20 October 2020

News Flash

१७३. देह-भान

मनाला भावत असलेल्या एखाद्या देवाच्या सगुण रूपात हा ‘तू’ शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

अनुतापाआधीचं जे जीवन होतं, जगण्याच्या मूळ ध्येयाचं भान येण्यापूर्वीचं जे जीवन होतं त्यात अहंभाव हा राजा होता आणि देह, मन, चित्त, बुद्धी ही त्या अहंभावरूपी राजासाठी लढणारी प्यादी, हत्ती, घोडे, उंट आणि वजीर होती. इंद्रिययुक्त देह हा जगात वावरण्याचं आणि ‘सुख’ भोगण्याचं साधन असल्यानं त्या देहाला जपण्या-जोपासण्याचं काम मन, बुद्धी, चित्त याद्वारे अहंभाव सतत करीत होता. काही अपवाद वगळता, एखादा प्रसंग घडून जगण्याच्या रीतीबद्दल माणसाला खाडकन् जाग येते. परिस्थिती प्रतिकूल होते, जिव्हाळ्याच्या माणसांचा दुरावा होतो, संकट येतं किंवा अपेक्षांचा भंग होतो आणि माणूस तळमळून विचार करतो की, या जगण्याचा अर्थ तरी काय? हे जीवन का जगावं लागतं? या जगण्यात खरं सुख आहे की नाही? हे प्रश्न माणसाला भानावर आणतात आणि मग या जगण्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरू होते. त्या धडपडीतून ‘मी’पलीकडे प्रथमच लक्ष जातं आणि त्या ‘मी’चा केंद्रबिंदू हळूहळू ‘तू’कडे वळू लागतो. प्रथम हा ‘तू’देखील धूसर असतो, कल्पनेच्या पातळीवर अधिक असतो. मनाला भावत असलेल्या एखाद्या देवाच्या सगुण रूपात हा ‘तू’ शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो. सद्गुरू वगैरेपर्यंत मनाची झेप गेली नसते. अर्थात या ‘तू’च्या शोधामागचा सुप्त हेतू ‘मी’चं संरक्षण हाच असतो! अध्यात्म मार्गाचं मोठं रहस्य असं की या शोधाची मूळ प्रेरणा खरं तर ‘तू’कडूनच आली असते आणि जेव्हा हा शोध सुरू होतो तेव्हा प्रत्येक पावलावर तोच सांभाळ करीत असतो, मनाची उमेद वाढवत असतो, साधनेची गोडी लावत असतो आणि जीवनातल्या प्रसंगांकडे तटस्थपणे पाहण्याची कला अगदी संथपणे का होईना, पण शिकवतही असतो. जीवनातल्या प्रसंगाचा नवाच अर्थ मनात प्रकाशू लागतो. आपल्या जीवनाचा प्रवाह नेमका कुठे अडला आहे, याचीही जाणीव तीव्र होऊ लागते. आजवरच्या जगण्यात आपल्या झालेल्या चुका, आपल्या भावनिक मूर्खपणामुळे नाहक वाया गेलेला बहुमोल वेळ आणि इतरांना झालेला मनस्ताप, या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मनात जाणवू लागतात. आपली भावनिक, मानसिक क्षमता हळूहळू वाढत आहे, हेदेखील उमगू लागतं. मग हा शोध जितका प्रामाणिकपणे सुरू होतो त्या प्रमाणात ‘तू’वरील कल्पनेचे पटल दूर होऊ लागतात. मग आधीच्या जीवनात देहालाच सर्वस्व मानून देहात चिणलेलं आणि सुखासाठी आसुसलेलं मन शुद्ध होऊ लागतं, स्थिर होऊ लागतं. त्यातून देहसुखाचा अग्रक्रम बदलू लागतो. त्यातून खरा सद्गुरू लाभला आणि त्याच्या बोधानुरूप आचरणाचा अभ्यास पक्व होऊ लागला, की अनुताप वाढू लागतो, मरणाचं स्मरण टिकू लागतं. अर्थात जगण्याची संधी फार बेभरवशाची असल्यानं जोवर जगत आहोत तोवर जे उमगलंय ते साधलं पाहिजे, हा भाव तीव्र होऊ लागतो. मग, ‘न मनी अल्प देहसुख।।’  ही, अर्थात देहलालसा अल्पदेखील उरू न देण्याची स्थिती येऊ लागते. याचा अर्थ अशा भक्ताचं जीवन रूक्ष असतं का? देहाला तुच्छ मानणारं, त्याची उपेक्षा करणारं असतं का? तर नव्हे. वरकरणी तो देहाची नीट काळजी घेतो; पण हा देह सुख भोगाचं माध्यम आहे, ही आधीची जाणीव लोपली असते आणि हा देह आत्मसुख प्राप्त करण्याचं साधन मात्र आहे, ही जाणीव उदित झाली असते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2019 1:30 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 173 zws 70
Next Stories
1 १७२. मोह-परीक्षा
2 १७१. भक्तमय भगवंत
3 १७०. अकर्त्यांचं कर्तृत्व
Just Now!
X