चैतन्य प्रेम

कोणताही हेतू मनात न उरता केवळ कर्तव्यबुद्धीनं जे कर्माचरण होतं ते स्वाभाविकपणे ब्रह्मार्पणच होत असतं. म्हणजे माणूस कोणतंही कर्म करतो त्यामागे त्याचा काही ना काही हेतू असतो. तो हेतू त्याच्या मोहासक्तीतूनच आला असतो. बरेचदा तो कर्तव्य टाळतो, पण आवडीची कर्मे करतो! तेव्हा नाथ सांगतात त्याप्रमाणे केवळ कर्तव्यकर्म जो करतो आणि ती करतानाही आपला अमुक लाभ व्हावा, असा हेतू त्याच्या मनात नसतो तेव्हा ते कर्म भगवंताच्या स्मरणातच होत असल्यानं ते ब्रह्म अर्थात परमभावातच समर्पित होत असतं. असं हे निर्दोष भजन हाच भागवतधर्म आहे, असं नाथ सांगतात. असा जो ‘भजना’त दंग असतो त्याच्या मनाला भय शिवत नाही. ‘‘यापरी भगवद्भजनपथा। भय नाहीं गा सर्वथा। ‘अभय’ पुशिलें नृपनाथा। तें जाण तत्त्वतां भजनें होय।।४५४।।’’ हे राजन, जे अभय म्हणतात ना, ते या भजनाशिवाय तत्त्वता प्राप्त होऊच शकत नाही. म्हणजे जो भगवंताच्या भजनात रममाण असतो तोच खऱ्या अर्थानं निर्भय असतो. आता  येथें भयाचें कारण काय, असा प्रश्न स्वाभाविक आहे आणि त्याचं उत्तर देताना नाथ सांगतात, ‘‘आत्मा पूर्णत्वें सर्वत्र एक। तेथ जो म्हणे मी वेगळा देख। तेंचि अज्ञान भयजनक। दु:खदायक अतिद्वंद्वें।।४५६।।’’ आता शब्दज्ञानानं ही ओवी लगेच कळते, पण अनुभवाच्या अंगानं ती मनात दृढ होत नाही! ही ओवी सांगते की, हे सारं जग जे आहे ना, ते एकाच आत्मतत्त्वाचं आहे. एकच आत्मा सर्वत्र भरून आहे. आता या आत्म्याची अनुभवसिद्ध ओळख काही आपल्याला नाही. त्यामुळे तोच सर्वत्र भरून आहे, हे तरी कसं उमगावं? तेव्हा थोडा वेगळा विचार करून पाहू. हे सारं जग एकाच तत्त्वावर टिकून आहे आणि ते तत्त्व म्हणजे ‘अस्तित्व’! थोडक्यात जे जे काही या जगात आहे, मग ते सजीव असो वा निर्जीव असो, ते आहे! हा जो आहेपणा आहे, त्यालाच खरं महत्त्व आहे. तर या जगात जे आहे, असं जाणवतं त्या आहेपणाचा आधार काय? तर चैतन्य! चैतन्य आहे म्हणून जीवन आहे, अस्तित्त्व आहे. तर सर्वत्र एकच चैतन्य भरून आहे, सर्वाना एकच आस आहे ती म्हणजे आनंदाची. तेव्हा हे जे सार्वत्रिक आहे त्याकडे लक्ष वळलं तर आपल्यातली आणि दुसऱ्यातली साम्यता जाणवू लागेल. पण आपलं लक्ष आपल्या संकुचित ‘मी’पलीकडे जात नाही आणि म्हणूनच आपल्या वाटय़ाला दु:खं येत राहातात. ‘मी’ कुणीतरी वेगळा आहे, अशी धारणा हीच भयाला जन्म घालणाऱ्या अज्ञानाला कारणीभूत आहे. तिच्यामुळेच दु:खदायक द्वंद्वं निर्माण होतात. जर खरं भजन सुरू झालं, तर मग भौतिकाचं जे भजन आहे, अशाश्वताचं जे भजन अहोरात्र सुरू आहे, त्यातल्या मर्यादा तरी कळतील. मग त्या भजनानं अज्ञान ओसरू लागेल. पण अज्ञान का कुठं भजनानं मावळतं, अशी शंका स्वत:ला ज्ञानी मानणाऱ्याच्या मनात येतेच. नाथ म्हणतात, ‘‘भयाचें मूळ दृढ अज्ञान। त्याचें निवर्तक मुख्य ज्ञान। तेथ कां लागलें भगवद्भजन। ऐसा ज्ञानाभिमान पंडितां।।४५७।।’’ भयाचं मूळ दृढ अज्ञानात आहे आणि ते दूर करायचं तर त्याला उपाय ज्ञान हाच आहे. ते ज्ञान काय भगवंताच्या भजनानं प्राप्त होणार का, असा प्रश्न ज्ञानाचा अभिमान असलेल्या पंडितांच्या मनात उत्पन्न होतो. भजनानं ज्ञानाऐवजी अज्ञानच अधिक साचेल, असंही वाटू शकतं.