चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

दोन दिवसांआधीच्या लेखात ‘ताटस्थ्य’ असा शब्दप्रयोग आहे. तो ‘समाधी’ या अर्थानंच ‘भागवता’त वापरला गेला आहे. एवढंच नव्हे, तर देहबुद्धी न सोडता प्राणवायू कोंडून समाधी लावणं ही देहपातळीवरचीच स्थिती आहे, असंही म्हटलं आहे. इथं ‘देहबुद्धी न सोडता’ हे शब्द फार महत्त्वाचे आहेत आणि ‘मनाची आधी’ अर्थात मनाच्या तळमळीशी त्यांचा संबंध आहे! मनाची तळमळ कायम ठेवून, देहबुद्धी कायम ठेवून कितीही साधना केली, तरी काही उपयोग नाही. याचं कारण औषधही घ्यायचं आणि आरोग्याला अत्यंत घातक अशा गोष्टींचं सेवनही करायचं, तर उपयोग होईल का? तेव्हा औषध घ्यायचंच, पण घातक गोष्टींचं सेवनही थांबवायचं, हा मनाचा निश्चय पाहिजे. निर्धार पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे साधना अनिवार्यच आहे. ती करायचीच, पण ती करीत असताना त्या साधनेशी विसंगत अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करायला हवा. नाहीतर साधनाही वरकरणी खूप केली, पण तिच्याशी विसंगत वर्तनाची मनमानीही चालूच ठेवली, तर काय उपयोग? कारण ही अवस्था असेल, तर साधना करतानाही मनात त्याच विसंगत गोष्टींचा प्रभाव कायम राहील. पण जेव्हा मनाची तळमळ ओसरून प्रत्येक कर्मात सद्गुरूंचंच स्मरण टिकतं आणि ते कर्मही त्यांच्या बोधानुरूप घडत जातं तेव्हा प्रत्येक कर्म हेदेखील साधनाच होते. माउलीही म्हणतात ना? ‘‘तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागी।।’’ स्वकर्म म्हणजे आपल्या वाटय़ाला आलेलं कर्म. तर अशा स्वकर्माच्या फुलांनी जेव्हा त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा होते, अर्थात भगवद्भावानंच केलेल्या स्वकर्माची सुमनं जेव्हा त्या ईश्वरालाच अर्पण केली जातात तेव्हा त्या पूजेनं तो संतुष्ट होतो. संतुष्ट म्हणजे सर्वार्थानं तुष्ट.

याचं कारण असं की, शिष्य जेव्हा कोणत्याही कर्मात आसक्ती अथवा मोहानं न अडकता ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनंच करतो तेव्हा ते अचूक होण्याची शक्यता वाढते. कर्मात आसक्ती आणि मोह कालवून आपण ती करतो तेव्हा कर्मात अनेक चुका होत असतात आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. एखाद्यासाठी म्हणून आपण जी र्कम करतो, त्यात खरं प्रेम नसतं, तर आपलाच स्वार्थकेंद्रित हेतू असतो. त्या प्रेमात अपेक्षा असतात आणि त्या आपल्या आसक्तीजन्य मोहातून आलेल्या असतात. खरं निरपेक्ष प्रेम माणसाच्या आवाक्यातच नाही. आपल्या निरपेक्ष प्रेमातल्या सुप्त अपेक्षा वेळ आली की उसळून वर येतात आणि मग ‘आजवर मी एवढं केलं,’ असे मनातले हिशेबही ओकले जातात.

तेव्हा निरपेक्ष प्रेम केवळ सद्गुरूच करतो त्यामुळे आपल्याच जीवनातलं प्रत्येक कर्म हे त्याच्यासाठी करीत आहोत, या भावनेनं करू लागलो, तर निरपेक्षतेचे संस्कार मनावर होऊ लागतील. मग साधा स्वयंपाक करतानाही तो सद्गुरूंसाठी करीत आहे, हा भाव असेल, तर तो साधा स्वयंपाकही प्रसाद होऊन जाईल. छोटय़ातलं छोटं कामही जेव्हा त्यांच्यासाठी करीत असल्याच्या भावनेनं होईल तेव्हा ते सहजतेनं अचूक आणि आटोपशीर होऊ लागेल. कर्माचा गोंधळ उडणार नाही. पसारा होणार नाही आणि त्या कर्माचं ओझंही मनावर उरणार नाही.