चैतन्य प्रेम

जो अंतर्निष्ठ आहे, आपल्या मनुष्यजन्माचं ध्येय लक्षात घेऊन जगणारा आहे, आंतरिक समत्वाचा अभ्यास करणारा आहे, तोच खरा निजस्वार्थ साधून घेणारा असतो. भौतिकाच्या स्वार्थभावनेतून तो मुक्त असतो आणि गंमत अशी की अशा भक्ताच्या मागे भौतिक सुखे धावू लागतात! सद्गुरूंचा एक दोहा आहे, ‘‘नहीं चाहता था, तो मिलता सभी था। अगर चाहता हूँ, तो मिलता नहीं कुछ। कहूँ कैसे किस से कि चाहत बुरी है। चाहत नहीं तो कुछ दुख नहीं है!’’ जेव्हा काही मिळावं, अशी इच्छाच नव्हती, तेव्हा सगळं काही मिळत होतं! आता मिळविण्याची इच्छा होऊ लागली, तर काहीच मिळेनासं झालं. कसं सांगावं, की ही इच्छाच वाईट आहे. ही इच्छाच नसेल तर मग दु:खही नसेल! अजून एक त्यांचं वचन आहे, ‘‘बिना माँगें सब कुछ मिलता है और माँगनें पर कभी कभी भीक भी नहीं मिलती!’’ न मागता सगळं काही मिळतं आणि मागितल्यावर कधी कधी भीकसुद्धा मिळत नाही! जेव्हा जगाकडे सुखाची भीक मागणं संपलं, तेव्हा ना सुखाची आस उरली ना दु:खाची भीती. मग जी एकच एक अवस्था उरली ती सुख-दु:ख द्वंद्वापासून मुक्तच होती. जिथं द्वंद्वच संपलं तिथं आनंदच आनंद असणार ना? भक्ताची हीच अवस्था उकलताना नाथ म्हणतात, ‘‘तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती। कर जोडूनि वरूं प्रार्थिती। तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती। भक्त परमार्थी अतिलोभी।।७४६।।’’ त्रलोकातील सर्व संपत्तीचे स्रोत जणू या भक्तासमोर उभे राहून स्वीकारासाठी प्रार्थना करीत असतात, पण तरीही तो क्षणभरदेखील हरीचरणांवरील आपली दृष्टी ढळू देत नाही. संसाराचा- अर्थात जगाचा लोभ मनातून सुटलेल्या, स्वार्थाचा लोभ सुटलेल्या भक्ताच्या मनात केवळ आणि केवळ परमार्थाचाच लोभ असतो. परमार्थाचीच आस असते. परमार्थासाठीच तळमळ असते. मग नाथ लोकांच्या मनातली शंकाही उपस्थित करतात की, हरीचरणांवरून क्षणभर दृष्टी दूर केली तरी, जर त्रलोक्यातलं भौतिक सुखही वाटय़ाला येत असेल, तर मग त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका कोणता लाभ भक्ताला मिळतो? त्याच्या उत्तरात नाथ मग सांगतात, ‘‘हरिचरणीं अपरोक्षस्थिती। तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती। त्यापुढें त्रिभुवन विभवसंपत्ती। भक्त मानिती तृणप्राय।।७४८।।’’ म्हणजे हरिचरणांच्या ठिकाणी रममाण भक्ताला जे आत्मसुख प्राप्त होत असतं, त्याच्या क्षणार्धाचा जो लाभ असतो त्यापुढे त्रलोक्याचं वैभवही भक्तांना तुच्छ वाटतं! इथं थोडं थांबू आणि आपापल्या मनाच्या डोहातही डोकावून पाहू! हे सगळं वाचताना मनात येईल की, आपण पंधरा-वीस मिनिटांत हे वाचून बाजूला ठेवू आणि पुन्हा जगण्याच्या त्याच चक्रात, भौतिक जीवनाची घडी बसवण्याच्या धडपडीत पुन्हा स्वत:ला झोकून देऊ. मग हे सारं वाचून काय उपयोग? काहींच्या मनात येईल की, भौतिक सुखाची इच्छाच मनात आणायची नसेल, तर मग जगणं दिशाहीनही होईल. किंबहुना, संतांच्या अशा बोधामुळेच समाज कर्तव्यविन्मुख झाला, भौतिकाचं महत्त्व कमी करून बसला, पिछाडीवर गेला, जगाच्या स्पर्धेत मागे पडला, असाही काहींचा आरोप असतो. माणसानं श्रीमंत होण्यात, भौतिक सुखसोयी मिळवण्यात आणि त्यांचा भोग घेण्यात गैर काय, असंही काहीजण विचारतील. काहींना वाटेल की, विरक्ताचं जीवन नीरस, रूक्ष आणि मानवी भावभावना दडपणारं नाही का? या प्रश्नांचा अगदी संक्षेपानं पुढे वेध घेऊ.