20 October 2020

News Flash

१५९. भक्तीमाहात्म्य : १

येशूची भक्ती करायची असेल, तर त्याच्या कारुण्याचा आणि दिव्यत्वाचा वसा स्वीकारावाच लागतो,

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

भक्ती, विरक्ती आणि प्राप्ती या तिन्हीचा संयोग ज्याच्या अंत:करणात होतो त्या दिव्य अंतर्मनालाच भक्तहृदय हे नाव शोभून दिसतं. ही अनासक्त, निराग्रही, निरपेक्ष, दिव्य आणि अपार वात्सल्यपूर्ण वृत्ती ज्या हरीभक्तीनं साध्य होते ती अवश्य केलीच पाहिजे, असं कवि नारायण सांगतो. त्या भक्तीनं भगवंताची, परमतत्त्वाची प्राप्ती होतेच, असंही तो सांगतो. आता मागेच आपण पाहिलं, आपण भक्ती करतोच करतो. देहसुखाची, भौतिक संपदेची भक्ती आपण जन्मापासून जसं कळू लागतं तेव्हापासून करीत आलोच आहोत. मग संगतीनं, संस्कारानं, मूळ स्वभावप्रवृत्तीनं जर आपण व्यापक होत गेलो, तर विचाराची भक्ती करतो, मनुष्यत्वाची भक्ती करतो, समाजहिताची भक्ती करतो. ही भक्ती संकुचितपणाची चौकट मोडणारी असते खरी, पण या ‘भक्ती’तही धोक्याची वळणं असतात आणि ती अहंकाराच्या वाटेवरही नेऊ शकतात. तरीही देहसुखाच्या संकुचित भक्तीपेक्षा समाजहिताला उपयुक्त अशी ही भक्ती श्रेष्ठच असते. आणि खूपजणांना वाटतं की, याच भक्तीची आज गरज आहे. ज्या भगवंताला कुणी कधी पाहिलं नाही त्याच्या भक्तीत काय अर्थ आहे? तसं पाहिलं तर मनुष्यमात्राच्या समानतेची स्थिती तरी अनेक युगांपासून कुणी कधी पाहिली आहे? तरीही त्या विचाराच्या भक्तीसाठी आयुष्य समर्पित करून इतरांच्या विकासासाठी प्रयत्न करणारी माणसं आहेतच ना? त्यांच्या त्या ‘भक्ती’ला आपण निर्थक मानतो का? पण भगवंताच्या भक्तीबाबत संभ्रमच अधिक आहे. त्या भक्तीशी दूरान्वयानंही संबंध नसलेल्यांच्या मनात तो आहेच, पण ती भक्ती ‘करणाऱ्यांच्या’ मनातही तो आहे! आणि म्हणून त्या ‘भक्ती’नं समाजाला श्रद्धेचं जसं वळण लाभतं आणि चांगुलपणाचे, सद्विचारांचे संस्कार जसे समाजावर होतात तसंच धर्माधतेचं, शोषणाचं, उच्च-नीचतेचं वळणही लागू शकतं. हा देश श्रद्धेवर जोपासला गेला आहे आणि त्या श्रद्धेच्या शक्तीनं तो अत्यंत खडतर अशा कालखंडातही तावून सुलाखून निघाला आहे, त्यामुळेच तर अनेक पंथ विचारांचा, धर्म विचारांचा जन्म याच भूमीत झाला आणि त्या सगळ्यांत समन्वयाचं सूत्र टिकून राहीलं. पण त्या श्रद्धेचा भांडवलासारखा वापर होतो तेव्हा अध्यात्माच्या नावाखालीही बाजारपेठा वसवल्या जातात. मग श्रद्धेच्या ज्या शक्तीनं समाज घडवता येतो, उत्तुंग ध्येयांसाठी प्रेरित करता येतो, सद्विचारांनी युक्त होतो त्याच शक्तीच्या गैरवापरानं समाज बिघडवताही येतो, अत्यंत उत्तुंग ध्येयाच्या मुखवटय़ाआड संकुचित ध्येयांसाठी प्रेरित करता येतो, सद्विचारांच्या लेपाआड कुविचारांनी बिथरवता येतो. त्यामुळेच भक्तीला, अध्यात्माला सरसकट विरोध करण्याची संधी साधली जाते. मग भगवंत म्हणजे काय? तर जो व्यापक आहे, प्रत्येक जीवमात्रात असूनही त्यापलीकडेही भरून आहे अशा तत्त्वाची भक्ती आहे ही. मग संकुचित राहून ती साधता येईल का? शिवाची भक्ती ज्याला करायची आहे त्याला स्वत:च्या जीवनातही शिवत्व जोपासावंच लागतं. रामाची भक्ती करायची असेल, तर रावणत्वही सोडावंच लागतं. येशूची भक्ती करायची असेल, तर त्याच्या कारुण्याचा आणि दिव्यत्वाचा वसा स्वीकारावाच लागतो, महम्मद पैगंबर साहेबांची भक्ती करायची असेल तर ‘खुद’ला ‘खुदा’मध्येच विलीन करावं लागतं. तेव्हा खरा धर्म, खरी भक्ती ही व्यापकत्वाकडेच नेते, पण संकुचितपणा सोडवत नसलेला माणूस भक्तीलाच संकुचित करू पाहतो!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2019 2:10 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 159 zws 70
Next Stories
1 १५८. विरक्ती आणि प्राप्ती
2 १५७. भजनयुक्ती
3 १५६. समरस
Just Now!
X