चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

खरी भक्ती साधली, तर अन्य काय साधायचं उरलं? त्या भक्तीची पायवाट साध्याशा भासणाऱ्या नामानं सुरू होते. हे नामस्मरण कुणाच्याही आवाक्यातलं आहे. पण मागेच सांगितलं त्याप्रमाणे, नाम नुसतं घेत राहून काही साधणार नाही. ते नाम ज्याचं आहे त्याच्या कळकळीची जाणीवही वाढत गेली पाहिजे. त्यातून आपल्या अंतरंगात सकारात्मक पालट घडत जाईल आणि त्यातूनच जगण्यातल्या सत्तत्त्वापासूनचा विभक्तपणा संपू लागेल. ज्याला खरी भक्ती साधते त्याची आंतरिक स्थिती कवि नारायण सांगतो. तो म्हणतो, ‘‘ऐसा बाणल्या भक्तियोग। न धरी जाणपणाचा फूग। त्यजूनि अहंममतापांग। विचरती नि:संग हरिकीर्तनें।। ५५५।। करितां श्रवण स्मरण कीर्ति। तेणें वाढे सप्रेम भक्ति। भक्त विसरे देहस्फूर्ति। ऐक तेही स्थिती सांगेन राया।।५५६।।’’ हा भक्तीयोग अंगी बाणला की ‘जाणपणाचा फूग’ म्हणजे मीच काय तो जाणता, हा गर्वाचा फुगाच निर्माण होत नाही. मग अंहममता आपोआप लयास जाते आणि नि:संगता दृढ होते. अर्थात जगाबद्दलचा आसक्तभाव ओसरतो. मग श्रवण, स्मरण, कीर्तन या नवविधा भक्तीच्या वाटेनं भक्तीप्रेमानं अंत:करण भरून जातं आणि मग नाथ फार सुंदर शब्द योजतात ‘देहस्फूर्ती’! ही देहस्फूर्ती मग विसरली जाते! ती लयास जात नाही, ओसरत नाही, नष्ट होत नाही, तर केवळ तिचा विसर पडतो! देहभावाचा विसर पडतो.. देहभावाचं विस्मरण आणि देवभावाचं अखंड स्मरण, अशी स्थिती होते.  मग या स्थितीचं ऐश्वर्य ६००व्या ओवीपर्यंत नाथ मांडतात. त्या ओव्यांचं चिंतन काही आपण करणार नाही, कारण ती अनुभवाची स्थिती आहे. एखाद्या कोटय़धीशाच्या सुखस्थितीची वर्णनं नुसतं वाचून काय उपयोग? तेव्हा काही ओव्या तेवढय़ा पाहू. नाथ लिहितात,  ‘‘हरिनामगुणकीर्तनकीर्ती।  अखंड आवडे जागृतीं। स्वप्नींही तेचि स्थिती। दृढ हरिभक्ती ठसावे।। ५५७।। ऐशियापरी भक्तियुक्त। दृढतर जाहलें ज्याचें व्रत। तंव तंव होय आद्र्रचित्त। प्रेमा अद्भुत हरिनामकीर्ती।।५५८।।’’ हरीच्या नाम आणि गुणगायनात जो जागेपणी अखंड रमतो त्याच्या स्वप्नातही तेच तर सुरू राहणार! त्याची स्वप्नस्थितीही दृढ हरीभक्तीच चित्तात ठसवणारी असते. अशा भक्तीनं ज्याचं व्रत दृढतर झालं त्याचं चित्त आद्र्र होतं! म्हणजेच त्याच्या कोमल अंत:करणात भक्तीचा ओलावा अखंड प्रसवत असतो. त्याचं वावरणंही प्रेममय असतं आणि त्यात हरीनामाची अद्भुत कीर्ती दरवळत असते. भगवंतापासून आपण अभिन्न आहोत, हे त्याला अनुभवानं उमगू लागतं. त्याचवेळी आपलं पूर्वीचं जगणं आठवून, आपणच का एकेकाळी मायाममतेत वेडय़ासारखे जखडून गेलो होतो, या विचारानं त्याला हसूही येतं. नाथ म्हणतात, ‘‘पळतां दोराच्या सर्पाभेण। पडे अडखळे भयें पूर्ण। तोच दोरातें वोळखून। आपणियां आपण स्वयें हांसे।।५६५।। तेवीं संसाराचा अभावो। देहभाव समूळ वावो। तेथें नाथिली ममता अहंभावो। मज होता पहा वो म्हणूनि हांसे।।५६६।।’’ दोरीला साप समजून घाबरून पळताना अडखळून पडला, पण जिला साप समजत होतो ती दोरी आहे, हे समजताच हसू लागला. त्याचप्रमाणे मिथ्या संसाराला खरं मानून एकेकाळी आपण कसे त्यात रूतलो होतो, हे आठवून या भक्ताला हसू येतं!