चैतन्य प्रेम

सकळ कर्मामध्ये आंतरिक ऐक्य, सहज समाधी स्थिती कशी टिकवावी, याचा बोध सद्गुरू करतो तेव्हाच तो बुद्धीवर ठसतो. आणि एवढं असूनही जीवनसंघर्षांत हिरीरीने लढत असलेल्या शिष्याची आंतरिक आत्मसमाधी कधीच मोडत नाही. तसंच सत्त्व, रज आणि तम या तीनही गुणांच्या पलीकडे असलेली अर्थात त्रिगुणांपासून मुक्त असल्याची त्याची अवस्थाही भंगत नाही. कवि नारायण सांगतो की, ‘‘सकळ कर्मी समाधी। हे सद्गुरूचि बोधी बुद्धी। तरी युद्धींही त्रिशुद्धी। निजसमाधी न मोडे।।४३३।।’’ आता यानंतर असा शिष्य परमसमाधी अवस्थेत कसा असतो, याचं वर्णन आहे. पण त्या ओव्यांचं विवेचन आपण ओलांडून पुढे जाणार आहोत. याचं एक कारण असं की, आपण दहा कोटी रुपयांचं लॉटरीचं तिकीट घेतलं आणि ते लागलं तर काय काय होईल, याचा तिकीटही न काढता नुसता उहापोह करून काय उपयोग आहे? काहींना वाटेल की, आम्ही रोज जमेल तेवढा जप करतोच की, मग आम्हीही त्या अवस्थेपर्यंत जाणार नाही का? तर निश्चितच प्रत्येकाला तिथवर जायचंच आहे, मग ते किती जन्मांनंतर का घडेना, त्याशिवाय मुक्तता नाही. पण आज आपण मागोवा घेत आहोत ते साधकाच्या पातळीपुरता. त्यामुळे ज्या ओव्या या अतिउच्च अवस्थेचं वर्णन करणाऱ्या असतात त्या आपण संक्षेपाने पाहतो किंवा सोडूनही देत आहोत. पण ही जी परमसमाधी अवस्था कवि नारायण सांगतो तिची एक व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे. तो म्हणतो, ‘‘जेथें शमली मनाची आधी। ते जाणावी ‘परमसमाधी’।’’ ‘आधी’ या शब्दाचा एक अर्थ पाया, आधार असा आहे तर दुसरा अर्थ तळमळ असा आहे आणि या घडीला मनाचा स्वार्थकेंद्रित पाया हा तळमळच वाढवणारा आहे! तेव्हा मनाची तळमळ पूर्ण शमणं म्हणजेच परमसमाधी! आता ही व्याख्या केवळ फूटपट्टीप्रमाणे डोळ्यापुढे ठेवून आपली साधना आणि आपली आंतरिक अवस्था हिचा ज्यानंत्यानं विचार केला पाहिजे, परीक्षण-निरीक्षण केलं पाहिजे. तरी जाणवेल की खऱ्या परमसमाधी अवस्थेपासून आपण किती दूर आहोत. मात्र हे अंतर कमी करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यात मनाच्या तळमळीचं कारण काय आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. आपल्याच अवास्तव कल्पना, दुसऱ्यांकडूनच्या अवास्तव अपेक्षा, आसक्तीजन्य हट्टाग्रह, मोहग्रस्त भावना यामुळेच आपला अनेकदा अपेक्षाभंग होत असतो आणि आपल्या वाटय़ाला तळमळ आणि दु:खं येत असतं. तेव्हा आपलं मन नेमकं कुठं अडकतं, कुठे गुंततं, याचा मागोवा घेतला पाहिजे. या गुंतण्यात, त्या गुंतण्याच्या चिंतन-मननात आपला किती वेळ व्यर्थ निसटून जातो, किती मानसिक आणि भावनिक क्षमतांचा ऱ्हास होत असतो, याचाही हिशेब मांडला पाहिजे. बरं, आपल्याला हे कळत नाही, असं नाही. पण तरी कळलेलं आचरणात येत नाही. ‘कळतं, पण वळत नाही, ते अज्ञान,’ असं श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत. तेव्हा जे कळतं ते आचरणात वळावं, यासाठी सद्गुरू बोधाचा आधार अनिवार्य आहे. कारण सहजतेनं कसं जगावं, आसक्तीतून कसं अलगद सुटावं, निरपेक्षता कशी बाणवावी, वृत्ती कशी निर्लिप्त राखावी, हे सारं त्यांच्या बोधातून आणि त्यांच्या जीवनातून उमगू लागतं. त्यांच्या सहवासात ते सारे संस्कार मनावर सहज रुजत असतात. तेव्हा मनाची आधी अर्थात तळमळ शमण्यासाठी खरा सत्संगही महत्त्वाचा आहे.