उत्तम भक्ताची लक्षणं सांगणाऱ्या अनेक ओव्यांना स्पर्श न करता आता आपण पुढे जात आहोत. पण त्यातली एक ओवी पाहू. उत्तम भक्ताला मानसन्मानाची कशी नावड असते, हे मांडताना कवि नारायण सांगतो, ‘‘छाया पालखीं बैसावी। ऐसें कोणी चिंतीना जीवीं। तैशी देहासी पदवी यावी। हा नुठी सद्भावीं लोभ भक्तां।। ६८३।।’’ म्हणजे एखादा माणूस भर उन्हात खडबडीत रस्त्यावरून जात आहे. तोच एक पालखी आली आणि त्या पालखीत बसण्याची विनंतीही त्याला झाली. तोच त्याचं लक्ष आपल्या सावलीकडे गेलं आणि त्याला वाटलं, की ही सावली बिचारी भर उन्हात फिरत आहे. तिला खरी पालखीची गरज आहे. मला नव्हे! तसं सामान्य माणूस देहाला मान मिळावा म्हणून आसुसतो, पण हा देह ज्या चैतन्य तत्त्वाच्या आधारावरच जगत असतो त्या चैतन्य तत्त्वाची तो उपेक्षा करीत असतो. उत्तम भक्त मात्र देहाला सावलीएवढीच किंमत देतो आणि तो देह ज्या आधारावर जगत आहे त्या चैतन्य शक्तीला अग्रक्रम देतो. त्यामुळे तो देहाच्या मान-सन्मानाची अपेक्षा जोपासत नाही की त्याच्या अपमानानंही खंतावत नाही. हा जो उत्तम भक्त आहे तो कोणत्या गुणांमुळे भगवंताला प्रिय असतो, हे सांगणाऱ्या ओव्यांकडे आता वळू. कवि नारायण म्हणतो, ‘‘प्राकृतां देहीं देहाभिमान। तेणें गुरुकृपा करितां भजन। पालटे अभिमानाचें चिन्ह। अहं नारायणभावनायुक्त।।७०१।।’’ सर्वसामान्य माणसाच्या मनात देह म्हणजे मी, या कल्पनेमुळे देहाचा अभिमान असतो. म्हणजे हा देह ज्या ‘मी’चा आहे आणि या देहाचं जे जे म्हणून ‘माझे’ आहे, त्या सर्वाचा अभिमान असतो. माझा धर्म, माझी जात, माझा समूह, माझी भाषा, माझं रूप, माझी बुद्धीमत्ता, माझी क्षमता अशा अनंत गोष्टींचा अहंकार त्याच्या मनात असतो. इतकंच नव्हे, जे माझं आहे ते श्रेष्ठच आहे, असाही भाव असतो. मग गुरुकृपेनं जर असा माणूस खरं भजन करू लागला, म्हणजे खरी भक्ती करू लागला, तर अहंपणाचं हे चिन्ह पालटतं आणि अंत:करण नारायणभावनेनं युक्त होतं. देहभावाची जागा देवभाव घेऊ लागतो.  कवि नारायण सांगतो, ‘‘‘अहं देह’ हें समूळ मिथ्या। ‘अहं नारायण’ हें सत्य तत्त्वतां। ऐशी भावना दृढ भावितां। ते भावनाआंतौता अभिमान विरे।।७०२।।’’ मी म्हणजे देहच, हा भाव समूळ खोटा आहे. मी त्या नारायणाचा अंश आहे, हे सत्य आहे. जेव्हा ही भावना दृढ होते, अगदी खरेपणानं मनात ठाम होते, तेव्हाच त्या भावनेत अहंभाव विरून जातो. असा भक्त मग निरहंकारी होतो. ‘‘अभिमान हरिचरणीं लीन। तेव्हां भक्त होय निरभिमान। तेंचि निरहंतेचें लक्षण। हरि संपूर्ण सांगत।।७०३।।’’ मग कवि नारायण एक फार सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘..सुवर्णाचें केलें शुनें। तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारे असतां।।७०४।। तेवीं जन्मादि अहंभावो। उत्तम भक्तां नाहीं पहा हो। कर्मक्रियेचा निर्वाहो। ‘अहंकर्ता’ स्वयमेवो मानीना।।७०५।।’’ सोन्याचं कुत्रं केलं, पण म्हणून सोनं काही कुत्रा होत नाही! म्हणजे सोनं सोनंच राहतं. तसंच देहरूपात जन्माला आला म्हणून उत्तम भक्त हा देहभावात जखडत नाही, स्वत:ला देह मानत नाही. तो देह ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीनुरूप तो स्वत:ला मानत नाही. बाह्य़रूपानं तो कसाही असो, जगात त्याची काहीही ओळख असो, आतून ‘मी केवळ एका चैतन्याचा अंश आहे,’ ही त्याची अखंड जाणीव कधीच लोपत नाही.

– चैतन्य प्रेम