चैतन्य प्रेम

सद्गुरूंची चरित्रं अनंत आहेत आणि त्यातील प्रत्येक लीलाचरित्र हे अज्ञानाचा निरास करणारं आणि जीवनाबाबत, मनुष्य जन्माबाबत सजग करणारं आहे. त्या चरित्रांचं संकीर्तन केल्यास मन परमानंदानं भरून जातं, असं नाथ सांगतात. हा जो ‘हरी’ आहे, म्हणजेच भगवंत किंवा त्या भगवंताशी एकरूप असलेला सद्गुरू आहे, त्याची लीलाचरित्रं म्हणजे काय? तर एकनाथ महाराज सांगतात, ‘‘वानिती अजन्मयाचीं जन्में। वानिती अकर्मियाचीं कर्मे। स्मरती अनामियाचीं नामें। अतिसप्रेमें डुल्लत।।५३८।।’’ जो अजन्मा आहे त्याच्या जन्माची कथा ही चरित्रं गातात, जो अकर्मा आहे म्हणजेच जो कर्तेपणा मिरवत नाही त्याच्या दिव्य कृत्यांचा मागोवा ही चरित्रं घेतात, जो अनाम आहे म्हणजेच जो नामविशेषापलीकडे आहे त्याच्या नामाच्या स्मरणाची प्रेरणा ही चरित्रं देतात. ही चरित्रं सांगणारे आणि वाचणारे प्रेमभरानं डोलत असतात. ‘अजन्मा’ याचा अर्थ काय? हे समजून घेण्यासाठी ‘गीते’चा दाखला घ्यावा लागेल. भगवंतानं ‘गीते’त अर्जुनाला सांगितलं होतं की, ‘‘तुझे-माझे अनेक जन्म झाले आहेत, तुला ते आठवत नाहीत, पण मला आठवत आहेत.’’ म्हणजे आपण जन्म-मृत्यूच्या चक्रात सदोदित असतो, पण त्या-त्या जन्मात आपल्याला त्या जन्माचंच स्मरण असतं. तो जन्म सरला की पुढील जन्मात मागील जन्माचं स्मरण नसतं. जो जन्म आणि मृत्यूच्या अतीत आहे म्हणजेच जो सदोदित अस्तित्वात आहे, तो प्रत्येक काळी सद््धर्माच्या रक्षणासाठी अवतरित होतो. त्यासाठी मनुष्य जन्माचाच आधार घेतो. पण आपल्या अवताराचा हेतू तो कधीच विसरत नाही. प्रत्येक अवतार अर्थात जन्म म्हणजे जणू त्याची एक भूमिका असते, म्हणा ना. सर्वसामान्य माणसाला आत्मोद्धाराच्या मार्गाकडे वळवत राहाण्याचं मोठं कार्य त्याच्या जीवनात सदोदित सुरू असतं. पण त्याचं कर्तेपण तो स्वत:कडे घेत नाही. सर्वसामान्य माणूस अहंभावात अडकला असतो. त्या अहंभावामुळेच त्याला वास्तवाची जाण होत नाही. अवास्तव कल्पना आणि अवास्तव ओढींनी तो जगत असतो. त्याच्या प्रत्येक कृतीमागे त्याचा स्वार्थच कमी-अधिक प्रमाणात असतो. या स्वार्थकेंद्रित जगण्यामुळेच त्याच्या जीवनात अनेक समस्या तो निर्माण करीत असतो. या माणसाला कर्तेपणाच्या भ्रमातून सोडवणारा हा हरी स्वत:ला कर्तेपणा चिकटू देत नाही. ‘मी केलं’ आणि ‘मी होतो म्हणून हे झालं’ असा भाव त्याच्यात कधीच नसतो. तो अनामा असतो, पण त्याच्या नामाच्या स्मरणातही मोठी शक्ती असते. त्या नामात जो रंगून जातो त्याच्या जगण्यातील अनवधानता संपते आणि अवधान येऊ लागतं. त्यामुळे त्याच्या जीवनातील विसंगती लयास जाऊ लागतात आणि सुसंगतीनं जीवनाचा प्रवाह वाहता होतो. हे नाम सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातले आहे आणि म्हणून तेच सुगम साधन आहे, असं नाथ सांगतात. कवि नारायण जनक राजाला हा बोध करीत आहे आणि तो या नामाच्या अनुषंगाने म्हणतो की, ‘‘ऐक राया सावधान। नामापरतें सुगम साधन। सर्वथा नाहीं नाहीं आन। निश्चित जाण नेमस्त।।५५३।।’’ हे नाम जितकं अंत:करणपूर्वक घेतलं जाईल तितकं ते खोलवर जाईल आणि ते जितकं खोलवर जाईल तितकी अशाश्वताची आवड कमी होईल आणि शाश्वताची ओढ स्थिरावेल. मग त्यायोगे असत्यापासून विभक्त करणारी खरी भक्ती सुरू होईल.