चैतन्य प्रेम

शब्द अर्थात लोकांकडून होणाऱ्या स्तुतीपाठोपाठ स्पर्श हा इंद्रियगळ अलगद येतो. वैराग्याचा अभ्यास करीत असलेल्या या साधकाला लोक आदरपूर्वक नेतात आणि- ‘‘नाना मृदु आसनें घालिती। विचित्र र्पयक निद्रेप्रती। नरनारी शुश्रूषा करिती। तेणें धरी प्रीती स्पर्शाची।।१७।।’’ त्याला बसण्यासाठी नाना मृदु आसनं घालतात. निजण्यासाठी मुलायम गाद्या घातलेला पलंग देतात. त्याचे हात-पाय चेपतात. यातून स्पर्शाच्या गळाला हा भक्त अडकतो. मग रूप या विषयगळाला तो कसा अडकतो? ‘‘रूप विषय कैसा गोंवीं। वस्त्रें भूषणें देती बरवीं। सौंदर्य करी जीवीं। देहीं भावी श्लाघ्यता।।१८।।’’ त्याला नाना वस्त्रे, अलंकार देतात. त्यायोगे देह सजवताना देहाच्या सौंदर्यात तो पुन्हा गुरफटतो. मग, ‘‘रूप विषय ऐसा जडला। ‘रस’ विषय कैसा झोंबला। जें जें आवडे तयाला। त्या त्या पदार्थाला अर्पिती।।१९।।’’ रूपापाठोपाठ येतो तो रसविषय. तो कसा अडकवतो? तर, त्या भक्ताच्या आवडीचे जे जे पदार्थ असतात ते ते त्याला आग्रहानं खाऊ घातले जातात. मग, ‘‘ते रसगोडीकरितां। घडी न विसंबे धरी ममता।’’ त्या रसगोडीच्या पूर्तीसाठी त्या लोकांच्याबद्दल त्याच्या मनात ममता निर्माण होते. त्यांना तो घडीभरदेखील दूर करू इच्छित नाही. मग ‘गंध’ हा विषयगळ कसा गुरफटवतो? तर, ‘‘आवडे सुमन चंदन। बुका केशर विलेपन। ऐसे पांचही विषय जाण। जडले संपूर्ण सन्मानें।।२१।।’’ त्याला अत्तर, गुलाब, बुका, केशराची उटी इत्यादि लावतात. मग त्याला सुगंधाचीही गोडी लागते. तर अशा प्रकारे पाचही इंद्रिय विषय त्याला पुन्हा गोवतात आणि एकदा ही विषयगोडी सुप्तपणे मनात झिरपू लागली की? ‘‘मग जे जे जन वंदिती। तेचि त्याची निंदा करिती। परी अनुताप नुपजे चित्तीं। ममता निश्चितीं पूजकांची।।२२।।’’ ज्या ज्या लोकांनी आधी मान दिला, स्तुती केली, सेवा केली तेच लोक मग टीका करू लागतात, अवमान, अपमान, निंदा, उपेक्षा करू लागतात. पण तोवर पूजकांची ममता जडली असते आणि त्यामुळे मानाची गोडी लागलेला साधक जगामागे फरपटत जातो. पण काहीजणांना वाटतं, की जो विवेकी आहे त्याला जगाकडून होणाऱ्या अपमानाचं, उपेक्षेचं दु:खंच कसं होईल? त्यावर नाथ सांगतात, ‘‘म्हणाल ‘विवेकी जो आहे। त्यासी जनमान करील काये’। हें बोलणें मूर्खाचें पाहें। जया चाड आहे मानाची।।२३।।’’ जो विवेकी आहे त्याला लोकांकडून होणाऱ्या अपमानाचं कसलं आलंय दु:खं, असं बोलणं चुकीचं आहे कारण पाचही इंद्रियविषयांत अडकलेल्या साधकाला मानाची गोडी लागली असते. जो विवेकी असतो तो मानाकडे कसं पाहतो? नाथ म्हणतात, ‘‘ज्ञात्यांसी प्रारब्धगतीं। मान झाला तरी नेघों म्हणती। परी तेथेंच गुंतोनि न राहती। उदास होती तत्काळ।।२४।।’’ जे ज्ञानी विरक्त असतात त्याला प्रारब्धगतीनं मान प्राप्त झाला, तरी ते मान देणाऱ्याचं मन राखण्याकरिता तो नाकारत नाहीत, पण त्यातच ते गुंतूनही राहात नाहीत, लगेच उदास होतात! म्हणजेच लोकांची स्तुती ते स्वीकारतात, मान, सेवा स्वीकारतात पण त्यात ते अडकत नाहीत. स्तुती आणि निंदा, मान आणि अपमान, लाभ आणि हानी या दोन्हीकडे ते समान दृष्टीनं पाहात असतात. स्तुती, मान, लाभ आदींनी ते हुरळत नाहीत आणि म्हणूनच निंदा, अपमान आणि हानीनं खचूनही जात नाहीत.