चैतन्य प्रेम

माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर माणसाला जी जी सुखं उपभोगता येतात ती भोगली पाहिजेत. या देहातल्या क्षमतांचा आणि बुद्धीचा वापर करूनच तर आजवर माणसानं अनंत शोध लावले, त्यातून सुखसोयी निर्माण झाल्या. त्याच्या वेळेची बचत झाली, कष्टांची बचत झाली. या भौतिक जगात जर अखेपर्यंत वावरायचं आहे, तर मग त्या भौतिकाला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे, असं अनेकांना आध्यात्मिक चिंतन वाचून वाटतं. बरं, त्यात त्यांचा काही दोष नाही. कारण अध्यात्म हे भौतिकाच्या विरोधात आहे, अशीच धारणा आहे. पण खरं तर संतांचा बोध नीट पाहिला, तर तो भौतिकाला विरोध करीत नाही, पण त्या भौतिकात जे अडकणं/ अवलंबणं आहे, त्या भौतिकासाठी जे तळमळणं आहे, त्याला त्यांचा निश्चितच विरोध आहे. ज्या प्रज्ञेनं माणसानं अनंत शोध लावले, त्या प्रज्ञेच्या उगमाशी तो पोहोचावा, असं त्यांना वाटतं. आपण मात्र बाहेरच्या जगात इतकं गुंतून आहोत, की आत डोकवायला सवडच उरलेली नाही. माझे सद्गुरू म्हणतात तसं, बाहेरच्या झगमगाटामुळे अंत:करणातला अज्ञानाचा अंधार अधिकच गडद झाला आहे! तेव्हा भौतिकाचा आस्वाद अवश्य घ्यावा, आधार अवश्य घ्यावा; पण त्याचा आश्रय वाटू नये! हा अभ्यास आहे बरं. तो काही एका दिवसात साधणारा नाही. ज्याच्या गरजा कमी, त्याचं समाधान जास्त, असं म्हणतात ना? तर, मनाला वाटणाऱ्या गरजेकडे लक्ष द्यायचं आहे. मनाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट वस्तूमात्राची, विशिष्ट परिस्थितीची का गरज भासते, याचा विचार केला पाहिजे. ती जी गरज आहे, ती अपरिहार्यता होत असेल आणि त्यामुळे माणूस मानसिकदृष्टय़ा, भावनिकदृष्टय़ा पंगु होत असेल, तर त्या गरजेच्या पाशातून मनानं सुटण्याचा विचार केला पाहिजे. आपल्या मनाला जी जी गोष्ट गुलाम बनवते, त्या त्या गोष्टीच्या प्रभावातून सुटता आलं पाहिजे. आपलं मन कशात गुंतून आहे, हे मनाच्या डोहात डोकावल्यावरच जाणवू लागेल. हे डोकावता आलं पाहिजे. संतांच्या बोधामुळे समाज कर्तव्यविन्मुख झाला आहे किंवा भौतिकाचं महत्त्व कमी करून निष्क्रिय झाला आहे, या आरोपात तथ्य नाही. कारण भौतिक सोडा, असं कुणी म्हटल्यानं कुणीही सोडत नाही! माणसाची स्वाभाविक इच्छा भौतिक साधनांनी संपन्न होण्याची असते. त्यात काही गैर नाही. पण त्या परिस्थितीवर विसंबून बेसावध होऊ नका, एवढाच संतांचा सांगावा आहे. भौतिकाला विरोध नसेल, तर संत त्याच्या प्रभावातून सुटण्याचा बोध वारंवार का करतात? तर, जेव्हा ते दहा पावलं पुढची वाट दाखवतात, तेव्हा माणूस एखादं पाऊल टाकण्याचा विचार तरी करतो! जेव्हा ते सगळं मनानं सोडून द्यायला सांगतात, तेव्हा काही क्षणांसाठी तरी त्याच्या मनात ते विचार उमटतात आणि संस्कार रुजण्याची प्रक्रिया सुरू होते. जो साधनाभ्यासानं पक्व होत जातो, त्या विरक्ताचं जीवन नीरस, रूक्ष नसतं. एका वेगळ्याच प्रसन्नतेनं ते भरून गेलेलं असतं. त्याच्या आत्मसुखमग्न मधुर वृत्तीचे संस्कार त्याच्या सहवासात आलेल्यांवर झाल्याशिवाय राहत नाहीत. अकृत्रिम व अकारण आनंदानं त्याचं जीवन पूर्णत्वाकडे विकसित होत असतं.