चैतन्य प्रेम

जो खरा ज्ञानी विरक्त असतो, तो कसा असतो; म्हणजेच साधकानं खऱ्या अर्थानं विरक्तीचा अभ्यास कसा केला पाहिजे, हे आता नाथ ‘चिरंजीवपदा’त सांगत आहेत. ते म्हणतात, ‘‘तो विरक्त कैसा म्हणाल। जो मानलें सांडी स्थळ। सत्संगीं राहे निश्चळ। न करी तळमळ मानाची।।२६।।’’ तो विरक्त कसा असतो म्हणता? तर, जिथं अवास्तव मानसन्मान वाटय़ाला येत असतो ते स्थळच तो सोडून देतो! कारण त्या मानामागे मान देणाऱ्याच्या अपेक्षाच बहुतांश वेळा असतात आणि मग हळूहळू मान देणाऱ्याच्या मनातला दुराग्रह आणि विशेषाधिकाराची स्वकल्पित भावना इतकी वाढू लागते, की मग ज्याला मान द्यायचा त्याचा नकळत अवमानच आपल्याकडून होत आहे, हेदेखील त्याला जाणवत नाही. या असल्या क्षुद्र भावनिक गुंत्यात अडकण्यापेक्षा साधकानं जिथं अवास्तव मान लाभतो त्या स्थळाला नमस्कार करून दूर व्हावं! हा विरक्त ज्ञानी असं करतो आणि मानाची गोडी, मानाची तळमळ त्यागून खऱ्या शुद्ध सत्संगात रमतो. कारण त्या सत्संगातून आंतरिक भाव अधिक शुद्ध होत असतो. मानकल्पनेत अडकून तो स्वत:चा वेगळा फड मांडत नाही.. ‘‘मांडीना स्वतंत्र फड। म्हणे अंगा येईल अहंता वाड। धरूनि जीविकेची चाड। न बोले गोड मनधरणी।।२७।।’’ तो आपला वेगळा फड मांडत नाही, आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण तसं झालं तर अहंकार आणखी विकोपाला जाईल, हे त्याला पक्कं माहीत असतं. तसंच लोकांच्या कलानं घेतलं, तर त्यांच्याकडून आपला लाभ करून घेता येईल, अशा क्षुद्र कल्पनांत अडकून तो त्यांची हांजी हांजीही करीत नाही, त्यांची मनधरणी करीत नाही. जे सत्य आहे, जे त्यांच्या हिताचं आहे, जे शुद्ध अध्यात्माला धरून आहे तेवढंच तो सांगतो, मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो, गोड वाटो की कडू वाटो. ‘‘नावडे प्रपंच-जनीं बैसणें। नावडे कोणासी बोलणें। नावडे योग्यता मिरवणें। बरवें खाणें नावडे।।२८।।’’ त्याला निव्वळ प्रापंचिक काथ्याकूट करण्याचीच आवड असलेल्या लोकांमध्ये बसणं आवडत नाही, कोणाला काही बोलणं, सांगणं, फर्मावणं आवडत नाही. आपली योग्यता मिरवणं आवडत नाही, की कुणाकडून आग्रहानं घातलं जाणारं गोडाधोडाचं, चांगलंचुंगलं खाणंही ग्रहण करणं आवडत नाही. साधकानं तर अपवादात्मक परिस्थिती वगळता सहसा बाहेर काही खाऊ नये; कारण अन्नाबरोबर ते रांधणाऱ्याच्या मनातल्या इच्छांचे संस्कारही येतात, असं आपली सनातन संस्कृती मानते. जे अन्न परमात्मप्रेमाच्या भावनेत रांधलं जात असतं, ते सर्वाथानं सात्त्विक असतं. मग ते राजवाडय़ातलं असो की झोपडीतलं असो! त्या परमभावासह ते अन्न, ते आतिथ्य, ती सेवा स्वीकारून सत्पुरुष त्या स्थानी परमानंदाची उधळण करीत, याचेही अनेक दाखले आहेत. ‘‘नावडे लौकीक परवडी। नावडती लेणीं लुगडीं। नावडे परान्नगोडी। द्रव्यजोडी नावडे।।२९।।’’ लौकीक वाढविणारी उंची वस्त्रे, परान्न आणि परद्रव्याची त्याला आवड नसते. म्हणजेच स्वकष्टार्जित जे आहे, त्यातच तो समाधान मानतो. हा सगळा विरक्तीचा अभ्यास या मार्गावर आलेल्या प्रत्येकासाठी आहे. आपण यापैकी कुठल्या गोडीत अडकून आहोत, याचा विचार करून सावध झालं पाहिजे.