चंद्र हा गुरू का, तर त्याच्या कला घटत असतात तरी मूळ चंद्रबिंबात घट नाही. तसा देह जन्म घेत आणि मृत्यू पावत असला तरी आत्मतत्त्व अबाधित आहे. हा पाठ चंद्रानं शिकवला. आता काळगती, काळाचा प्रवाह किती सूक्ष्म आहे आणि सतत क्षणोक्षणी काळ पालटत असला तरी ते जाणवतही कसं नाही, हे अवधूत सांगू लागला. तो म्हणाला, ‘‘अनिवार काळनदीची गती। सूक्ष्म लक्षेना निश्चितीं। ते सूक्ष्मगतीची स्थिती। अतिनिगुतीं परियेसी।।५२८।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). म्हणजे काळरूपी नदीचा प्रवाह अनावर आहे. तिची गती लक्षात येत नाही इतकी ती तरल आणि सूक्ष्म आहे. कशी? तर, ‘‘दीपू तोचि तो हा म्हणती। परी शिखा क्षणक्षणा जाती। ते लक्षेना सूक्ष्मगती। अंतीं म्हणती विझाला।।५२९।।’’ म्हणजे, दिव्याची ज्योत सतत एकच दिसत असली, तरी त्या ज्योतीतील जळणारे कण क्षणोक्षणी बदलत असतात. पण आपल्याला क्षणोक्षणी बदलत असलेली ती ज्योत एकच भासते. शेवटी दिवा विझला म्हणजे ज्योत निमाली, असं आपण म्हणतो. तसंच, ‘‘प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ। ते काळींचें म्हणती बरळ। तैशी काळगती अकळ। लोक सकळ नेणती।।५३०।।’’ म्हणजे, नदी सतत वाहती असते. म्हणजेच क्षणोक्षणी तिचं पाणी नवीन येत असतं. जुनं पुढे वाहून गेलेलं असतं, नवं येत असतं. तरीही आपल्याला तीच नदी आणि तेच पाणी वाटत असतं. जसं दिव्याची ज्योत क्षणोक्षणी पालटत असली आणि नदीचं प्रवाहित पाणी क्षणोक्षणी बदलत असलं, तरी आपल्याला एकच ज्योत आणि एकच प्रवाह भासमान होतो, तसंच या देहाचंही आहे! अवधूत सांगतो, ‘‘प्रत्यक्ष पाहतां देहासी। काळ वयसेतें ग्रासी। बाल्यकौमारतारुण्यांसी। निकट काळासी न देखती।।५३१।।’’ अवधूत म्हणत आहे की, जी गत दीपज्योतीची आणि नदीची, तीच या देहाचीही आहे! या देहाकडे पाहिलं तरी असं दिसून येतं की, काळ क्षणोक्षणी या देहाचा घास घेतच आहे. बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्था कालमानानुसारच येतात. काळ प्रत्येक क्षणी आपल्या जवळच असतो, पण त्याकडे आपलं लक्षच जात नाही.

बालपण खेळण्यात, तारुण्य उन्मादात आणि वृद्धत्व चिंतेत सरतं, असं वर्णन आद्य शंकराचार्यानीही केलं आहे. काळाचा हा गुणधर्मच आहे की, तो चिमटीतून वाळू निसटावी तितक्या वेगानं निसटत असतो. त्यामुळेच ते आपल्या लक्षातही येत नाही. गेलेला क्षण कधीच परत येत नाही. एकेक क्षण सरता सरता आयुष्य शेवटाला येतं, तेव्हा आपण भानावर येतो. पण ते उरलेलं आयुष्यही झपाटय़ानं कधी संपून जातं, तेही लक्षात येत नाही. आपल्याच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या कालप्रवाहाचे आपण साक्षी असूनही भ्रम-मोहासक्तीमुळे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. पू. बाबा बेलसरे लिहितात, ‘‘वस्तूमध्ये सारखा बदल होत असूनदेखील आपल्याला ती स्थिर दिसते, हा मानवी बुद्धीचा एक भ्रमच म्हणायला हरकत नाही. ज्या शक्तीने वस्तूमध्ये क्षणोक्षणी बदल घडतो, पण तिचे वस्तूपण टिकल्यासारखे दिसते, त्या शक्तीला काळ असे म्हणतात. एका आत्मस्वरूपावाचून विश्वामध्ये दृश्यपणे दिसणारे सर्व काही कालाच्या सत्तेखाली वावरते. काल अनंत आहे. आपला देह कालाधीन आहे हे ओळखून जो भगवंताचा आश्रय घेतो तोच फक्त कालाला ओलांडून जातो.’’

– चैतन्य प्रेम