चैतन्य प्रेम – chaitanyprem@gmail.com

भक्ताची भगवंतमय अवस्था कशी असते, हे सांगताना नवनारायणातला कवि म्हणतो, ‘‘जागृति सुषुप्ती स्वप्न। तिहीं अवस्थां होय भजन। तेथ अखंड अनुसंधान। निजबोधें पूर्ण ठसावलें अंगीं।।३५५।। मना होतां समाधान। समाधानें अधिक भजन। पूर्ण बाणलें अनुसंधान। ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे।। ३५६।।’’ म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये भजन होऊ लागतं आणि अंगी आत्मबोध पूर्ण ठसल्यानं अनुसंधानही अखंड असतं. मनाला समाधान प्राप्त झालं म्हणजे त्यायोगे भजनही अधिकच वाढत जातं. अनुसंधान पूर्णपणे बाणल्यानं ध्येय, ध्याता, ध्यानही एकरूप होऊन भजन घडू लागतं. आता या ओव्यांचा थोडा विचार करू. जागृती म्हणजे जागेपणा, स्वप्न म्हणजे निद्रेतील ‘मी’केंद्रित जाणीव आणि सुषुप्ती म्हणजे ‘मी’पणा विसरलेली, देह असूनही देहभाव विसरलेली गाढ निद्रावस्था; या तीन अवस्था आपल्या नित्य अनुभवाच्या आहेत. तरीही त्यांचा वेगळा वेगळा विचार आपण करतोच किंवा तसा विचार आपल्या मनात येतोच, असंही नाही. जागेपणी आपण जागृत असतो, असं आपल्याला वाटतं. कारण आपण डोळ्यांनी जग पाहात असतो, कानांनी ऐकत असतो, मुखानं बोलत असतो, हातानं काम करीत असतो, पायांनी चालत असतो. त्यामुळे दृश्य जगाशी आपला थेट संबंध येतो. पण तरीही कित्येकदा जागे असूनही आपण जागृत असतोच, असं नव्हे. त्यामुळे समोरच्या दृश्य जगाचं आपलं आकलन मोहग्रस्त आणि म्हणूनच अवास्तवही असतं. तेव्हा ही अवस्था खरं तर वास्तवाचं आकलन करून देण्यास समर्थ असली तरी देहबुद्धीच्या प्रभावानं आपली ही जागृतिची अवस्थाही भ्रम वाढवणारी असते. स्वप्नात देहाची जगातली हालचाल थांबली असली तरी मनाची हालचाल सुरूच असते. मनाच्या पडद्यावर बाह्य़ जगातील आपल्या संबंधांचे आणि त्या संबंधांच्या मुळाशी असलेल्या आपल्या अपेक्षांचे, कामनांचे अनेक अदृश्य ठसे उमटलेले असतात. त्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातील अनुभव यामुळे आपल्या मनात आनंद, उत्साहाप्रमाणेच भय, अस्वस्थता, अनिश्चिततेतून आलेली अस्थिरता यांचाही वावर असतो. त्यामुळे स्वप्नातलं जगही देहबुद्धीला सोडून नसतं. त्यातही भ्रामकता असते. तिसरी जी अवस्था आहे, ती म्हणजे सुषुप्ती. गाढ निद्रेची ही अवस्था आपल्यालाही अज्ञातच असते आणि त्यामुळे त्या अवस्थेत मनावरचं ओझं काही काळ का होईना दूर झाल्यानं जाग आल्यावर मनाला ताजेपणाचा अनुभव येतो. आपल्याला जितकी गाढ झोप लागते तितके आपण दुसऱ्या दिवशी आनंदी असतो, हा आपलाही अनुभव आहे. आणि त्याचं कारण त्या वेळेपुरतं का होईना मनावरचं भीती, काळजी, उद्विग्नता यांचं ओझं उतरलं असतं. जेव्हा जागेपणी भगवंताचाच ध्यास लागतो तेव्हा अंतर्मनातही त्याचंच ध्यान सुरू होतं. म्हणजेच स्वप्नावस्थाही भगवद्भावानंच भरून जाते आणि मग सुप्त मनावरही त्याच भावाचे संस्कार होऊन सुषुप्ती अवस्थेतही अंतर्मन भजनतृप्तीच अनुभवत असतं.