जो खरी भक्ती करतो तो त्याला भक्तीबळानं विरक्ती आणि त्यायोगे दिव्यानुभवाची प्राप्ती होत असते. कवि नारायण राजा जनकाला हे भक्तीचं आणि भक्ताचं माहात्म्य सांगत आहेत आणि संकुचित परीघातून सोडवत व्यापक करणारी हरीची भक्ती अवश्य केली पाहिजे, हे उच्चरवानं सांगत आहेत. ते म्हणतात, ‘‘राया हरिभक्तिदिव्यांजन। तें लेऊनि भक्त सज्जन। साधिती भगवन्निधान। निजभजनमहायोगें।।६२०।।’’ हे राजा, हरिभक्ती हे दिव्य अंजन आहे, सद्भक्त ते डोळ्यांत घालून भजनरूपी महायोगानं भगवंताचं सान्निध्य प्राप्त करतात. जे दृष्टी स्वच्छ करतं त्याला अंजन म्हणतात. इथं हरी भक्तीला अंजन म्हटलं आहे आणि ते सुद्धा साधंसुधं नव्हे, तर दिव्य आहे! कारण ते अंजन भक्ताची दृष्टी सुधारतं आणि त्याला भगवंताशी एकरूप व्हायलाही साह्य़भूत होतं. आता इथं ‘डोळे’ आणि ‘दृष्टी’ या दोन्हीचा व्यापक अर्थच लक्षात घेतला पाहिजे. जगात आपण इंद्रियांद्वारे जे जे ग्रहण करीत असतो त्या इंद्रियांची शुद्धी या हरीभक्तीनं होते आणि म्हणून अंतर्मनात उतरणारं जग हे शुद्ध स्वरूपातच आत्मसात होतं. म्हणजेच जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणूनच जाणवतं आणि जे मिथ्या आहे ते मिथ्या म्हणूनच जाणवतं. जेव्हा ही ‘दृष्टी’ स्वच्छ नव्हती, शुद्ध नव्हती तेव्हा जे अशाश्वत आहे, मिथ्या आहे तेच शाश्वत आणि मिथ्या भासत होतं. ते टिकवण्यासाठीच सर्व क्षमतांचा वापर करण्याची अव्याहत धडपड सुरू होती. जे शाश्वत आहे त्याचं मोलच उमजत नव्हतं. म्हणून त्याच्या प्राप्तीची किंवा ते टिकवण्याची निकडही नव्हती. एकदा ही दृष्टी स्वच्छ झाल्यानं प्रत्येक गोष्टीचं खरं मूल्य उमगू लागलं, जीवनातलं स्थान उमगू लागलं आणि मग त्याप्रमाणे त्या गोष्टीबरोबर अंतर्मनाचा व्यवहार स्थिरावला. शाश्वताच्या प्राप्तीसाठी साधना करीत असताना अशाश्वताची आवड जोपासून चालत नाही. जे क्षणभंगूर आहे, कोणत्याही क्षणी ज्याचा वियोग होणं शक्य आहे, ज्याच्या संगाची कोणतीही शाश्वती नाही त्याच्यात मनानं गुंतून चालत नाही. जीवनात जे जे अशाश्वत आहे त्याच्याप्रति माझं जे जे कर्तव्य आहे ते पूर्ण करून त्याच्यात न गुंतण्याची कला ही भक्ती सहज शिकवत असते. तेव्हा या भक्तीनं जगण्यातलं अशाश्वत जे जे आहे ते ते ओसरू लागतं आणि शाश्वत असा जो भगवंत आहे त्याच्या ऐक्याची ओढ लागते. जेव्हा शाश्वताची भक्ती करताना मनही केवळ जे जे शाश्वत आहे त्यालाच चिकटतं तेव्हा? कवि नारायण सांगतात, ‘‘करितां ऐक्यभावें निजभक्ती। उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती। तेणें होये असतांची निवृत्ती। भक्तां ‘पूर्णप्राप्ति’ परमानंदें।।६२१।।’’ अशा ऐक्यभावानं जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा पूर्ण शांती उपजते! इथं उत्पन्न होते, निर्माण होते असं म्हटलेलं नाही. तर ‘उपजते’ म्हणजे मुळात ती उपजत असतेच, ती प्रकट होते. बरं ही शांती कशी आहे? तर उत्कृष्ट, अतुलनीय आणि परमपूर्ण आहे. तिच्यात तसूभरही उणीव नाही. त्या भक्तीनं जे उरलंसुरलं असत् आहे त्याचीही निवृत्ती होते आणि भक्ताला परमानंदासह पूर्णत्वाची प्राप्ती होते. असे हे भक्त धन्य होत, ते देहानं जगात वावरतात पण त्यांच्या अंतर्मनात देहवासनेचा लवलेश नसतो, देहात असूनही ते देहातीत असतात, हरीभजनानं नित्य मुक्तच असतात! (यालागीं धन्य भगवद्भक्त। इंद्रियीं वर्ततां विषयीं विरक्त। देहीं असोनि देहातीत। नित्यमुक्त हरिभजनें।।६२२।।)