News Flash

२५३. भक्ती आणि मुक्ती

तो साकार आहे, निराकार आहे आणि या दोहोंच्या पलीकडेही आहे. तो स्थूल आहे,

चैतन्य प्रेम

ब्रह्मदेव म्हणजे काय? तर, सृष्टीचं सर्जक तत्त्व. विष्णू म्हणजे सृष्टीचं पालक तत्त्व. महादेव म्हणजे सृष्टीचं विलय तत्त्व. परमात्म तत्त्व त्या सर्वात असूनही या सर्वापलीकडेही आहे. म्हणूनच या तिन्ही तत्त्वांचा परमाधारही परमात्माच आहे. समर्थानी ‘दासबोधा’त शिष्याच्या माध्यमातून एक मोठा गूढ प्रश्नच उपस्थित केला आहे. तो असा की, ‘‘ब्रrयानें सकळ निर्मिलें। ब्रrयास कोणें निर्माण केलें। विष्णूनें विश्व पाळिलें। विष्णूस पाळिता कवणु।।२४।। रुद्र विश्वसंव्हारकर्ता। परी कोण रुद्रास संव्हारिता। कोण काळाचा नियंता। कळला पाहिजे।।२५।।’’ (दशक ९, समास ५). म्हणजे ब्रह्मदेवानं सकळ विश्वाची निर्मिती केली, पण ब्रह्मदेवाला कुणी निर्माण केलं? विष्णू विश्वाचं पालन करीत आहे, पण विष्णूचं पालन कोण करीत आहे? शंकर हा समस्त चराचराचा संहारकर्ता आहे, पण मग त्याचा लय कोण साधणार? तर याचं उत्तर अर्थातच परमात्मा हेच आहे! हा परमात्मा सूक्ष्म, निराकार आणि निर्गुण आहे. त्याचंच प्रकट, साकार आणि सगुण रूप म्हणजे खरा सद्गुरू आहे. परमात्म्याशी अभिन्न असलेला, एकरूप असलेला सद्गुरू सगुणही आहे, निर्गुणही आहे आणि सगुण-निर्गुणाच्या पलीकडेदेखील आहेच! तो साकार आहे, निराकार आहे आणि या दोहोंच्या पलीकडेही आहे. तो स्थूल आहे, सूक्ष्म आहे आणि या दोहोंपलीकडेही आहे. आपण आकारात बद्ध आहोत. आपलं जग सगुणानं भरलं आहे. आवडत्या माणसांना प्रत्यक्ष पाहताच किंवा त्यांचं छायाचित्र न्याहाळताच, त्यांच्याशी बोलताच आपल्याला आनंद होतो. मग सगुणाचं, साकाराचं महत्त्व नाकारण्यात काय अर्थ आहे? आवडत्या माणसानं वापरलेली वस्तू पाहताच मनातील प्रेमभाव जागा होतो, मग भगवंताच्या भक्तीला चालना देण्यासाठी घडविलेल्या मूर्ती तो भक्तीभाव जागा करीत नाहीत, असं का मानावं? तेव्हा आपल्याभोवतालचं जे मायिक जग आहे, तेही सगुण, साकार आहे. त्या जगाच्या भक्तीतून सुटण्यासाठी सगुण भक्तीपासून सुरुवात आहे. ज्याच्यावर प्रेम जडतं, तो स्थूल-साकार असतो आणि प्रेमभाव मात्र सूक्ष्म-निराकार असतो. तसं सगुणावर जडलेलं प्रेम निराकाराकडे नेत निरासक्त करणारंच असतं. परमात्म्याचं साकार रूप असलेला सद्गुरू समस्त भवदुखाचं हरण करतो, म्हणून तो हरी आहे. जोवर या हरीची भक्ती साधत नाही, तोवर कोणत्याही बंधनातून खरी मुक्ती नाही. या हरीची भक्ती म्हणजे काय? तर, त्याच्या बोधापासून विभक्त न होणं! त्याच्या सांगण्यानुरूप जगणं. उच्चार, विचार आणि आचार यांतील विसंगती संपवणं. ही भक्ती साधत नाही तोवर जगण्यातली विसंगती दूर होत नाही. भवासक्ती सुटत नाही आणि म्हणूनच भवदुख टळत नाही. मग तुम्ही त्रलोकांत भले कुठंही स्थान पटकवा! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘ब्रह्मलोकीं ज्यां नाहीं हरिभक्ती। तेही पावती पुनरावृत्ती। ऐशी मायेची दुर्धर शक्ती। न करितां भक्ती, मुक्ती कैंची।।१८४।।’’ (अध्याय ३). ब्रह्मलोकासारख्या उच्च स्थानी पोहोचूनही जर हरीभक्ती नसेल, तर परत खाली उतरावंच लागतं! परत परत जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं. जोवर भक्ती नाही, तोवर मुक्ती नाही. मुक्तीचं नुसतं ज्ञान असूनही भागत नाही बरं! उलट नुसत्या ज्ञानाच्या गर्वाचं ओझं तेवढं वाहावं लागतं. नाथही म्हणतात, ‘‘ज्ञानाभिमानियां पतन। भक्तां भवबंधन कदा न बाधी।।१८५।।’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:19 am

Web Title: loksatta ekatmyog articles 253 zws 70
Next Stories
1 २५२. न करितां भक्ती, मुक्ती कैंची?
2 २५१. अहं ते सोऽहं
3 २५०. भजनस्थिती
Just Now!
X