चैतन्य प्रेम

भगवंताच्या भक्तीनं भक्ताचं अंतकरण जर कशानं व्यापून जात असेल तर ते नामप्रेमानंच, हे रहस्य आता नवनारायणातील हरी हा योगी सांगत आहे. जे या सतत सरत असलेल्या, पालटत असलेल्या अस्थिर अशा संसारात आहेत आणि तरीही जे स्थिर अशा, शाश्वत अशा नामालाच जोडले गेले आहेत ते धन्य आहेत, असं हरीनं सांगितलं आहे. अनेकांना वाटतं, एवढं काय ते नामाचं महत्त्व! हल्ली बघा संगणकावरून किंवा भ्रमणध्वनी उपकरणाद्वारे आपण अनंत आर्थिक व्यवहारही पार पाडू शकतो. पण त्यासाठी सुरुवात ‘पासवर्ड’शिवाय अर्थात कळीच्या खुणेशिवाय करताच येत नाही! तो जो काही कळीचा शब्द आहे तो आपण प्राणपणानं स्मरणात ठेवतो, जपतो. तसं संसारातल्या अनंत व्यापांतही मन अलिप्त आणि शांत, समाधानी राहावं, असं वाटत असेल, तर त्यासाठी आंतरिक शक्तीची जोड लाभण्याकरिता नाम हाच ‘पासवर्ड’ आहे! आता नामात आहे तरी काय? तर गेल्या भागातच सूचित केल्याप्रमाणे आपल्या नावाशी आपण किती एकरूप असतो ते लक्षात आणा. आपलंही सोडा, आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या नावाशीही आपण किती मनानं जोडले जातो, ते पाहा. बरं ते नाव जगावेगळं नसतं, जन्मानंतर मिळालेलं आणि मृत्यूनंतर मावळणारंच असतं. तरी त्या नावाचा उच्चार होताच त्या व्यक्तीच्या स्मरणानं किती प्रेमभाव उचंबळून येतो! मग जे नाम व्यापक तत्त्वाशी अखंड जोडलं गेलं आहे, ज्यायोगे व्यापक तत्त्वाचंच स्मरण आणि संग लाभणार आहे आणि मन संकुचितपणाच्या जोखडातून सुटून व्यापक होतं, अशी संतांची अनुभवसिद्ध ग्वाही आहे, ते नाम नुसतं मुखानं उच्चारणं वा मनात स्मरत जाणं किती लाभदायक असेल! आणि सर्व धर्म-पंथांची याला मान्यता आहे बरं का. एखादा सत्पुरुष साधनेच्या सर्व रूढ पद्धती मोडून टाकत निर्गुणोपासना मांडत असला तरी त्याचं नाव उच्चारताच त्याच्या शिष्याच्या मनात भाव उचंबळल्याशिवाय राहत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्याच्या नावाच्या उच्चारापाठोपाठ त्याचं सगुण रूप मनपटलावर उमटून प्रेमभाव जागा झाल्याशिवाय राहत नाही! नाम-रूप-प्रेमाचं ऐक्य असं अतूट आहे. व्यापकाच्या परम नामाच्या उच्चारानं भक्ताचं हृदयही संकुचितपणातून मुक्त होत जातं. मग अशुद्धी ओसरते आणि चित्तशुद्धी, हृदयशुद्धी होऊ लागते. हरी नारायण सांगतो, ‘नामासरिसाच हरी। रिघे हृदयामाझारीं। तेणें धाकें अभ्यंतरीं। हों लागे पुरी हृदयशुद्धी॥७७६॥’ काय विलक्षण आहे पाहा.. नामासरिसाच हरी, रिघे हृदयामाझारी! त्या परमात्म्याच्या नामाचा उच्चार होताच तो हरीही हृदयात प्रकटतो आणि एकदा का हा हरी हृदयात विराजित झाला, प्रकाशित झाला की हृदयातला अज्ञानाचा अंधकार मावळतोच! संत एकनाथ महाराज यांच्या एका अभंगाचं इथं स्मरण होतं. त्या अभंगात ते सांगतात की, ‘ज्ञानदिपिका उजळी। नाहीं चिंतेची काजळी॥’ म्हणजे अंतरंगात ज्ञानदिवा उजळव, मग आजवर अज्ञान दिवा उजळत राहिल्यानं जी चिंतेची काजळी लागली होती ना, ती कधीच लागणार नाही! भगवंताचं नाम हाच तो ज्ञानदिवा आहे. नाम हाच ज्ञानदिवा कसा, याचा आता थोडा विचार करू.