चैतन्य प्रेम

भगवंतमय झालेला जो भक्त आहे त्याची आंतरिक स्थिती नाथांनी कवि नारायणाच्या माध्यमातून फार सुरेख सांगितली आहे. ती ओवी अशी : ‘‘अंगीं बाणला संन्यासु। परी तो न म्हणे मी परमहंसु। जेवीं नटाअंगीं राजविलासु। तो राजउल्हासु नट न मानी।।७१३।।’’ म्हणजे या भक्ताच्या अंगी संन्यास बाणला असतो, पण तरी ‘मी परमहंस आहे,’ हे सांगण्याचं भानही त्याला नसतं! तो स्वत:ला भगवंताचा एक तुच्छ भक्तच मानत असतो आणि त्याची भक्ती करायला मिळत आहे, त्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला निमित्त केले गेले आहे, याचाच त्याला आनंद वाटत असतो. रूपक फार सुंदर आहे की, जसा राजवस्त्र अंगावर ल्यायलेला आणि राजाची भूमिका रंगभूमीवर वठवत असलेला नट हा आपण राजा नव्हे, हे पक्केपणानं जाणत असतो, तसा हा भक्तदेखील आपली काही योग्यता आहे, असं मानतच नसतो. त्याच्या अंगी संन्यास बाणला असतो. आता हा संन्यास म्हणजे काय? तर सर्व वृत्तींपासूनची विरक्ती. त्याच्या मनात भौतिकासाठी कोणतीच ओढ शिल्लक राहीली नसते. अमुक घडावं किंवा अमुक घडू नये, असा कोणताही हट्टाग्रह नसतो. तो संपूर्ण चराचराला एकाच परमात्मरूपात पाहात असतो. नाथ सांगतात, ‘‘डावे हातींचे पदार्थ। उजवे हातीं स्वयें देतां। येथें कोण देता कोण घेता। तेवीं एकात्मता सर्वभूतीं।।७४०।।’’ डाव्या हातानं एखादी वस्तू उजव्या हातात दिली, इथं कोणी कोणाला काय दिलं किंवा कुणी कुणाकडून काय घेतलं? त्याप्रमाणे या चराचरात एकात्मताच नांदत आहे, हे तो जाणतो. ‘‘आपणासकट सर्व देहीं। भक्तां भगवंतावांचूनि नाहीं। यालागीं शांति त्याचे ठायीं। स्वानंदें पाहीं नि:शंक नांदे।।७४१।।’’ या जगातील नाम-रूप आणि आकार वैविध्यात तो एकाच परमात्म्याला पाहात असतो. आता सगळ्यात एकच परमात्मा दिसतो म्हणजे काय? सोन्याचा अलंकार घडवला तरी सोने हे सोनेच असते. त्याला उणेपणा येत नाही की त्याचं महत्त्व वाढत नाही. सर्वसामान्यांना दागिना दिसतो, पण जाणत्या सुवर्णकाराला सोनंच दिसतं. एखाद्या चकाकत्या दागिन्यालाही सर्वसामान्य माणूस सोन्याचा अलंकार मानण्याची चूक करू शकतो, पण जो जाणता सुवर्णकार आहे त्याला लगेच त्यातला खरे-खोटेपणा कळतो. म्हणजेच नाम-रूप, आकार हे सुरूप असोत की कुरूप, अस्सल असोत की नकली, सर्वामध्ये असलेला चैतन्य शक्तीचा अर्थात अस्तित्वाचा आधार केवळ या भक्ताला उमगतो. माउली म्हणतात, ‘‘ना तरी सागरीच्या पाणी। काय तरंगाचिया आहाती खाणी। हे अवांतर करणी। वारयाची नव्हे?’’ म्हणजे समुद्रात काय तरंगांच्या खाणी असतात का? नव्हे, पण वाऱ्याच्या बळानं ते उत्पन्न होतात ना? अगदी त्याचप्रमाणे हे समस्त जगत जरी परमात्ममयच असलं, तरी विकारांच्या वाऱ्यांनी ‘मी’ची वेगळी लाट निर्माण होते, स्वत:ची सत्ता जोपासण्याच्या ऊर्मीनं उंचच उंच उसळते, पण अखेरीस पाण्यातच लय पावते. अखेरीस एक पाणीच पाणी उरतं. तसं हे जग निर्माण होतं, ‘मी’च्या भ्रामक सत्तेनं स्वतंत्र अस्तित्व जोपासू पाहतं, पण अखेरीस एकाच चैतन्य शक्तीत लयही पावतं. हे या भक्ताला दिसतं. त्यामुळे विविध आकार, प्रकार आणि व्यक्तिंच्या बाह्य़ वर्तनात आणि व्यवहारात तो गुंतून पडत नाही. त्यामुळे त्याच्या अंत:करणातील शांतीला आणि स्वानंदाला धक्का पोहोचत नाही. –