27 October 2020

News Flash

१९२. ते धन्य धन्य संसारी

आपल्याला आपलं नाव आई-वडिलांनी दिलेलं असतं. ते आपल्या या जन्मापुरतंच आहे,

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

वैभवाच्या परमोच्च शिखरावर पोहोचूनही ज्याचं आत्मवैभव अक्षुण्ण होतं असा जनक राजा आणि वैराग्याचा सगुणावतार अशा नवनारायणांपैकी हरी हा दुसरा योगी; यांच्यातला संवाद आता सुरू आहे. मानवी जन्मातला हरिभक्तीचा महिमा हे नवनारायण सांगत आहेत. त्यायोगे हरिभक्तांची महत्ताही मांडत आहेत. या भक्तांची लक्षणं कोणती, त्यांची धारणा कोणती, त्यांची आंतरिक आणि बा स्थिती कोणती, हे सारं कवी आणि हरी या दोघा आत्मस्थ अवधूत योग्यांनी सांगितलं. आता त्या भक्तांच्या भक्तिहृदयाची कवाडंच जणू हरी उघडून दाखवणार आहे. या भक्तांचं मुख्य लक्षण आता हरी सांगतो. एकनाथ महाराज लिहितात, ‘‘सकळ लक्षणांची सारस्थिती। प्रेमळाची परमप्रीती। उल्लंघूं न शके श्रीपती। तेही श्लोकार्थी हरि सांगे।। ७७२।।’’ भक्तांची अनेक लक्षणं आहेत; पण त्या लक्षणांची सारस्थिती सांगायची, तर प्रेमळाचं परमप्रेम हीच आहे! हे नुसतं परमप्रेम नाही बरं; तर जो मुळातच प्रेमळ आहे त्याच्याद्वारे होणारं परमप्रेम आहे! एखादा कोत्या मनाचा, तुसडा माणूसही कुणावर प्रेम करीत असेल, तर त्याच्या प्रेमाला मर्यादा असेलच. उलट ज्याचं अंत:करण मुळातच प्रेमानं भरलेलं आहे, त्याच्या प्रेमाची रीत किती न्यारी असेल! ज्या भगवंतावर या भक्ताचं निस्सीम प्रेम आहे, त्याच्या नामप्रेमातही तो रंगून गेला आहे. ज्याच्यावर प्रेम असतं, त्याचं नावही जणू हृदयात कोरलं गेलेलं असतं. इथं तर ज्याच्यावर प्रेम आहे, तोच परम प्रेमावतार आहे! पूर्णावतार आहे! आणि त्याच्यावर ज्याचं प्रेम आहे, तो परम प्रेमळ आहे. मग त्याच्या रोमारोमांत त्याचं नाम भरून असेल, यात काय नवल? नाथ सांगतात, ‘‘अवचटें तोंडा आल्या ‘हरी’। सकळ पातकें संहारी। तें हरिनाम निरंतरीं। जे निजगजरीं गर्जती।। ७७३।।’’ अहो, त्या हरीचं- म्हणजेच भवदु:खाचं हरण जो करतो, त्या परमात्म्याचं नाम अवचित जरी मुखी आलं तरी सकळ पातकांचा संहार होतो, विनाश होतो. मग ज्यांच्या अंत:करणात सदैव त्याच नामाची गर्जना सुरू आहे, त्याची आंतरिक भावस्थिती काय वर्णावी! ‘‘ऐसें ज्यांचे जिव्हेवरी। नाम नाचे निरंतरीं। ते धन्य धन्य संसारीं। स्वानंदें हरि गर्जतु।।७७४।।’’ या संसारात, या जगात वावरत असताना ज्यांच्या जिव्हेवर निरंतर नाम नाचत असतं, जे स्वानंदानं हरिनामाच्या गर्जनेत दंग आहेत ते धन्य आहेत. हा संसार कसा आहे? तर तो सतत सरत असलेला आहे. म्हणजे या क्षणी त्याचं जे रूप आहे ते पुढच्या क्षणी राहील असं नाही. ज्या माणसांनी हे जग बनलं आहे, त्या माणसाच्या कल्पना, भावना, वासना क्षणोक्षणी नवनवं रूप धारण करीत असताना हे जग तरी न बदलणारं कसं राहील? त्यातल्या अनुकूल बदलांना माणूस सुख मानतो आणि ते सुख टिकविण्याच्या धडपडीत अहोरात्र गुंतून पडतो. अशा या मायामोहग्रस्त जगात, जिथं जग खरं आणि भगवंत काल्पनिक भासत असतो, अशा भगवंताच्या परम नामावर मन एकाग्र होणं सोपी गोष्ट नाही. साधी गोष्ट पाहा. आपल्याला आपलं नाव आई-वडिलांनी दिलेलं असतं. ते आपल्या या जन्मापुरतंच आहे, हेसुद्धा माहीत असतं. तरी ते नाव आणि आपला ‘मी’ किती खरा वाटत असतो; पण ज्याचं नाम युगानुयुगे गर्जत आहे, जो अनादि अनंत आहे, त्याच्या नामावर विश्वास नसतो! पण या भक्तांची स्थिती वेगळीच असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 2:34 am

Web Title: loksatta ekatmyog ekatmyog article number 192 zws 70
Next Stories
1 १९१. हरिचरणचंद्र-चकोर!
2 १९०. अनन्यशरण
3 १८९. त्रिभुवनाचं सुख
Just Now!
X