चैतन्य प्रेम

उत्तर प्रदेशात सद्गुरूस्थानी प्रथम गेलो होतो तेव्हाची गोष्ट.. घराच्या अवतीभवती, शेतात, माळावर मोर पाहून लहान मुलाप्रमाणे मी आनंदलो होतो. संध्याकाळी एकटाच शेतात रेंगाळलो होतो. तिथं सूर्य अस्ताला जाऊ लागताच झपाटय़ानं अंधार पडू लागतो. अंधाराच्या आगमनाचा तो वेगही अनुभवत होतो. तेव्हा अचानक मोर ओरडू लागले. पक्ष्यांची किलबिल वाढली. तो स्वरमेळ कौतुकानं कानात साठवत सावकाश घराकडे परतलो. घरी हे सांगताच काळजीच्या स्वरात एकानं सांगितलं, ‘‘सूर्यास्तानंतर अचानक मोर ओरडू लागले, की समजावं एखादा हिंस्र पशू बाहेर पडलाय!’’ हे ऐकताच त्याच दृश्याची आणि त्याच स्वरमेळाची स्मृतीदेखील थरकाप उडवून गेली. अगदी त्याचप्रमाणे वास्तव काही वेगळंच असतं आणि आपण कल्पनेच्या स्वप्नाळू डोळ्यांनी त्याचं वेगळंच आणि कित्येकदा विपरीत आकलन करून घेत सुखावत असतो! आपण माणूस म्हणून का जन्मलो, हेच नीट लक्षात न घेता आपण आलेला प्रत्येक क्षण आपल्या जगण्यातून बेफिकिरीनं वजा करीत असतो! श्रीवामनराव गुळवणी महाराज सांगत की, ‘‘मनुष्याचा जन्म लाभणं दुर्मीळ आहेच, पण माणसाच्या जन्माला येऊन आत्मकल्याणाची, मोक्षाची इच्छा होणं त्याहूनही दुर्लभ आहे!’’ म्हणजेच मनुष्यजन्म हा केवळ आत्मकल्याणासाठीच असला, तरी माणसाचा जन्म मिळाला एवढय़ानं आत्मकल्याण साधण्याची इच्छाही होईल, असं नव्हे! उलट अनिर्बंध देहसुख मिळवण्याच्या मार्गातील अडथळे दूर करीत राहणं, हाच आत्मकल्याणासाठीचा प्रयत्न आहे, असा भ्रमच मनात रुजत आणि वाढत जाईल. पण भौतिकात कितीही प्रगती केली म्हणून तेवढय़ानं काही माणूस खऱ्या अर्थानं समाधानी होत नाही. नाही तर, एखादा कोटय़धीश मानसिक वैफल्यानं जीव देतो आणि एखादा गरीब माणूस मानसिक बळाच्या जोरावर, आहे त्यात समाधान मानत स्वकष्टानं उन्नतीसाठी प्रयत्नरत असतो; ही दोन चित्रं या जगात दिसलीच नसती. तेव्हा समाधान हे बाह्य़ पसाऱ्याच्या कमी-जास्तपणावर अवलंबून नाही. ते आंतरिक धारणेवर अवलंबून आहे. मग ते समाधान मिळवणं, हे साधनेसाठीचं ध्येय आहे! नीट लक्षात घ्या बरं! ते समाधान ही साधनेची फलश्रुती नाही. उलट ते समाधान आत असेल, तरच साधनेचे संस्कार अंतकरणात स्थिरावू लागतील! आणि जोवर या जगाकडेच मनाची ओढ कायम आहे, अशाश्वतासाठी मन हपापलेलं आहे, अशाश्वताच्या वियोगानं मन तळमळत आहे, तोवर साधना अंतरंगात रुजणार नाही. तेव्हा औषध घेताना औषधाचा गुण येण्यासाठी जसं पथ्य आवश्यक असतं, तसं साधना करताना तिचा भावसंस्कार रुजावा आणि वाढावा यासाठी जगाची आसक्ती आणि मोह विचारपूर्वक त्यागत जावा लागतो. त्यासाठी सद्गुरूबोधानुसारचं आचरण हा एकमात्र उपाय आहे; तर पुन्हा आधीच्या पायरीवर परत येऊ. इच्छांमागे धावून धावून थकलेल्या माणसाचं मन दमून का होईना, क्षणभर थांबतं. ‘दु:खां’ची हीच मोठी कृपा आहे हो! जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरचं प्रत्येक दुख आपल्याला जागृतीची आणि अंत:र्मुख होण्याची नवी संधी देत असतं. जीवनाचा नेमका हेतू काय, याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करीत असतं. जेव्हा मनाची धाव दुखानं क्षणभर का होईना थांबते; तेव्हा क्षीणसा का होईना, पण सद्विचारांचा अंतप्रवाह वाहू लागतो. त्यानं अंतकरणात शांतीचा शिडकावा होऊ लागतो.