चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

अंत:करणाची विहीर जेव्हा द्वैतभावानं भरून जाते तेव्हा या विहिरीत संकल्प आणि विकल्प यांचेच झरे सुटू लागतात. मग तिथं जन्म आणि मरण, मरण आणि जन्म यांचाच पूर येत राहतो. नाथ सांगतात, ‘‘जन्ममरणांचिया वोढी। नाना दु:खांचिया कोडी। अभक्त सोशिती सांकडीं। हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे।। ४७८।।’’ जन्म आणि मरणाच्या ओढींनी नाना प्रकारची संकटं आणि दु:खं अभक्तांच्या वाटय़ाला येत असतात. आता जन्माची ओढ समजू शकतो, पण मरणाची ओढ कशी असेल, असा प्रश्न काहीजणांच्या मनात येईल. तर इथं ‘जन्म’ आणि ‘मरणा’ची आणखी एक अर्थछटा लक्षात घ्या. ही अर्थछटा म्हणजे ‘संयोग’ आणि ‘वियोग’! आपल्या मनात एखादी गोष्ट आपल्याकडे असावी, अशी ‘संयोगा’ची जशी ओढ असते, तशीच एखादी गोष्ट आपल्या जीवनात नसावी, नष्ट व्हावी, टळावी, आपल्या वाटय़ाला येऊ नये, अशी ‘वियोगा’चीही ओढ असते. थोडक्यात अमुक व्हावं आणि अमुक होऊ नये, असं हे द्वंद्व आहे. जे आपल्याला आपल्यासाठी ‘अनुकूल’ वाटत असतं, त्याच्या संयोगाची, प्राप्तीची ओढ मनाला असते. जे आपल्याला आपल्यासाठी ‘प्रतिकूल’ भासत असतं, ते टळावं, अशी त्याच्यापासूनच्या वियोगाचीही ओढ मनात असते. तर या ओढींमुळेच नाना दु:खं आणि संकटं वाटय़ाला येत असतात. कारण हे जे हवं-नकोपण आहे, ते अज्ञानातूनच आहे. त्याच्या प्राप्तीचे आणि ते टाळण्याचे प्रयत्नही अज्ञानाच्याच आधारावर होत असतात.. आणि मग जे अज्ञानातून होतं त्यानं सुख कसं काय लाभणार? तेव्हा जो अभक्त आहे त्याच्या वाटय़ाला हे दु:ख येतं, असं नाथ सांगतात. आता अभक्ताच्याच वाटय़ाला हे का यावं? इथं भक्त आणि अभक्त, या व्याख्याही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मुळात हा भक्त कुणाचा असला पाहिजे, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे. तसे आपणही भौतिक जीवनाचे ‘भक्त’ असतोच, अशाश्वताची ‘भक्ती’ आपल्या मनात असतेच. पण म्हणून हा ‘भक्त’ संकटं सोसणार नाही, असं नव्हे. उलट याच ‘भक्ता’ला भवदु:खं सोसावी लागतात. याचं कारण आसक्तभावानं जी अशाश्वताची भक्ती सुरू आहे, ती शाश्वत सुख देऊ शकत नाही. तेव्हा हा भक्तही शाश्वताचाच असला पाहिजे. सद्गुरूचा जो भक्त आहे, तोच खरा भक्त आहे. इथं सद्गुरू म्हणजे कुणी मनुष्यमात्र अभिप्रेत नाही. सद्गुरू हे तत्त्व आहे. जो सदैव परम तत्त्वात समरस असल्यानं व्यापक आहे, ज्याच्यात लेशमात्र स्वार्थ नाही, जो भ्रामकता आणि अज्ञानातून जीवाला सोडवतो, तोच खरा सद्गुरू आहे. ज्याला स्वत:च्याच पसाऱ्याचा मोह आहे, तो सद्गुरू नव्हे. ज्याला स्वत:च्या नावलौकिकाची चिंता आहे, तो सद्गुरू नव्हे. ज्याच्या अंतरंगात लोकेषणा, वित्तेषणा आहे, अर्थात प्रसिद्धी आणि पैशाचा मोह आहे, तो सद्गुरू नव्हे. तेव्हा जो असा निरासक्त, निरपेक्ष, निस्वार्थ आहे त्याच्याशी जो जोडला गेला आहे, तोच भक्त आहे. जो त्याच्यापासून विभक्त आहे, तोच अभक्त आहे. जो व्यापकाशी जोडला गेला आहे, त्याची वृत्ती व्यापक असल्यानं त्याच्यात भ्रमाचा प्रभाव उरला नसतो. त्यामुळेच अशाश्वताची ओढ त्याच्या स्वप्नातही जागी होत नाही. जो अभक्त आहे, तो मात्र सदोदित दु:खाच्या पकडीतच असतो.