चैतन्य प्रेम

एकनाथ महाराज म्हणतात की, ‘‘ऐसें भजनें मन नेमितां स्वयें। न रिघे कल्पांतकाळभये। भक्त होऊनियां निर्भयें। विचरती स्वयें नि:शंक।। ५२३।।’’ हे ‘ऐसें’ भजन म्हणजे ‘कैसे’ भजन? तर आधीच सांगितल्याप्रमाणे, सद्गुरूंच्या बोधावर अतूट निष्ठा व त्या बोधानुसार विवेक आणि वैराग्य यांच्या निकषांवर आपल्या अंतर्मनाचा सततचा धांडोळा घेत आचरणाचे सदाचरणात रूपांतर करीत जाणं (‘विवेकवैराग्याचेनि हातें। निजमनातें आकळिती।।’). सद्गुरूंचा जो बोध असतो, तो जीवाला ‘मी’ व ‘माझे’च्या जोखडातून सोडवत व्यापक करणारा असतो. ‘मी’ म्हणजे माझ्या देहाची जी देहरूपात्मक ओळख आहे, जशी की काळा-गोरा, सुरूप-कुरूप, उंच-बुटका, काटक-स्थूल या ओळखीनुसारचे दृश्यातले प्रतिबिंब. तसेच देहाच्या आधारे निर्माण झालेली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक पात्रता. या देहाला जन्मानंतर लाभलेलं नाव, धर्म आणि जात वा पंथ.. हे सारं या ‘मी’च्या ओळखीत सामावलेलं असतं. या ‘मी’ला जन्मानुसार मिळालेले आप्तस्वकीय, कर्मानुसार वाटय़ाला आलेले मित्र आणि शत्रू, प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेली परिस्थिती.. हे सारं ‘माझे’मध्ये समाविष्ट असतं. गंमत अशी की, हे सारं या एका जन्माच्या जाणिवेच्या परिघापुरतं असतं. आज जे नाव ‘माझं’ वाटतं, ज्या नावाबद्दल आत्यंतिक आत्मीयता वाटते, त्याचा उच्चार होताच आपलं लक्ष तात्काळ वेधलं जातं, इतकी ज्या नावाबद्दल अभिन्न भावना जडली असते ते नाव पुढच्या जन्मी आठवतसुद्धा नाही! मग या जन्मातले ‘माझे’ तरी कुठून आठवणार? तेव्हा या जन्मीच्या ‘मी’ आणि ‘माझे’चं स्मरण पुढच्या जन्मी नसतं, पण तेव्हाच्या जन्मीही ‘मी’ व ‘माझे’चं नवं ओझं तयार असतंच! तेव्हा या ‘मी’ व ‘माझे’बद्दलची सर्व आवश्यक कर्तव्यर्कम पार पाडत असतानाच; त्याच्या संकुचित पाशातून सुटून जेव्हा परमतत्त्वाचा विचार सुरू होतो, तेव्हा संकुचिततेचे पाश तुटू लागतात व अंत:करण विशाल होऊ  लागतं. अशा व्यापकत्वाची जोड मनाला नेमानं लागली, की कल्पांतकाळीही भय स्पर्श करू शकत नाही. म्हणजेच संकुचित ‘मी’ आणि ‘माझे’मध्ये मोह आहे, भ्रम आहे, आसक्ती आहे. जेव्हा त्या संकुचितातून सुटण्याचा आणि व्यापक, शाश्वत तत्त्वाशी सुसंगत जगण्याचा अभ्यास सुरू होतो, तेव्हा मोह, भ्रम, आसक्ती ओसरते. या गोष्टी दूर झाल्या की, वर्तनातल्या चुकाही टळतात. मग भय कसलं उरणार? पण जेव्हा जगण्यातलं असत्य, भ्रम, मोह संपू लागतो, तेव्हा तोवर जीवनसत्यापासून विभक्त असलेला माणूस त्या शाश्वत सत्याशी अखंड जोडला जातो आणि म्हणूनच ‘भक्त’ ठरतो. मग, ‘भक्त होऊनियां निर्भयें। विचरती स्वयें नि:शंक।।’ असा भक्त मिथ्या जगातही वास्तविक निर्भयतेनं आणि नि:शंक वृत्तीनं वावरतो! तो जगाचा त्याग करीत नाही, जगापासून पळ काढत नाही; पण जगाच्या भ्रामक अपेक्षांचं ओझंही शिरी वाहात नाही. पण मुख्य कर्तव्य- आत्माभ्यास- विसरत नाही.