चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

जीवनात पूर्णत्व कधी नांदू लागेल? तर जो पूर्ण आहे, त्याच्याशी एकरूप झाल्यानंच. ‘अहं ब्रह्मास्मि’ची धारणा अनन्य शिष्यामध्ये ‘गुरु: एव परब्रह्म’ या भावनेत असते आणि मी केवळ त्याचा आहे आणि माझ्या सर्वस्वावर त्याचीच सत्ता आहे, हे त्या धारणेचं निजरूप होतं. फुलांच्या सुंदर माळेतील अनेक फुलांमध्ये एकच दोरा ओवलेला असतो. त्याप्रमाणे मग सद्गुरू मनन, चिंतनरूपी जी जी पुष्पं असतात त्यांच्यातील सूत्र स्वानुभूतीचंच असतं! वरकरणी पाहता आपल्या जीवनातील अनुभवांचंच ते चिंतन, मनन वाटतं; पण त्या प्रसंगांना सद्गुरूंच्या सहवासानंच अर्थ आला असतो आणि म्हणून ते चिंतन, मनन आपल्या जीवनातील सद्गुरूंच्या आठवणींचं असलं, तरी ते अखेरीस त्यांचंच होऊन गेलं असतं. कवि नारायण सांगतात, ‘‘म्हणौनि मनना मीचि मनन। स्मरणा मीचि  नित्य स्मरण। चित्तासी मी निजचिंतन। चिंत्यधर्मेवीण सर्वदा।। ४१८।।’’ मननाचं मनन मीच होतो, स्मरणाचं नित्यस्मरण मीच होतो, चित्ताचं निजचिंतन मीच होतो आणि चित्ताला चिंतनधर्माशिवायही जे आत्मचिंतन होतं तेदेखील असंच पूर्णत्वानं भरून असतं. मग ‘‘ज्याची सहसा प्राप्ति नव्हे। तें निजचित्तेंचि चिंतावें। तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे। चित्त निजानुभवें सहज भजतां।।४१९।।’’ मग असा जो भक्त असतो त्याला नुसत्या सद्गुरूचिंतनानंही सद्गुरूभेटीच्या अनुभवाची आंतरिक पातळीवर प्राप्ती होते! थोडक्यात सद्गुरूंशी त्याचं आंतरिक ऐक्य पक्कं झालं असतं. मग ज्याचं ज्याचं चिंतन तो करतो त्या त्या गोष्टीची सहज प्राप्ती होते. आता इथं एक लक्षात न येणारा धोका आहे. कारण यातून पुन्हा नश्वराचं चिंतन सुरू झालं आणि त्याची प्राप्ती होऊ लागल्यानं त्याच चिंतनात मन पुन्हा अडकलं, तर काही खरं नाही! कुणाला वाटेल की, इतक्या उच्च पातळीवर गेलेल्या भक्ताच्या मनात नश्वराची इच्छा होईलच का? तर, सापशिडीच्या खेळाप्रमाणेच या मार्गातही अगदी अखेरच्या पायरीवरूनही पुन्हा खोल घसरण सहज शक्य आहे.  आणि त्यामुळेच कवि नारायण पुढील ओवीत सावध करताना म्हणतात, ‘‘नाथिलें चिंती ते ‘अतिचिंता’। आथिलें चिंती ते ‘निश्चिंतता’। आथी नाथी सांडिली चिंता। सहजें न भजतां भजन होये।।४२१।।’’ जे नाही त्याचंच चिंतन करणं ही अतिचिंता आहे आणि जे आहे त्याचं चिंतन करणं ही निश्चिंतता आहे! साधनेच्या प्राथमिक पातळीवरील साधकांसाठीही हे सूत्र अत्यंत उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे. कारण हे जग मिथ्या आहे, असं सगळे संत सांगतात. मिथ्या म्हणजे काय? तर एका क्षणी ते जसं दिसत असतं, भासत असतं तसं ते पुढच्या क्षणी राहात नाही. तेव्हा ते खरं तर वास्तवात नाहीच. पण त्याच जगाचं आम्ही किती चिंतन करतो. ती अतिचिंता आहे. आणि या जगात परमात्म तत्त्वच खरं तर आहे, पण त्याचं चिंतन काही आपण करीत नाही. पण ते जर केलं, तर मनाला निश्चिंतता येईल! मग काय आहे आणि नाही, या दोन्ही भावांचं चिंतन सुटलं, तर भजन न करताही भजनच घडू लागतं. माणूस प्रयत्नपूर्वक श्वासोच्छ्वास करीत नाही, पण त्यामुळेच तो जिवंत असतो, तसं जाणीवपूर्वक भजन न करताही घडत असलेल्या सहज भजनानं त्याचा भक्तीप्राण चिरंतन रहात असतो!