चैतन्य प्रेम

एकानं निसर्गदत्त महाराजांना सांगितलं की, ‘‘मला पाप करावंसं वाटतं.’’ निसर्गदत्त महाराज तात्काळ उद्गारले, ‘‘का नाही? अवश्य पाप करा. पुण्य करणाऱ्याला जसं त्याच्या पुण्यकर्माचं फळ मिळतं, तसंच पाप करणाऱ्याला त्याच्या पापकर्माचं फळ मिळाल्यावाचून राहत नाही!’’ मग महाराज वर्मावर बोट  ठेवत सांगतात की, ‘‘माणसाची इच्छा मात्र अशी असते की, पाप तर करता यावं, पण त्याचं फळ भोगायला लागू नये! हे कसं शक्य आहे?’’ तेव्हा ईश्वर कर्मानुसारचं अचूक फळ देतो. आता इथं काही प्रश्न माणसाच्या मनात उत्पन्न होतात. पहिला प्रश्न असा की, कोणत्या कर्माचं फळ आहे, हे माणसाला आधीच समजत का नाही? म्हणजे पापकर्माचं फळ दु:खप्रद असतंच, हे माणूसही स्वीकारतो. पण कित्येकदा तो पापकर्मच करतो, असं नाही. साध्या साध्या कर्माचेही परिणाम कधी कधी अतिशय त्रासदायक होतात, ते का? अशी र्कम आधीच टाळता येणार नाहीत का? तर, याचं उत्तर दोन प्रकारे देता येईल. पहिलं उत्तर म्हणजे- प्रारब्ध! कारण चांगलं करूनही वाईट फळच येत असेल, तर त्याचं मूळ प्रारब्धातच असतं. कधी कधी प्रयत्न खूप करूनही यश हुलकावणी देतं, याचं कारणही प्रारब्धच असतं. नाटय़-चित्रपट क्षेत्रांतले यशवंतही मान्य करतात की, त्यांच्यात अभिनय, लेखन, दिग्दर्शनासाठी आवश्यक क्षमता होतीच, पण त्यांच्या यशात योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचता आल्याचा आणि योग्य व्यक्ती भेटल्यानं योग्य संधी मिळाल्याचाही मोठा वाटा आहे आणि हा सगळा योगायोग नव्हे! यामागेही त्यांचं भागधेय, प्रारब्ध आणि नियती आहेच. आता गेल्या भागात म्हटलं की, ‘जीव जर स्वतंत्र असता, तर त्यानं केवळ सुखाचीच निवड केली असती. दु:खभोग झिडकारले असते. पण नाही! ते त्याच्या हातात नाही.’ याचं कारण असं की, मनाच्या ओढीनुसार कर्म केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. त्या कर्माची योग्यायोग्यता कर्म करण्याआधी पूर्णपणे दुर्लक्षिली जाते. त्यामुळे त्यातली अनेक र्कम ही अवास्तव अपेक्षांतून घडतात आणि अपेक्षाभंगाचं दु:ख जीवाला भोगावं लागतं. मग जीवाला असं वाटतं की, भले त्याच्याकडून चुकीची र्कम घडोत, पण त्याला त्यातून त्रास भोगावा लागू नये! आपल्याला स्तुती आवडते, यावरून ईश्वरालाही ती आवडत असली पाहिजे, असं तो ठरवतो. आणि म्हणूनच, कर्माचं अचूक फळ जो देतो, त्या ईश्वराची तो वरकरणी, जेवढय़ास तेवढी ‘भक्ती’ही करतो. पण ईश्वर थोडाच बधणारा आहे? तो कर्मफळ द्यायला चुकत नाही. यावर उपाय काय? भगवान कृष्ण सांगतात की, सगळी र्कम मलाच अर्पण करणं, हाच एक मार्ग आहे. जो असं करीत नाही, त्याचं प्रारब्धच मलिन असतं आणि इह-पर तो दु:खच भोगतो! कृष्ण सांगतात, ‘‘जे कर्म न करिती कृष्णार्पण। त्यांचें मळिण प्राक्तन। तेणें इहलोकीं दरिद्रता जाण। पडे विघ्न परलोकीं॥४६३॥’’ कर्म कृष्णार्पण करणं, ही वरकरणी दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही! कर्म कृष्णार्पण करण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू केला आणि त्याची हळूहळू सवय होऊ  लागली, तर काय घडेल? तर प्रत्येक कर्माचं, ते करण्याआधीच मूल्यमापन केलं जाईल. म्हणजेच ते कर्म योग्य आहे की अयोग्य, याचा विचार केला जाईल. एवढय़ानं सगळीच अयोग्य वा अवास्तव र्कम टळतील असं नव्हे किंवा कोणती र्कम योग्य आणि कोणती अयोग्य, याचं आकलन अचूक असेल असंही नव्हे; पण जे मनात येतं ते तात्काळ करण्याच्या सवयीला किंचित लगाम बसू लागेल. मग आकलनही सुधारावं आणि जे अयोग्य आहे ते टाळण्याची शक्ती लाभावी, अशी इच्छाही मनात उत्पन्न होऊ  लागते.