोन। आवडी निजांगें आपण। सेवका आधीन स्वामी होये॥३४६॥’’ मग ते बळी राजाचं उदाहरण देत सांगतात की, बळीनं त्रलोक्याचं आपलं राज्य दिलं तेव्हा प्रभुंनी त्याला पाताळाचं राज्य दिलं. इतकंच नाही, तर त्याच्या मागणीनुसार प्रभु त्याचे द्वारपालसुद्धा झाले! भक्तीचा हाच महिमा आहे की, सद्गुरूही भक्ताचा द्वारपाल होतो. अर्थात त्याच्या मनाच्या दाराशी तोच रक्षणकर्ता म्हणून सदैव उभा राहतो!