07 December 2019

News Flash

१५५. भक्ती आणि विरक्ती : २

सर्वसामान्य माणसाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढणं ही भगवंताची सेवाच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

भक्तीच्या मार्गावर जो प्रामाणिक वाटचाल करीत आहे, निष्ठेनं साधना करीत आहे, त्याच्या जगण्यातली अपूर्णता ओसरत जाते. ही पूर्णता आणि अपूर्णता बाह्य़ परिस्थितीत नसते, तर आंतरिक स्थितीत असते. त्याच्या बाह्य़ भौतिक परिस्थितीत उतार-चढाव असतात, कित्येकदा भौतिक साधनांची कमतरता आणि पैशाची चणचणही असते. पण श्रीतुकडोजी महाराज म्हणतात ना? त्याप्रमाणे, ‘‘राजास जी महाली, सौख्यें कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या!’’ राजालासुद्धा त्याच्या महालात जी सुखं कधी मिळाली असतील-नसतील, ती सर्व मला या झोपडीत मिळाली आहेत! हे गरिबीचं उदात्तीकरण नव्हे, समर्थन नव्हे; पण श्रीमंती आणि गरिबी हे बाह्य़ भौतिक परिस्थितीचं मापन आहे. सर्वसामान्य माणसाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढणं ही भगवंताची सेवाच आहे. गरिबीमुळे व्यक्तिगत प्रगतीचा मार्ग खुंटत असतो आणि  क्षमता असताना परिस्थितीपायी वंचित राहावं लागणं, हा सामाजिक अन्याय आहे. पण भौतिक श्रीमंती आणि गरिबीपेक्षा आंतरिक श्रीमंती आणि गरिबी अधिक महत्त्वाची आहे. कारण आंतरिकदृष्टय़ा ज्याच्यात सहृदयतेची, जाणिवेची गरिबी असते, तोच भौतिक जगात अहंकारानं वावरत असतो. तर भौतिक जीवनात गरिबीत जगत असतानाही ज्याच्यात आंतरिक भावश्रीमंती असते, तो भौतिक जगातल्या वंचितांचाही सहज आधार बनत असतो. असा भक्त हा आसक्तीपासून मुक्त असतो आणि म्हणूनच तो ‘‘येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या!’’ या भावनेनं वावरत असतो. सुखांनाही तो आलात तर या, गेलात तर जा, असं मोकळेपणानं सांगून टाकतो! सुखासाठी तो एका भगवंतावाचून कुणावरही अवलंबून नसतो आणि त्यामुळेच त्याच्या अवतीभवती असलेल्या कुणावरही त्याच्या अपेक्षांचा बोजा कधीच नसतो. अशा भक्ताचं बाह्य़ जीवन भौतिकदृष्टय़ा अपूर्ण भासलं, तरी आंतरिकदृष्टय़ा ते पूर्णत्वाकडेच वाटचाल करीत असतं. त्या पूर्णत्वाचं सुख त्याच्या जगण्यात असं भरून जातं, की त्याच्या संपर्कातील प्रत्येकावर त्या प्रसन्नतेचा संस्कार झाल्याशिवाय राहात नाही. भक्ती आणि विरक्तीनं त्याचं अंत:करण भरून गेल्यानंच ही प्रसन्नता त्याच्यात ओतप्रोत असते. ही भक्ती आणि विरक्ती अभिन्न आहे, असं सूचित करताना कवि नारायण म्हणतो की, ‘‘हें असो जेवीं जावळीं फळें। हों नेणें येरयेरां वेगळें। तेवीं भक्ति विरक्ति एके काळें। भक्त तेणें बळें बळिष्ठ होती।।६०६।।’’ जुळी फळं जशी एकमेकांपासून अभिन्न असतात, तशी भक्ती आणि विरक्ती एकमेकांपासून अभिन्न असते. या दोन्हीच्या योगानं भक्त बलिष्ट होतो. आता भक्ताचं बळ ते काय? तर ते भक्तीबळच असतं! त्या भक्तीबळानं काय घडतं? तर, ‘‘जेथ भक्ति आणि विरक्ती। नांदों लागती सहजस्थिती। तेथेंचि पूर्णप्राप्ती। दासीच्या स्थितीं सर्वदा राबे।।६०७।।’’ जिथं भक्ती आणि विरक्ती या दोन्ही सहजस्थितीत नांदत असतात तिथंच पूर्णप्राप्ती ही दासीप्रमाणे सतत राबत असते! अर्थात, पूर्णप्राप्ती ही सेवा करीत राहते. आता याचा अर्थ पटकन लक्षात येत नाही आणि त्याची उकलही मोठी कठीण आहे. एवढं सांगता येईल की, भक्ताला जेव्हा जेव्हा जी-जी गरज भासते, ती-ती त्या त्या वेळी तात्काळ सहज भागवली जाते. आता ही गरज भौतिक गोष्टींची नव्हे बरं का!

 

First Published on August 8, 2019 2:28 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 155
Just Now!
X