17 October 2019

News Flash

१८५. बद्ध आणि मुक्त

विरक्त म्हणजे उदासीन. या जगातून सुख मिळवण्याच्या ओढीबद्दल तो उदासीन असतो!

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

जो निरपेक्ष आहे तोच विरक्त आहे आणि जो विरक्त आहे, तोच नित्यमुक्त आहे! आता ही जी मुक्ती आहे तिच्याविषयी आपण मागेच जाणून घेतलं होतं, पुन्हा थोडं संक्षेपानं पाहू. या मुक्तीच्या चार पायऱ्या आहेत. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे ज्या चराचरात मी वावरत आहे त्याच्यावर भगवंताचीच सत्ता आहे, ही धारणा. समीपता म्हणजे तो अखिल ब्रह्माण्डाचा स्वामीच्या अखंड सत्संगात मी आहे, तो माझ्यापासून दूर नाही. सरूपता म्हणजे, मी त्याचाच अंश आहे, ही धारणा. सायुज्यता म्हणजे मी नाहीच, तो आहे, ही जाणीव होऊन ‘मी’ पूर्ण लोपून जाणं. आता या चारही मुक्तींचा गाभा पाहिला, तर लक्षात येईल की, भगवद्भावाशीच त्या जोडल्या गेल्या आहेत. थोडक्यात जगाचा प्रभाव ज्या प्रमाणात कमी होईल आणि भगवद्भावाचा विकास होत जाईल, तसतशी त्या मुक्तीची स्थिती आपोआप प्राप्त होत जाईल. आता जगाचा प्रभाव म्हणजे काय हो? मुळात जग म्हणजे तरी काय? तर आपल्या ‘मी’पणाच्या परिघात असलेली, त्या परिघावर परिणाम करीत असलेली माणसं, वस्तूमात्र आणि परिस्थिती. हेच तर ज्याचं-त्याचं जग असतं. दृश्य जगाचा पसारा मोठा आहे आणि त्यात कोटय़वधी माणसं, कोटय़वधी प्राणी राहातात. देशोदेशी परिस्थितीही वेगवेगळी असते. पण जोवर त्यांच्या असण्या वा नसण्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही, तोवर आपल्या जगात त्यांचं अस्तित्वच नसतं जणू! आपलं जग हे आपल्या माणसांचं असतं. जी माणसं आपल्या स्वार्थाला अनुकूल भासतात ती ‘आपली’ असतात, ‘आवडती’ असतात, जी माणसं आपल्या स्वार्थपूर्तीत अडसर भासतात त्यांच्याबाबत आपलेपणा नसतो, ती आपली ‘नावडती’ माणसं असतात. आणि या आवड-नावडीच्या निकषावर जग द्वैतमय झालं असतं. पण तरीही जन्मापासून हेच जग सुखाचा आधारही वाटत असतं आणि त्यामुळे त्या जगातल्या माणसांकडून आपल्याला सुखच मिळावं, अनुकूलताच वाटय़ाला यावी, अशी आपली अपेक्षा असते. ज्याच्या अंत:करणातून ती अपेक्षा नष्ट झाली असते, तोच खरा निरपेक्ष असतो! जो निरपेक्ष असतो तो आपोआप विरक्त असतोच. विरक्त म्हणजे उदासीन. या जगातून सुख मिळवण्याच्या ओढीबद्दल तो उदासीन असतो! मन अपेक्षांत गुंतलं नसल्यानं ते सदोदित बंधरहित आणि अर्थातच नित्यमुक्त असतं. आता नाथांनीच एके ठिकाणी सांगितलं आहे की, बंधनही नाहीच, तर मुक्ती तरी कुठून असेल? आधी मी स्वत:ला बंधनात असल्याचं मानत होतो आणि कालांतरानं बंधनातून सुटल्याचं मानू लागलो. लोखंडाची बेडी तोडली, पण सोन्याची घातली! जोवर ‘मी बंधनात आहे’ हा भाव असो की ‘मी मुक्त आहे’ हा असो जिथं ‘मी’ची सत्ता शिल्लक आहे, तिथं खरी मुक्ती कुठली? तेव्हा जे आहे ते असू द्या, नाही ते नसू द्या, या वृत्तीनं कर्तव्यभावनेनं जो जगात वावरतो आणि त्या कर्तव्यापोटी अगदी भौतिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांतही भले तो जुंपलेला दिसत असो, तो अंत:करणातून मुक्तावस्थेतच असतो. उलट त्याचे प्रयत्न हे अधिक अचूक, अधिक निर्भय आणि निश्चिंततपणानं होत असतात. त्या उलट संसारात रुतलेल्या माणसाच्या प्रयत्नांतही ठामपणा नसतो. सातत्य नसतं. तेव्हा जो विरक्त आहे, निरपेक्ष आहे तो निष्क्रिय नाही. तो रूक्षपणानं जगणारा नाही. उलट तो मनुष्यजन्माचं ऋण खऱ्या अर्थानं फेडणारा योगीच असतो.

 

First Published on September 24, 2019 3:01 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 185 zws 70