27 October 2020

News Flash

१९०. अनन्यशरण

सगळ्यांनी आनंदानं टाळ्या पिटल्या तेव्हा ब्रह्मदेवाचा कर्तेपणाचा अभिमानच गळून पडला.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

या हरीचरणांची दृढ भक्ती ब्रह्मदेव आणि शंकर यांनीही कशी साधली आणि एकात्मता प्राप्त करून घेतली, हे कवि नारायण राजा जनकाला सांगतात. हे सांगत असतानाच हरीचरणांवर एकाग्र होणं म्हणजे तरी नेमकं काय, याची एक ओझरती झलक मिळते. ही चराचर सृष्टी ब्रह्मदेवानं उत्पन्न केली खरं, पण त्या ब्रह्मदेवानं आपलं हे वैभव त्यागून हरीचरणांची भक्ती आरंभली. नाथ सांगतात, ‘‘त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती। ब्रह्मा बैसोनि एकांतीं। अहर्निशीं हरिचरण चिंती। तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे।।७५१।।’’ ब्रह्मदेवानं या वैभवसंपत्तीचा त्याग करून एकांतवास पत्करून अहर्निशी म्हणजे दिवस-रात्र हरिचरणांचंच सदैव चिंतन केलं, पण तरीही त्याला या हरीचरणांची भक्ती काही प्राप्त झाली नाही! मग काय झालं? तर, कृष्णचरित्रातली एक गूढमधुर गोष्ट समोर येते. नाथ लिहितात, ‘‘सहसा न पवे हरिचरण। यालागीं ब्रह्मा साभिमान। तेणें अभिमानेंचि जाण। नेलीं चोरून गोपाल-वत्सें।।७५२।।’’ एवढं चिंतन केलं, साधना केली, तरीही हरीचरणांचं प्रेम काही दृढ होईना. उलट अंतरंगातला कर्तेपणाचा, सर्जक असल्याचा अभिमान बळावला. नंदाघरचा लहानगा गोपाळ कृष्ण हा गोपांसमवेत गायी-गुरं यमुनातटी चारत असे. त्याच्या या बाललीला पाहताना हाच हरीचा अवतार आहे, याचंच विस्मरण ब्रह्मदेवालाही होई. त्या हरीची भक्ती जडत नाहीच आणि या लहानग्या बालकृष्णाच्या खोडकर लीलांनी संभ्रमही वाढत आहे. त्या हरीचीच परीक्षा पाहण्याची सुप्त इच्छा मग ब्रह्मदेवांच्या मनात निर्माण झाली. त्यांनी एके दिवशी बालकृष्णाच्या सवंगडय़ांच्या रानात चरत असलेल्या गायी चोरून नेल्या. त्या अशा ठिकाणी ठेवल्या की सामान्य माणसानं अनंत जन्म शोध घेतला, तरी त्या गवसणार नाहीत! गोप-गोपी घाबरले. कोणतीही अडचण येवो, मग ती लहान असो की मोठी, लगेच कृष्णाकडे धाव घ्यायची, हीच सवंगडय़ांची सवय. त्यानुसार कृष्णाकडे सगळ्यांनी तळमळून धाव घेतली. कृष्णानं अंतज्र्ञानानं झाला प्रकार ओळखला आणि तशाच दुसऱ्या गायी जवळच्या वनश्रीच्या प्रदेशात निर्माण केल्या. सवंगडय़ांना ओरडून म्हणाला, ‘‘अरे तुम्ही काय सांगता? त्या काय आपल्या गायी तिथं आनंदात चरत आहेत!’’ सगळ्यांनी आनंदानं टाळ्या पिटल्या तेव्हा ब्रह्मदेवाचा कर्तेपणाचा अभिमानच गळून पडला. हे चराचर आपण निर्माण केलं, आपल्याशिवाय गवताची काडी देखील उत्पन्न होऊ शकत नाही, हा अभिमान कृष्णानं तशाच गायी उत्पन्न करून पार धुळीस मिळवला. ही कथा साधकाला सांगते की, कर्तेपणाचा अभिमान असेल, तर खरी भक्ती साधणं कठीण. माझ्यासारखा जप कुणी करीत नाही, माझ्यासारखा योग कुणाला साधत नाही, माझ्यासारखी यथासांग पूजा कुणाला शक्य नाही.. किती तऱ्हेचा अहंकार मनात रुंजी घालू शकतो. अरे हे जे काही आपल्याला साधतं, त्यासाठी आवश्यक क्षमता कुणी दिली? त्या भगवद् शक्तीनंच ना? हे भान त्या अहंकारानं झाकोळलं असतं. ‘‘अगाध हरिलीला पूर्ण। पाहतां वेडावलें ब्रह्मपण। तेव्हां सांडोनि पदाभिमान। अनन्यशरण हरिचरणीं।।७५४।।’’ हरीची ही लीला पाहून ब्रह्मदेवही मुग्ध झाला. आपल्या सर्जकत्वाचा अभिमान सोडून तो हरीचरणी अनन्य शरणागत झाला. जोवर ‘मी’चा अभिमान आहे तोवर ‘तू’ची शरणागती असाध्यच आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2019 3:36 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 190 zws 70
Next Stories
1 १८९. त्रिभुवनाचं सुख
2 १८८. खरं ‘स्व’ अवलंबन!
3 १८७. परमार्थ-लोभ
Just Now!
X