चैतन्य प्रेम

सद्गुरूंची भेट झाली, पण ती देहपातळीवर नव्हे. त्यांचा विचार तोच माझा विचार, त्यांची जीवनदृष्टी तीच माझी जीवनदृष्टी, त्यांची भावस्थिती तशीच माझी भावस्थिती, त्यांची धारणा तीच माझी धारणा; अशी जेव्हा स्थिती होईल तेव्हाच खरी सद्गुरू भेट झाली, असं म्हणता येईल. पण हे कुणाला साधतं ते उलगडताना नाथ सांगतात, ‘‘निष्काम पुण्याचिया कोडी। अगाध वैराग्य जोडे जोडी। नित्यानित्यविवेकआवडी। तैं पाविजे रोकडी सद्गुरूकृपा।। ४८४।।’’ जो अनंत निष्काम पुण्यकर्मे करतो आणि ज्याला अगाध वैराग्याची जोड असते; सदैव नित्य काय आणि अनित्य काय, हे पारखून घेण्याची ज्याला आवड असते त्यालाच रोकडी सद्गुरूकृपा प्राप्त होते! बघा, पुण्यकर्माच्या जोडीला वैराग्य आवश्यक आहे! कारण पुण्यकर्मे करीत गेलो, की अहंकार मनात सहज प्रसवू शकतो. ‘मी केलं’, ‘मी होतो म्हणून झालं’, ‘माझ्यामुळेच झालं’ असा हा अहंकार पुण्यकर्माना खाऊन टाकतो आणि मग मोठमोठय़ा पापकर्मापेक्षाही अशा ‘पुण्यकर्मा’च्या झळा अधिक तीव्र आणि दाहक होत जातात. तेव्हा पुण्यकर्म तर घडावीच लागतात, पण वैराग्यही असावं लागतं. वैराग्य म्हणजे विरक्ती. कर्तेपणा, लोकेषणा, वित्तेषणा मनाला न चिकटणं.. आणि ही विरक्ती टिकण्यासाठी नित्यानित्यविवेक अनिवार्यच असतो. म्हणजेच काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे, याचा विवेक साधणं आवश्यक असतं. तेव्हाच मग जे अनित्य आहे त्याचा मनातून त्याग होऊ शकतो आणि जे नित्य आहे त्याचा मनातून पूर्ण स्वीकार होऊ शकतो. हा स्वीकार आणि त्याग मानसिक पातळीवरच आहे बरं का. म्हणजे भौतिक सगळं मिथ्या आहे, अनित्य आहे. म्हणून त्या भौतिकाचा प्रत्यक्ष त्याग करायचा नाही, तर मानसिक पातळीवर त्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे मनानं त्या भौतिकातलं गुंतणं, त्या भौतिकाची ओढ, त्या भौतिकासाठी तळमळणं थांबवायचं आहे. देहानं भले त्यात किती का राहाना! पण आपण उलट करतो. आपण दृश्यातला त्याग पटकन करू शकतो, पण मनातून त्याग करू शकत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूचा त्याग करू शकतो, पण मनात त्या वस्तूची आस कायम असू शकते. तेव्हा दृश्यातल्या, बाह्य़ त्यागापेक्षा मनातल्या आसक्तीचा त्याग करणं अधिक आवश्यक आहे. तर जे अनित्य आहे त्याचा त्याग  आणि जे नित्य आहे त्याचा स्वीकार मनातून साधू लागतो. पण हा स्वीकारही आपण देहाच्याच पातळीवर करतो, मनाच्या पातळीवर करीत नाही! कसं? तर भगवंत हा नित्य आहे, हे उमगलं. तर त्या भगवंताच्या भक्तीचा स्वीकार देहानं होतो म्हणजे देहानं आपण पूजा करतो, उपवास करतो, पारायणं करतो, जप करतो. पण मन? मनानं स्वीकार पूर्णपणे झाला नसल्यानं पूजा, उपवास, पारायणं, जप करतानाही मन अन्यत्र भटकतच असतं. पण मनानं जर खरा स्वीकार झाला, तर मग जगातली अनंत कामं करीत असतानाही मनात स्मरण सदैव त्या भगवंताचंच, अर्थात नित्याचंच असेल! मग अशी ज्याला नित्याचीच आवड असते त्याला सद्गुरूची रोकडी भेट घडतेच घडते!